Monday, April 1, 2024

Outlive: Dr Peter Attia

दहा -  बारा दिवसांपूर्वी लोकसत्तामध्ये या पुस्तकाविषयी वाचलं. ते इंटरेस्टिंग वाटलं, म्हणून पुस्तक शोधलं तर ते सहज उपलब्ध होतं, घेतलं, वाचलं आणि आवडलंही.
 

आधुनिक वैद्यकाच्या मदतीने सध्या सरासरी आयुष्यमान बर्‍यापैकी वाढलेलं आहे. माणसाच्या इतिहासात कधीच नव्हतं एवढं वृद्धांचं प्रमाण आज आहे, ते वाढत जाणार आहे, आणि त्यांची काळाजी घेऊ शकणार्‍या तरुणांचं प्रमाण घटत जाणार आहे. जुन्या एकत्र कुटुंबांमध्ये वृद्धांची कशी का होईना पण व्यवस्था लागत होती, ती शक्यता आता नाही, आयुष्याकडून आपल्या अपेक्षाही खूप बदललेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या म्हातारपणाचं नियोजन कसं करायचं? पैशांचं नियोजन सगळे आपापल्या क्षमतेप्रमाणे करतातच, पण तेवढंच पुरेसं आहे का? जंगलातल्या एखाद्या प्राण्याच्या क्षमता कमी झाल्या तर त्याला दुसर्‍या प्राण्याचं अन्न व्हावं लागतं हा निसर्गाचा नियम आहे. माणसाच्या समाजाला हा नियम आता लागू नाही. कितीही दुबळा झाला, तरी त्याला जगवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न होतोच. एका मर्यादेपलिकडे, जिवंत राहण्याला काही अर्थ राहिला नसताना आपल्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि बाकी तंत्रं वापरून भाजीपाला अवस्थेत जिवंत ठेवू नये असं वैद्यकीय इच्छापत्र अनेक जण करतातही. अनेक देशांमध्ये इच्छामरणालाही कायद्याने परवानगी आहे. भारतात अजून तरी नाही, पण एखाद्याला मरायचंच असेल तर प्रायोपवेशनाचा मार्ग मोकळा असतोच.
 

पण प्रायोपवेशनाइतकी हिंमत नसेल तर? असा निर्णाय घेण्यासाठी डोकं चालायला लागतं, ते चालेनासं झालं असेल तर? शरीरावर तुमचं नियंत्रण नसल्याने तुमच्या इच्छेविरुद्ध कोणी तुम्हाला जिवंत रहायला भाग पाडत असेल तर? तुमच्या वैद्यकीय इच्छापत्राचा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी आदर केला नाही तर? सगळं काही व्यवस्थित चाललंय, पण तुम्ही तुमच्या अंदाजापेक्षा दहा – पंधरा वर्षं जास्त जगलात आणि साठवलेला पैसाच संपून गेला तर? त्याहूनही वाईट म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणीच उरलं नाही आणि तुम्ही एकटेच शिल्लक राहिलात तर? ज्या कशातून तुम्हाला आनंद मिळातो, असं काहीच तुम्ही तुमच्या शारीरिक मानसिक बौद्धिक अवस्थेमुळे पुढे कधीच करू शकणार नसाल तर? या अवस्थेला जगणं म्हणण्यापेक्षा सावकाश तिळतिळ मृत्यू अनुभवणं म्हणायला हवं. नुसतं आयुष्यमान वाढून प्रत्यक्षात जर शेवटची पंधरा वर्षं असं जगणं वाट्याला आलं, तर काय उपयोग? आयुष्यमान वाढताना आरोग्यमानही वाढायला हवं. हे पुस्तक आरोग्यमान वाढण्यासाठी काय करता येईल याविषयी बोलतं.   


जास्तीत जास्त काळ तंदुरुस्त रहायचं असेल, तर तुमचं शरीर तंदुरुस्त हवं डोकं चालत रहायला हवं आणि तुमचं भावनिक आरोग्य, तुमच्या आजूबाजूच्यांशी संबंध चांगले हवेत. यापैकी एक घटक जरी नसेल, तर दीर्घायुष्य हा शाप वाटेल.


