Saturday, May 10, 2014

बुप्पा आणि मंबू


सद्ध्या मऊचा आणि माझा दिवस पुस्तक वाचल्याशिवाय पूर्णच होत नाही. तिची सुंदर सुंदर पुस्तकं बघितली की पुन्हा मला तिच्या वयाचं होऊन ही पुस्तकं बघावीशी वाटतात.

आज तिच्या लाडक्या “बुप्पा” आणि “मंबू” विषयी. ही सद्ध्या माऊची सगळ्यात आवडती पुस्तकं.

जंगलातल्या सगळ्या लहान प्राण्यांच्या खोड्या काढणार्‍या, त्यांना त्रास देणार्‍या बुक्का हत्तीला एक दिवस चांगलीच अद्दल घडते. त्याची आई, बाबा, मित्र कुणी सापडत नाहीत, आणि जंगलातलं कुणीच त्याला मदत करायला तयार होत नाही. मग बुक्का शहाणा होतो. सुंदर चित्र, सोप्पी गोष्ट, वाजवी किंमत. नॅशनल बुक ट्रस्टचं पुस्तक.







लंबू जिराफ आणि नॉटी खारुताई यांच्या मैत्रीची गोष्टही एनबीटीचीच. लंबू जिराफ आहे, आपल्यापेक्षा वेगळा आहे मग आपला मित्र कसा होणार असा प्रश्न पडलेल्या नॉटीला लंबू जूंबा हत्ती आणि गप्पू माकड, रंगीला फुलपाखरू आणि फुलं असे मित्र दाखवतो, आणि आपल्यापेक्षा वेगळा असला तरी लंबू आपला मस्त मित्र आहे हे नॉटीला पटतं. 



माऊसाठी आतापर्यंत जी काही पुस्तकं धुंडाळलीत, त्यात मला ज्योत्स्ना प्रकाशन, प्रथम प्रकाशन आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांची पुस्तकं सगळ्यात आवडली. पुस्तकातली चित्र, गोष्ट, किंमत या सगळ्यात उजवी. बाकी स्लीपिंग ब्युटी आणि सिंडरेला सगळीकडे सहज मिळताहेत, पण कितीही सुंदर कागदावर छापलेली मिळाली तरी छळ करणारी सावत्र आई, दुष्ट सावत्र बहिणी, गरीब बिचारी नायिका आणि सोडवायला येणारा राजपुत्र असल्या भाकड गोष्टी तिला आवर्जून सांगाव्यात असं मला तरी वाटत नाही.  
तुम्ही दीड वर्षाचे असाल तर काय काय वाचाल? अजून कुठली पुस्तकं सुचवाल मनीमाऊला?

Saturday, February 22, 2014

झियाउद्दिन युसफझाई



मलाला युसुफझाईवर तालिबान्यांनी केलेला हल्ला, त्यातून तिचं वाचणं आणि मग जगभर तिचं झालेलं कौतुक हे सगळं मागच्या वर्षी उडत उडत वाचलं. चौदा - पंधरा वर्षांच्या मुलीला अशी कितीशी समज असणार? तिच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला म्हणून पाश्चात्य मिडियाने तिला हिरो बनवली अशीच काहीशी प्रतिमा झाली होती माझ्या मनात. आज प्रथमच तिचा तो बीबीसीवरचा ब्लॉग वाचला, त्यातुन उत्सुकता चळावली म्हणून जालावर तिच्याविषयी माहिती शोधली. तिच्या बापाविषयी वाचलं, आणि त्याचं धैर्य (का वेडेपणा?) बघून थक्क झाले. 
बाबारे, तुला कुटुंबकबिला घेऊन पळून नाही जावंसं वाटलं? माझ्या देशात तालिबान नसतांनाही मुलांसाठी पुरेश्या संधी नाहीत म्हणून भलेभले देश सोडून जातात, किंवा देश सोडता येत नाही म्हणून हळहळतात. तालिबान्यांच्या गावात राहून अजाण वयाच्या मुलीला तू शाळेत पाठवतोस, शिकून मोठी होण्याचं स्वप्न दाखवतोस. बीबीसीवर ब्लॉग लिहिण्यासाठी तिचं नाव सुचवतोस, तिच्यावर डॉक्युमेंट्री काढू देतोस. तुला, तिला त्यांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असतांनाही मी स्वातचं काहीतरी देणं लागतो, स्वातच्या अवघड काळात स्वात सोडून जाणार नाही, इथेच राहणार म्हणून हटून बसतोस. आपली लाडकी मुलगी, तिच्याहूनही लहान मुलगे – या सगळ्यांचं कसं होईल म्हणून भीती नाही वाटली तुला? स्वातमध्ये तू उभी केलेली शाळा चालणं इतकं महत्त्वाचं वाटलं? मनात आणलं असतं तर स्वात सोडून जाणं अशक्य नव्हतं तुला. अवघड नक्कीच होतं ... आपलं घर सोडून परमुलुखात वसणं कुणाला सोपं असतं? 
आम्हाला पत्ताही नसतांना तुझ्यासारखे वेडे लोक जगभरातल्या कुठल्या कुठल्या दुर्गम भागात तालिबानशी वेड्यासारखे लढत असतात म्हणून त्यांना जिंकता येत नाही.

