Sunday, April 3, 2016

माऊची बाग

    गेले काही दिवस रोज माऊ उत्साहाने माझ्याबरोबर झाडांना पाणी घालते आहे. आज सहज तिला म्हटलं, “आपण तुझी पण एक बाग करू या का? तू झाडं लाव, त्यांना तूच पाणी घाल. आवडेल?” माऊला आवडलीच कल्पना एकदम. मग आज जाऊन तिच्यासाठी तीन सोप्पी, पटकन फुलं येणारी, विशेष (खरं तर काहीच) काळजी न लागणारी  रोपं आणली – तिनेच निवडली ती. “माझी झाडं आहेत ना!” म्हणून रोपं घरी, गॅलरीत आणतांना सुद्धा एक एक करून तिनेच उचलून आणलं, बाबाला किंवा मला हात लावू दिला नाही :) (मातीच्या पोत्याचं वजन बघितल्यावर मात्र बाबाला / आईला ते उचलायची परवानगी देण्यात आली ;) )

मग खास मळवण्याचे कपडे घालून कुंड्या भरणे कार्यक्रम झाला. मातीत खेळायला (दोघींनाही) जाम मज्जा आली. मग “छोट्या बाळाला कसं आपण हळुहळू दूध पाजतो, तसं” छोट्या झाडांना हळुहळू पाणी घालून झालं.
आज तरी मी एकदम हवेत आहे! :) बघू हा उत्साह किती दिवस टिकतोय ते!!!


सदाफुली

chinese pink

chinese pink

कढीपत्त्याच्या कुंडीमध्ये पिंपळाची का पिंपरणीची दोन रोपं आली होती. ती पण दुसर्‍या कुंडीत लावली ... वर्षभर नीट मोठी झाली तर पुढच्या पावसाळ्यात कुठेतरी जमिनीत लावता येतील ही. :)   

पिंपळ (का पिंपरणी? - मोठं झाल्यवर कळेल!)

Friday, April 1, 2016

बळ देणारी भटकंती

माऊ, तिचे आजोबा, माऊचा बाबा आणि मी तीन - चार दिवस महाबळेश्वरला जाऊन आलो. महाबळेश्वरला जाण्यात तसं विशेष काय आहे? पण ही भटकंती विशेष होती माझ्यासाठी.

पहिल्यांदाच "रिलिव्हिंग ड्रायव्हर" ऐवजी मुख्य ड्रायव्हरच्या भूमिकेतून गाडी चालवली. आणि एन्जॉय केलं हे ड्रायव्हिंग. It was liberating.

प्रत्येक ठिकाणी सगळ्यांनी गेलंच पाहिजे असाही आग्रह नव्हता या ट्रीपमध्ये. कधी आम्ही सगळे, कधी मी आणि आजोबा, कधी मी, आजोबा आणि माऊ तर कधी मी एकटी असेही भटकलो. माऊ आणि आजोबा हे एकदम हिट कॉम्बिनेशन आहे. म्हणजे अखंड बडबड करत उड्या मारणार्‍या माऊला एक हात आणि पार वाकून, हळुहळू काठी टेकत चालणर्‍या आजोबांना दुसरा हात देऊन तुम्ही चालत असाल आणि लोकांनी वळून बघितलं नाही असं होणं शक्यच नाही. आजोबांच्या चालण्यामध्ये असं काहीतरी असतं की रस्त्यातला प्रत्येक माणूस त्यांना हात द्यायला पुढे येतो. कुठेही भटकून हॉटेलला परतल्यावर आजोबा आणि / किंवा माऊचं "तुम्हाला बघितलं बोटिंग करतांना. या वयात हा उत्साह म्हणजे मानलंच पाहिजे! " म्हणून अभिनंदन करणारं कुणी ना कुणी भेटणारच हे नक्की!

माऊने तिथे “फॅमिली आऊटिंग”ची नवी व्याख्या बनवली होती – आऊटिंगमध्ये भेटलेले सगळे आपल्या फॅमिलीमधलेच आहेत असं समजून जिथे वागायचे ते “फॅमिली आऊटिंग”. यात बिनदिक्कत कुणाच्याही खोलीत शिरण्यापासून, रस्त्यात भेटलेल्या कुठल्याही बाळाला स्ट्रॉबेरी ऑफर करणं,  ते वेटर आजोबांना “मला जेवायला पुरणपोळी हवी” सांगण्यापर्यंत सगळं आलं. त्यामुळे प्रायव्हसी वगैरे कल्पनांचा आणि आमचा काहीही संबंध नव्हता महाबळेश्वरमध्ये. पुढच्या वेळी आम्ही पुरवलेल्या करमणूकीसाठी काहीतरी डिस्काऊंट मागायला हवा हॉटेलला.

