Thursday, December 14, 2023

मध्यरात्रीनंतरचे तास

 गेले काही महिने – वर्षं माझी पुस्तक वाचायची सवय अगदी सुटली आहे. म्हणजे एके काळी Gone with the Wind किंवा Complete Short Stories of Sherlock Holmes सारखे ठोकळे आठवडाभरात हातावेगळे होत होते यावर विश्वास बसू नये अशी परिस्थिती आहे. हे प्रकर्षाने जाणवायचं कारण म्हणजे पहिल्या वाचनात आवडलं, काही तपासून बघायचंय म्हणून परत वाचण्यासाठी काढून ठेवलेलं Sapiens आणि Walden सुद्धा मी कित्येक महिन्यात वाचू शकलेले नाही. त्यामुळे नव्याने पुस्तक घेताना त्याच्या जाडीचा अंदाज घेणं आणि हे आपण नक्की वाचणार आहोत का कधी असं स्वतःला विचारणं भाग आहे. त्यात बहुसंख्य कथा – कादंबर्‍या वाचणं अजूनच अवघड जातंय. त्यामुळे ’मध्यरात्रीनंतरचे तास’ गेल्या वर्षीपासून खुणावत होती तरी मी विकत घ्यायचं टाळत होते. पण या वेळी मात्र खरेदीचा मोह आवरला नाही.
माऊला स्क्रीनची फार सवय लागतेय असं सध्या जाणवतंय, आणि मी हिटलरशाही गाजवत तिचा स्क्रीनटाईम अगदी मर्यादित केलाय. तिने खरंच स्क्रीनमध्ये डोकं घालून बसायचं नसेल, तर मलाही लॅपटॉप / मोबाईलपासून दूर रहायला हवंय, तिच्या बाबाने टीव्ही बंद करायला हवाय हे लक्षात आल्याने सध्या घरात स्गळेच स्क्रीन बर्‍यापैकी विश्रांती घेताहेत. माझ्या फतव्याचा फायदा तिला किती होणार माहित नाही, पण मला नक्की होतोय. स्क्रीन नाही म्हटल्यावर चार – पाच दिवसात हातावेगळं झालं हे पुस्तक. आणि आपण आता पुस्तक वाचू शकत नाही ही माझी चिंता दूर झाली.

सलमा या तमीळ लेखिकेच्या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचा हा सोनाली नवांगुळने केलेला मराठी अनुवाद. अनुवाद, त्यातुनही अनुवादाचा अनुवाद म्हणजे बोजड भाषा आणि कानगोष्टींच्या खेळाप्रमाणे अर्थाचा अनर्थ हे दोन्ही धोके असतात. पण असा कुठला खडा दाताखाली येत नाही हे सोनालीचं मोठं यश आहे. खरोखर सुंदर ओघवता झालाय अनुवाद. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय हे अगदी योग्य आहे.

तमिळनाडूमधल्या एका लहान खेड्यातल्या मुस्लीम कुटुंबातल्या नऊ दहा वर्षांच्या मुलीची ही गोष्ट. फक्त तिचीच नाही, तर तिच्या अजुबाजूच्या सगळ्यांचीच. जिथे पाळी आलेल्या मुलीला शाळेसाठीसुद्धा घराबाहेर पडायची संधी नाही, अशा वातावरणात काय घडू शकणार आहे? किती मर्यादित अनुभवविश्व असणार तिचं! खरं सांगते, राबियाच्या गोष्टीत पाचशे पानांची एखादी कादंबरी होण्याइतकं काही असू शकेल असं मला वाटलं नव्हतं. आधीच सध्या पुस्तकं वाचायला अवघड जाताहेत, त्यात हे नक्की बोअर होणार आणि बाजूला पडणार अशी भीती वाटत होती मला. पण पुस्तक हातात घेतलं आणि आठवडाभरात वाचून झालंही!

प्रवास, नव्या गोष्टी शिकणं, स्वतःला व्यक्त करणं, नवे अनुभव घेणं या सगळ्या माझ्या जिव्हाळ्याच्या गोष्टी. जिथे यातलं काहीच करायचं स्वातंत्र्य नाही त्या आयुष्याची कल्पनाही माझा जीव दडपून टाकते. असं जगणं वाट्याला आलेल्या, आणि त्याला आपापल्या पद्धतीने सामोर्‍या जाणार्‍या किती स्त्रिया या पुस्तकात भेटतात. त्यांच्या दृष्टीकोनातून दिसणारे त्यांच्या घरातले / ओळखीचे पुरुष भेटतात. बंद दरवाजांच्या आतल्या जगण्याचं विश्वरूपदर्शन होतं. ’कैरो ट्रायलॉजी’ वाचताना जी जबरदस्त घुसमट जाणवली होती त्याची आठवण झाली ही कादंबरी वाचताना. जरूर वाचा असं सुचवेन.  

मध्यरात्रीनंतरचे तास
सलमा
अनुवाद: सोनाली नवांगुळ
मनोविकास प्रकाशन

1 comment:

aativas said...

मागच्या वर्षी ही कादंबरी आवर्जून वाचली. विकत घेऊन वाचली. (आजही संग्रहात आहे.)

कादंबरी आवडली, पण पात्रांची संख्या खूपच जास्त आहे त्यामुळे कुणाचं काय आणि कोण हे मी बऱ्यापैकी विसरून जायचे पानं ओलांडताना. पुस्तकात वेदनेचा स्वर कायम आहे. तो कधीकधी जिव्हारी लागतो. कादंबरीची भाषा आक्रमक नसली तरी ओघात स्त्री सबलीकरणाविषयीचे अनेक मुद्दे सहज येतात. मुस्लिम स्त्रियांचं – गावातल्या पारंपरिक कुटुंबातल्या मुस्लिम स्त्रियांचं – आयुष्य कसं असतं याची फार चांगली कल्पना या कादंबरीतून येते हे मात्र खरं.

सोनाली नवांगुळ यांचा अनुवाद वाचताना कुठंही अडखळायला होत नाही - हे अनुवादाचं यश आहे.

त्यातलं 'पनीरचं झाड' म्हणजे नक्की कोणतं झाड याबाबत शेतीवाल्या मित्रमंडळींकडं चौकशी केली होती, तेही आठवतंय 😊