***
मलालाविषयी एक माहितीपट इथे आहे.

Thursday, January 16, 2014

एक मस्त स्नेहमेळावा



आमच्या शाळेच्या वर्गातली मुलं-मुली (वर्गातली मुलं-मुली ५० वर्षांनंतरसुद्धा मुलं-मुलीच असतात बरं! :) ) शाळा संपल्यावर २५ वर्षांनी भेटली मागच्या रविवारी. गावातून, परगावहून, परदेशातून ठिकठिकाणून सगळे जमले होते – ४८ जण! जुन्या मित्रमैत्रिणींना खूप दिवसांनी भेटतांना खरं तर जरा धाकधूक असते माझ्या मनात. जुन्या आठवणी रम्य असतात, आणि आता त्या व्यक्तीला परत भेटतांना ती मजा आली नाही तर विरस होतो. त्यातून आमची एकत्र शाळा असली, तरी मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी बोलणं म्हणजे अब्रम्हण्यम् असं वातावरण त्यावेळी असल्याने बहुसंख्य मुलांची नावं पण मला आठवत नव्हती! त्यामुळे निम्म्या पब्लिकची ओळख फारशी नाहीच असं एकीकडे वाटत होतं.

आमच्यातल्या संयोजकांची मेहनत नक्कीच दाद देण्यासारखी! कार्यक्रमाचं नियोजन एकदम नेटकं केलं त्यांनी. अगदी सगळ्यांचा ग्रूप फोटो काढून त्याची एक एक फ्रेम केलेली प्रतसुद्धा त्याच दिवशी प्रत्येकाच्या हातात! पण हा कार्यक्रम आवडला त्यामागे निव्वळ स्मृतीरंजनापेक्षा बरंच जास्त काहीतरी होतं.

सगळ्यांना भेटून मस्त वाटलं एकदम. (आपल्या वर्गात इतकी इंटरेस्टिंग मुलंमुली होती हे एकदम भारी – कॉलर ताठ वगैरे. :) ) शाळेत असतांना व्हायच्या तश्याच मनमोकळ्या गप्पा. 

त्यापेक्षा मस्त वाटलं म्हणजे आमच्यातल्या एकाने स्वतःहून पुढाकार घेऊन गेटटुगेदरचा पूर्ण खर्च उचलल्याचं.

त्याहून मस्त वाटलं ते पुन्हा कधी जमू यात हे ठरवतांना, त्याही कार्यक्रमाचा खर्च उचलण्यासाठी दुसरा एक वर्गमित्र असाच स्वतःहून पुढे आल्यावर. 

या सगळ्यापेक्षाही मस्त म्हणजे आपल्या शाळेतल्या गरजू मुलांसाठी आपण आर्थिक मदत करू या असं ठरवून लगेच पहिली टोकन अमाऊंटही लगे हाथ जमा झाले. This group definitely means business.

पण सगळ्यात मला आनंद कसला झाला असेल तर अगदी अनपेक्षितरित्या गाजरे सर भेटल्याचा. शाळेत गाजरे सरांनी रसायनशास्त्र आणि गणित इतक्या प्रेमाने शिकवलं होतं ... सातवीच्या स्कॉलरशिपला एक ते आगगाडी, तिचा वेग, पुलाची / बोगद्याची लांबी असलं गणित होतं. त्याचं लॉजिक काही केल्या माझ्या डोक्यात राहात नव्हतं. हे गणित मी सरांकडून किती वेळा समजावून घेतलं असेल, आणि त्यांनी न चिडता ते मला किती वेळा परत समजावलं असेल याची गणती नाही. रोज मी त्यांना विचारायचे, आणि दुसर्‍या दिवशीपर्यंत पुन्हा विसरून जायचे. शिक्षकाला किती पेशन्स पाहिजे म्हणून कुणी विचारलं तर मी म्हणेन सरांएवढा! 

पण सरांना मी कधीही विसरू शकणार नाही कारण त्यांच्याकडून शिकायला मिळालेलं गणित आणि रसायनशास्त्रापलिकडचं काहीतरी. सातवी – आठवीतली गोष्ट असेल. शिल्पा आणि मी – एकदम घट्ट मैत्रिणी. कधीतरी आमच्यात ’तात्त्विक मतभेद’ झाले.

    “तू पाणी ‘प्यायलं’ काय म्हणतेस? पाणी ‘पिलं’ म्हणायला हवं.” तिने घरी, बाहेर ऐकलेली ही भाषा. 
    “‘प्यायलं’च बरोबर आहे ग!” माझ्या घरात बोलली जाणारी भाषा.
    “चल, आपण सरांना विचारू.”

सर सुद्धा ’पिलं’ म्हणणारे. हेच बरोबर म्हणून मला असंच बोलायचा आग्रह त्यांनी केला तर? It is a lost cause for me. निरिच्छेनेच मी तयार होते.

“बेटा, आपण इकडे ‘पिलं’ म्हणतो. काही चुकीचं नाही त्यात. बाहेर तिकडे पुण्यामुंबईकडे ‘प्यायलं’ म्हणतात. तेसुद्धा बरोबरच आहे हा. तुमचं दोघींचंही म्हणणं बरोबर आहे.” सर समजावून सांगतात. 

इतकी मामुली गोष्ट. आपण म्हणतो तेच बरोबर असं सहज म्हणू शकले असते सर. त्यात फार काही वावगं आहे असं मला तेंव्हाही वाटलं नसतं. तोवरचा मोठ्यांचा याबाबतचा अनुभव वाईटच. माणूस जितका मोठा तितका त्याचा भाषा, जात यांविषयीचा अभिनिवेश मोठा. पण आपल्यापेक्षा वेगळं काही बरोबर असतं, आपलं चुकीचं नसतांना दुसर्‍याचंही बरोबर असू शकतं हे ज्या सहजतेने त्यांनी एकदाच समजावून सांगितलं, त्यानंतर ते आगगाडी आणि बोगद्याच्या गणितापेक्षा पक्कं जाऊन बसलं डोक्यात.