तिळतिळ मरण्याला कारणीभूत असे ४ शारीरिक आजारांचे गट इथे लेखकाने सांगितलेले आहेत - मधुमेह, हृदय – रक्तदाबासंबंधित समस्या, कॅन्सर आणि अल्झायमर आणि अन्य प्रकारचे स्मृतिभ्रंश. यातला कुठलाच आजार हा एका दिवसात होत नाही. ज्याच्या आधारावर प्रत्यक्ष उपचार सुरू होतील असे रोग निदान चाचण्यांचे निष्कर्ष येण्यापूर्वी दहा दहा वर्षं आधी, किंवा त्याहूनही आधी रोग्याचा या आजाराच्या दिशेने प्रवास सुरू झालेला असतो. या टप्प्यावर योग्य पावलं उचलली, तर lifestyle changes मधून म्हणजे राहणीमानातल्या बदलातून किंवा अल्प वैद्यकीय मदत घेऊन हे आजार टाळणं किंवा त्यांच्या दिशेने होत असलेला रोग्याचा प्रवास लांबवणं शक्य आहे. 


हे आजार होऊ न देणं एवढंच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट राहून कसं चालेल? आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात, ज्यातून आपल्या जगण्याला अर्थ येतो असं वाटतं त्या गोष्टी आपल्याला आयुष्याच्या शेवटाच्या दशकातसुद्धा करता यायला हव्यात. ही उद्दिष्टं अर्थातच प्रत्येकाची वेगवेगळी असणार. कुणाला प्रवास करायचा असेल, कुणाला नातवंडांशी – पतवंडांशी खेळायचं असेल, कुणाला पुरणाच्या पोळ्या करायच्या असतील, कुणाला सायकल चालवायची असेल. लेखकाने या उद्दिष्टांना डेकॅथलॉनची उपमा दिली आहे. एकाच खेळाचा सराव किंवा एकंच व्यायामप्रकार करून यासाठी पुरेसं होणार नाहीये, तर वेगवेगळ्या क्षमतांवर काम करायला हवंय. आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत या क्षमता टिकवून ठेवायच्या असतील, तर त्यासाठी मध्यमवयापासून, तारुण्यापासून प्रयत्न करायला हवेत. पन्नाशीमध्ये मी दहा किमी सायकल चालवू शकत असेन तर नव्वदीत बहुधा एखादा किमी चालवू शकेन. तेव्हा दहा किमी चालवायची असेल, तर आज माझी तंदुरुस्ती किती हवी, त्यासाठी कायकाय करायला हवं असं गणित आपल्यापुढे या पुस्तकात लेखक मांडतो. प्रत्येकाने व्यायाम करायला हवा असं सगळेच म्हणतात. पण तो किती करावा, कसा करावा, कशासाठी करावा याचा इतक्या लांब पल्ल्याचा विचार मी तरी कुठे यापूर्वी वाचलेला नाही. 


शारीरिक तंदुरुस्ती दीर्घकाळ टिकवण्यासाठी कसा व्यायाम करावा याबरोबरच काय, कधी, किती खावं प्यावं हेही अर्थात महत्त्वाचं आहेच. हे पुस्तक कुठलं एक डायट सगळ्यांसाठी म्हणून सुचवत नाही. व्यायामाप्रमाणेच काय खायचं ते प्रत्येकाने आपापलं ठरवायचं आहे, ते कसं ठरवावं याविषयी मार्गदर्शन नक्की आहे.
व्यायाम, डायट यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग आहे पुरेसा काळ आणि चांगल्या दर्जाची झोप. त्यासाठीही पुस्तकात अनेक ऑनलाईन उपलब्ध असणार्‍या चाचण्या आणि उपाय सुचवलेले आहेत.  
 

हे सगळं करून तुम्ही तंदुरुस्त राहिलात, पण तुमचं भावनिक आरोग्य चांगलं नसेल, तुम्ही निराशाग्रस्त किंवा संतापाने भरलेले असाल, तर काय उपयोग आहे? तुमच्या जगण्यातून तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्यांना आनंद मिळायला हवा. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातला आपला व्यक्तिगत प्रवास लेखकाने पुस्तकात मांडलेला आहे, जो मला फार महत्त्वाचा वाटला.
 

पुस्तक एकदा वाचून बाजूला ठेवलं आणि झालं असं हातावेगळं करण्यासारखं नाही. शारीरिक विकारांविषयीचं त्याचं विवेचन खूप खोलात आणि अभ्यासपूर्ण आहे, मला तरी ते अजून दोन – चार वेळा वाचावं लागेल. त्याने पुस्तकात वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्याही सुचवलेल्या आहेत. (त्यातलं काही मी करीन असं वाटत नाही.) स्वतःची शेवटाच्या दशकासाठीची उद्दिष्टं ठरवायची आहेत. त्यानंतर रोजच्या जगण्यात त्याप्रमाणे काय बदल करायला हवेत याचा विचार. थोडक्यात, पुस्तक एकदा वाचलं, त्याविषयी लिहिलं, पण अजून बराचसा होमवर्क बाकी आहे. 