ही भटकंती “taking chances” विषयीही होती. अर्थर सीट पॉईंटला संध्याकाळच्या तुडुंब गर्दीत आजोबांना पॉईंटपाशी सोडून माऊ आणि मी गाडी पार्क करायला गेलो, ते तिथल्या वाहतूक-मुरंब्यामुळे तब्बल वीस – पंचवीस मिनिटांनी परतलो. एवढ्या वेळात आजोबा कुठे गायब झाले नाहीत, धडपडले नाहीत. (अर्थर सीट पाहून परत गाडीकडे येताना तिघं हात धरून चाललो होतो तेंव्हा ते पडता पडता वाचले!) असा त्यांचा तोल एकटे असताना गेला असता तर? या शक्यतेचा आम्ही विचारही केला नव्हता.

एका दिवशी सकाळी माऊ उठल्यावर एकटीच खोलीबाहेर आली, आणि “आई, बाहेर साप आहे!” म्हणून परत आत आली. बाहेर बघितलं तर खरंच दीड - दोन फूट लांब साप होता, खोलीच्या दारापासून चार – पाच फुटांवर. विषारी का बिनविषारी ते माहित नाही, पण दिसेल त्या गोष्टीला कुतुहलाने हात लावणार्‍या माऊला सापापासून दूर रहायचं, आणि परत खोलीत येऊन साप आलेला सांगायचं हे सुचलं नसतं तर? हॉटेलचं कुणीतरी येऊन सापाला हलवेल तोवर सापाचा फोटो काढतांना कुठेतरी हात कापत होता माझा.

महाबळेश्वरहून बामणोलीच्या पुढे मित्राला भेटायला “कॅम्प कोयना” ला जाऊन यायचा प्लॅन होता. दोन एक तासाचा रस्ता असावा असा अंदाज होता. तापोळ्याच्या रस्त्याला लागल्यावर लक्षात आलं, बामणोली इतकं जवळ नाही. तापोळ्याला जाऊन पुढे काय करायचं ते ठरवू असं म्हणून निघालो. तिथे समजलं, की बामणोलीसाठी बार्जमध्ये घालून गाडी नेता येईल, बामणोलीचं अंतर वाचेल. “जाऊन तर बघू” म्हणून निघालो. प्रत्यक्ष बार्जमधून जाऊन अंतर फारसं काही वाचलं नाही, शिवाय कच्चा आणि पूर्ण निर्मनुष्य रस्ता लागला. बामणोलीच्या पुढे तर काही केल्या रस्ता संपेना. बरोबर जेमतेम माऊपुरतं पाणी. आजूबाजूला चिटपाखरू नाही. (वाटेवरच्या देवळात चौकशीला गेले तर फक्त एक काळं कुत्रं भेटलं!) गाडीला काही झालं तर काय करणार होतो तिथे? वाटेत एका मावशीबाईंना लिफ्ट दिली त्यांनी चांगलीच करमणूक केली. मित्राची भेट झाली. परत येतांना सरळ रस्ता पकडायचं ठरवलं. रस्ता तसा चांगला, अगदी बाजूला रिफ्लेक्टर वगैरे लावलेला. फक्त कुठेही मैलाचे दगड नाहीत. (म्हणजे दगड होते, पण नुसताच पांढरा रंग फासलेले. त्यावर जागेचं नाव आणि अंतर दोन्हीचा पत्ता नाही!) पाट्या फक्त “अती घाई, संकटात जाई”, “मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक” वाल्या. कुठे चाललोय आणि किती अंतर आहे सगळं रामभरोसे. जवळपास वस्ती नाहीच. आता अंधारात तर काळं कुत्रं पण नाही वाटेत कुठे. नवरोबा वैतागला ते सोडा, पण मित्राची भेट झाली, मस्त वाटलं. “जाऊन तर बघू” म्हटलं नसतं तर नक्कीच चुटपूट लागून राहिली असती. आणि जराही वेळापत्रकाबाहेर जायचं नसेल, तर रोजचं रूटीन आणि ब्रेक यात फरक तो काय?

शेवटच्या दिवशी सकाळी सगळे उठण्यापूर्वी एकटीच विल्सन पॉईंटला गेले, तेंव्हा जाणवलं, मस्त झालीये ही ट्रीप. एन्जॉय तर केलंच, पण शिकायलाही मिळालंय काहीतरी.

***
गंमत म्हणजे या ट्रीपमध्ये विशेष म्हणण्यासारखा एकही फोटो नाही, असं आत्ता जाणवतंय ... तिथे आठवणही आली नाही कॅमेर्‍याची!

***
आजीने माऊला विचारलं, "काय बघितलं मग महाबळेश्वरला?"
माऊचं उत्तर: "गाढव!"
"काय करत होतं गाढव?"
"शी!"
खरंच, चार पायांची जितकी गाढवं महाबळेश्वरला दिसली तितकी पुण्यात दिसत नाहीत!

