Friday, December 3, 2010

Out of mind notification

आपुन का भेजा खेकडे के माफिक वाकडा चलता है. तर सध्या जीव चाकोरी सोडून दगडाधोंड्यात जाऊन पडण्यासाठी तडफडतोय. आजचा शेवटचा दिवस पाट्या टाकायचा. ‘out of office' सुद्धा लावून झालं तिकडे. म्हणून म्हटलं इकडे पण एक ‘out of mind' लावून टाकावं. आता दोन महिने ऑफिस, काम, लॅपटॉप, नेट या सगळ्याशी घेणं नास्ति आणि देणं नास्ति. बघू खेकड्याच्या आत काही सापडतंय का ते.


*********************************************

सॉफ्टवेअरच्या कोर्सचे शेवटचे दिवस. ‘कॅम्पस’ जोरात चाललेले. प्रत्येक कॅम्पसच्या निकालाबरोबर एक एक ग्रूप ढवळून निघत होता. वर्गातली सगळी समीकरणं बघता बघता बदलत होती. आजवर एकमेकांवर खुन्नस खाऊन असणारे एका कंपनीमध्ये जॉब मिळाल्यावर अचानक जानी दोस्त बनत होते. पहिले नोकरी मिळवलेले वर्गातल्या टॉपरसमोर माज दाखवून घेत होते. अजून जॉब न मिळालेले प्रत्येक निकालाबरोबर जास्त जास्त खोलात. सांधा बदलून वर्गातल्या अश्वस्त मैत्रीमधून नोकरीच्या अनोळखी विश्वात पाऊल टाकण्याचे दिवस. मी अजून धडपडतच होते. नोकरी केलीच पाहिजे का, आणि मुंबईला नोकरी करायची का या दोन शंकांमुळे धड मनापासून प्रयत्न करत नव्हते, आणि एकीकडे आजुबाजूच्या बाकीच्यांना नोकरी मिळेल तसतशी अस्वस्थ. एव्हाना मी लकी आहे - माझ्याबरोबर इंटरव्ह्यूला जाणार्‍याचं की हमखास सिलेक्शन होतं अशी माझी ख्याती झाली होती.

एका इंटरव्ह्यूला मी एकटी गेले होते, त्यामुळे माझी सोबत मलाच लकी ठरली असावी - तर सिलेक्शन झालं. एकीकडे जीव भांड्यात पडला, दुसरीकडे तडाजोडीची नोकरी, तीही मुंबईत म्हणून नाराजी. कोर्स संपला. पंधरा दिवसांनी नोकरी सुरू होणार, तोवर पुण्याला आले. पुण्यात प्रयत्न करून बघावा असा विचार होता. त्यासाठी कुठे जायचं, कोण मदत करू शकेल याची माहिती शून्य. पंधरा दिवस धडपड करून काहीच हाताला लागलं नाही, आणि निरुपायाने मुंबईला जॉईन करण्यासाठी मी सामानाची बांधाबांध सुरू केली. आयुष्यात नियोजनापेक्षा योगायोगानेच इतक्या गोष्टी होत असतात ... याही वेळी त्याचा अनुभव आला. निघायच्या काही तास आधी पुण्यातल्या कंपनीची सिलेक्शनची मेल आली. दुसरंच काहीतरी करायचा मानस असताना मी अशी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात येऊन पोहोचले.

नाइलाजाने सुरू केलेल्या नोकरीत हळुहळू प्रगती होत गेली. जवाळचे मित्रमैत्रिणी मिळाले, कामाचं चीज झालं, जास्त जबाबदारीचं काम मिळत गेलं. काहीही प्रयत्न न करता मोठ्या, पूर्वीपेक्षा जास्त प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली. अजून वेगळा अनुभव, नव्या संधी मिळाल्या. या सगळ्याच्या जोडीला कामाच्या वाढत्या ताणाची जाणीव, कामाच्या वेळावर नियंत्रण नसणं, कधी विनाकारण संधी डावलली जाणं हेही. आज नोकरीने मला काय दिलं याचा विचार करताना जाणवतं ते म्हणजे मी कितीही नाकारलं, तरी हातात काहीच नव्हतं तेंव्हा शून्यातून सुरुवात करून या क्षेत्राने मला ओळख दिली, आर्थिक बाजू संभाळून धरली. वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी दिली. प्रोफेशनलिझम दिला, आत्मविश्वास दिला.

त्याच वेळी आपल्याला काय हवंय हे शोधण्याची आचही काहीशी कमी झालीय, वर्षानुवर्षाच्या सवयीतून आहे हे असंच चालू ठेवणं सोयीचं आहे असा एक इनर्शिया आलाय. सुरक्षिततेची सवय लागलीय. आपल्या आयुष्यातली इतकी वर्षं ज्याची मनापासून पॅशन नाही अश्या कामाला दिलीत, पुढचीही सगळी वर्षं द्यायची का हा प्रश्न आता छळतोय. इतके दिवस रूटीनच्या वेगामध्ये मागे टाकलेले सगळे प्रश्न फेर धरताहेत.

तर मी वाट बघत होते ती ‘मोठी सुट्टी’ अखेरीस सुरू होणार. आज कामाचा शेवटचा दिवस. पुढचे दोन महिने सध्याच्या रुळलेल्या चाकोरीपासून जास्तीत जास्त दूर जाऊन स्वतःच्या जवळ जायचा प्रयत्न आहे.