न झालेल्या आजारांविषयी ज्याच्याशी बोलता येईल असा डॉक्टर मला अजून तरी घराबाहेर कुठे सापडलेला नाही. त्यामुळे पुस्तक भलतंच आवडलंय. त्याचं अभ्यासपूर्ण, कुठल्या डायटचा झेंडा हाती न घेता केलेलं लिखाण भावलंय. तुम्हीही जरूर वाचा असं सुचवीन.
 

Outlive – The Science and Art of Longevity
By Peter Attia, M.D.
2023, Penguin Random House Publication.

Thursday, December 14, 2023

मध्यरात्रीनंतरचे तास

 गेले काही महिने – वर्षं माझी पुस्तक वाचायची सवय अगदी सुटली आहे. म्हणजे एके काळी Gone with the Wind किंवा Complete Short Stories of Sherlock Holmes सारखे ठोकळे आठवडाभरात हातावेगळे होत होते यावर विश्वास बसू नये अशी परिस्थिती आहे. हे प्रकर्षाने जाणवायचं कारण म्हणजे पहिल्या वाचनात आवडलं, काही तपासून बघायचंय म्हणून परत वाचण्यासाठी काढून ठेवलेलं Sapiens आणि Walden सुद्धा मी कित्येक महिन्यात वाचू शकलेले नाही. त्यामुळे नव्याने पुस्तक घेताना त्याच्या जाडीचा अंदाज घेणं आणि हे आपण नक्की वाचणार आहोत का कधी असं स्वतःला विचारणं भाग आहे. त्यात बहुसंख्य कथा – कादंबर्‍या वाचणं अजूनच अवघड जातंय. त्यामुळे ’मध्यरात्रीनंतरचे तास’ गेल्या वर्षीपासून खुणावत होती तरी मी विकत घ्यायचं टाळत होते. पण या वेळी मात्र खरेदीचा मोह आवरला नाही.




माऊला स्क्रीनची फार सवय लागतेय असं सध्या जाणवतंय, आणि मी हिटलरशाही गाजवत तिचा स्क्रीनटाईम अगदी मर्यादित केलाय. तिने खरंच स्क्रीनमध्ये डोकं घालून बसायचं नसेल, तर मलाही लॅपटॉप / मोबाईलपासून दूर रहायला हवंय, तिच्या बाबाने टीव्ही बंद करायला हवाय हे लक्षात आल्याने सध्या घरात स्गळेच स्क्रीन बर्‍यापैकी विश्रांती घेताहेत. माझ्या फतव्याचा फायदा तिला किती होणार माहित नाही, पण मला नक्की होतोय. स्क्रीन नाही म्हटल्यावर चार – पाच दिवसात हातावेगळं झालं हे पुस्तक. आणि आपण आता पुस्तक वाचू शकत नाही ही माझी चिंता दूर झाली.

सलमा या तमीळ लेखिकेच्या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचा हा सोनाली नवांगुळने केलेला मराठी अनुवाद. अनुवाद, त्यातुनही अनुवादाचा अनुवाद म्हणजे बोजड भाषा आणि कानगोष्टींच्या खेळाप्रमाणे अर्थाचा अनर्थ हे दोन्ही धोके असतात. पण असा कुठला खडा दाताखाली येत नाही हे सोनालीचं मोठं यश आहे. खरोखर सुंदर ओघवता झालाय अनुवाद. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय हे अगदी योग्य आहे.

तमिळनाडूमधल्या एका लहान खेड्यातल्या मुस्लीम कुटुंबातल्या नऊ दहा वर्षांच्या मुलीची ही गोष्ट. फक्त तिचीच नाही, तर तिच्या अजुबाजूच्या सगळ्यांचीच. जिथे पाळी आलेल्या मुलीला शाळेसाठीसुद्धा घराबाहेर पडायची संधी नाही, अशा वातावरणात काय घडू शकणार आहे? किती मर्यादित अनुभवविश्व असणार तिचं! खरं सांगते, राबियाच्या गोष्टीत पाचशे पानांची एखादी कादंबरी होण्याइतकं काही असू शकेल असं मला वाटलं नव्हतं. आधीच सध्या पुस्तकं वाचायला अवघड जाताहेत, त्यात हे नक्की बोअर होणार आणि बाजूला पडणार अशी भीती वाटत होती मला. पण पुस्तक हातात घेतलं आणि आठवडाभरात वाचून झालंही!