Thursday, March 17, 2016

पांढरी सावर

    नुकतीच एका लाडक्या मैत्रिणीची नव्याने ओळख झाली. आपल्या नेहेमीच्या गुलाबी – लाल शेवरीला (काटेसावर / शाल्मली) आणि तिच्या सोनेरी पिवळ्या रूपातल्या सोनसावरीला भेटले होते आतापर्यंत. थंडी संपता संपता सीतेचा अशोक आणि पळस – पांगारा झाले, की मग शेवरीचे फुलण्याचे दिवस येतात. मस्त उंच वाढलेलं शेवरीचं झाड, त्याच्या डौलदार, सिमिट्रिकल, लाल – गुलाबी फुलांनी लगडलेल्या फांद्या, आणि त्यातला मध खायला किडे, माशांचे थवे आणि हा खाऊ टिपायला जमलेले पक्षी अशी सगळ्यांची गर्दी ... अशी गजबजलेली शेवरी माझी लाडकी. फुलं नसतानाही हे झाड देखणंच. टेकडीवर कुणा निसर्गप्रेमींनी जोपासलेल्या झाडांपैकी ही बाळ – शेवरी बरेच दिवस बघत होते., आणि ही मोठी होऊन फुलल्यावर किती सुंदर दिसेल म्हणून स्वप्नही बघत होते. :)

बाळ-शेवरी आहे की नाही ही?
    जेमतेम नऊ दहा फूट उंची असेल या झाडाची. इतकी लहान शेवरी फुलत असेल असं वाटलं नव्हतं मला. त्यामुळे शेवरीच्या फुलायच्या मोसमात इथे एकही फूल दिसत नाहीये म्हणून आश्चर्य नाही वाटलं. मागच्या आठवड्यात या झाडावर पांढरं काहीतरी दिसलं. जवळ जाऊन बघितलं, तर फुलं! नेहेमीच्या शेवरीसारखीच, पण फिक्क्या पिवळ्या, ऑफ व्हाईटच्या जवळ जाणार्‍या रंगाची. ठेवण नेहेमीच्या शेवरीसारखीच, पण आकाराला लहान. आणि शेवरीसारखीच किड्या- माशांची रीघ लागलेली.

बाळ-शेवरी(?)ची रंग विसरून आलेली फुलं! :)
    फुलण्याच्या घाईत रंग विसरून गेली का काय ही? शेवरीच आहे ना म्हणून संध्याकाळी परत नीट बघायला गेले, तर सकाळची फुलं गायब. काही कोमेजून गेली होती, उरलेली मिटलेली. शेवरीची(?) फुलं संध्याकाळी मिटतात हा नवाच शोध लागला. झाड अजून नीट निरखून बघितलं, तर एकही काटा दिसला नाही. काटा नाही अशी सावर कशी असेल? हिला मोठी झाल्यावर फुटतात का काय काटे? काट्यांची जास्त गरज लहान, कोवळं झाड असतानाच असणार ना! पण झाडावर एक हिरवं बोंड दिसलं, ते शेवरीसारखंच वाटत होतं. इतके दिवस हिला मी मैत्रीण समजते आहे, पण खरी ओळखतच नाही की! बाळ-शेवरी(?) का कोण ती फारच खिजवायला लागली.

शेवरीचं(?) बोंड
    मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पांमध्ये चौकशी केली, आणि सापडली! ही शेवरीच. पण लाल नाही, पांढरी.

***

    जरा शोधाशोध केल्यावर कळलं, हिला  पांढरी सावर / white silk cotton tree / Ceiba pentandra म्हणतात. आपल्याकडच्या अनेक देशी भाषांमध्ये नावं असणारी ही मूळची आपल्याकडची नाहीच म्हणे, दक्षिण अमेरिकेतील आहे. (शेवरी परकी कशी असेल? काहीतरीच सांगतात हे लोक!)  फुलांचा वास काही माणसांना विशेष आवडण्यासारखा नसतो कारण तो वटवाघळांसाठी असतो - हिचं परागीभवन वटवाघळांकडून होतं. आता या टेकडीपासून वटवाघळांची माझ्या माहितीतली कॉलनी चांगली दोन किमीतरी लांब. त्यांना कोण जाऊन सांगणार तुमच्यासाठी टेकडीवर खाऊ ठेवलाय म्हणून?

पांढर्‍या शेवरीचं फूल


  टेकडीवर रोज जाणं मला सद्ध्यातरी जमण्यासारखं नाही. मी तिथे जाते ते चालायला म्हणून, किंवा माऊला बरोबर घेऊन. त्यामुळे तिथे झाडं लावणं, त्यांना पाणी घालणं यातही माझा सहभाग शून्य असतो. ज्या कुणी ही पांढरी सावर तिथे जोपासली आहे, त्यांचे इतका आनंद मिळवून दिल्याबद्दल आभार!