प्रवास, नव्या गोष्टी शिकणं, स्वतःला व्यक्त करणं, नवे अनुभव घेणं या सगळ्या माझ्या जिव्हाळ्याच्या गोष्टी. जिथे यातलं काहीच करायचं स्वातंत्र्य नाही त्या आयुष्याची कल्पनाही माझा जीव दडपून टाकते. असं जगणं वाट्याला आलेल्या, आणि त्याला आपापल्या पद्धतीने सामोर्‍या जाणार्‍या किती स्त्रिया या पुस्तकात भेटतात. त्यांच्या दृष्टीकोनातून दिसणारे त्यांच्या घरातले / ओळखीचे पुरुष भेटतात. बंद दरवाजांच्या आतल्या जगण्याचं विश्वरूपदर्शन होतं. ’कैरो ट्रायलॉजी’ वाचताना जी जबरदस्त घुसमट जाणवली होती त्याची आठवण झाली ही कादंबरी वाचताना. जरूर वाचा असं सुचवेन.  

मध्यरात्रीनंतरचे तास
सलमा
अनुवाद: सोनाली नवांगुळ
मनोविकास प्रकाशन

Saturday, August 13, 2022

कं पोस्ट ४

कं पोस्ट १
कं पोस्ट २
कं पोस्ट ३

 
    घरी कम्पोस्टिंग करावंच म्हणते मी. कम्पोस्टिंगला सुरुवात केली तेव्हा मी त्याकडे थोडं तरी लक्ष द्यायचे. म्हणजे कधी ते हलवणं, वास येतो आहे असं वाटलं तर कोरडेपणासाठी माती / कोकोपिट / जुनं कम्पोस्ट घालणं इतपत. गेली काही वर्षं मी एवढेही कष्ट घेत नाही. कम्पोस्टचा डबा भरला की तो तयार कम्पोस्टमध्ये रिकामा करायचा आणि पुन्हा वापरायला घ्यायचा इतकंच करतेय. निसर्ग आपलं काम करतोच. आपल्याला फक्त कम्पोस्टच्या जवळपास दिसणार्‍या चिलटं – सोल्जरफ्लाय – गांडूळ इत्यादि जैवविविधतेकडे आणि फार पाऊस आला तर येणार्‍या वासाकडे (माझी गॅलरी वरून उघडी आहे, त्यामुळे कम्पोस्टला ऋतुमानाप्रमाणे ऊन, पाऊस मिळतंच.) डोळेझाक करावी लागते. (घराच्याच स्वच्छतेकडे डोळेझाक केली की हे आपोआप होऊन जातं. घराघरातून संकलन केलेल्या कचर्‍याचं पुढे काय होतं हे बघितलं तर हे परवडतंच.) बागेतल्या कुंड्यामध्ये घालायला माती – खत विकत आणण्याऐवजी हे कम्पोस्टच वापरता येतं आणि यात बहुतेक झाडं मस्त येतात. (जी येत नसतील ती बागेतून गायब झाली असावीत माझ्या.)


    अशा या आळशी कम्पोस्टचा अजून एक फायदा म्हणजे त्यातून बरंच काही उगवून येतं. गेल्या वर्षी टाकलेल्या आंब्यांच्या कोयीतून या वर्षी आंब्याची रोपं येतात. जांभळं, खजूर, सिताफळं, चेरी टोमॅटो अमाप येतात. कलिंगडाचे, खरबूजाचे वेल येतात. सुंदर नाजुक आळंब्या येतात. कम्पोस्टमधला खाऊ खायला आलेल्या बुलबुल आणि इतर पक्ष्यांमुळे कडुनिंब, मायाळूच्या बिया इथे पोहोचतात, त्या उगवून येतात. 

    

    या वेळी आंब्याच्या पेटीत केलेल्या कम्पोस्टमधून एक भोपळ्याचा वेल उगवून आला. प्रकाशाच्या दिशेने वाढत तो थेट गच्चीच्या दिशेने गेला, आणि शेजारच्यांच्या गॅलरीच्या ऑनिंगच्या छतापर्यंत पोहोचला. आतापर्यंत आलेल्या काकडी कलिंगड इ. वेलांना भरपूर फुलं लागली, तरी फळांमध्ये फळमाशी व्हायची त्यामुळे फळं गळून पडली होती. या वेलाला शेजारच्या ऑनिंगच्या छतावर मस्त भोपळा लागला, आणि मोठाही झाला. न केलेल्या कष्टांचं चांगलं भारी फळ मिळालंय मला. 

कोवळी पानं, फुलं सगळंच अप्राप्य 😀


पहिलं दर्शन


वेल वाळून गेल्याने आज काढला - दोन किलो तरी झालेला असावा.😊


कापल्यावर 😍


घारगे, सूप, थालीपीठ काय करावं बरं याचं?