Friday, February 11, 2011

कार्यरत: रायनर

    आपल्या जवळपास काही माणसं असतात. न बोलता, शांतपणे त्यांचं काम चाललेलं असतं. या माणसाचं केवढं ग्रेट काम आहे, ते आपल्याला नुसतं बोलून भेटून कधी समजणारही नाही. अशीच काही माणसं भटकंतीमध्ये भेटली, तर काही या भटकंतीच्या आधी भेटलेली आता या सगळ्याचा विचार करताना आठवली. सर्च किंवा हेमलकसा इतकं त्यांचं काम मोठं झालेलं नाही, पण आपल्याला जमेल तेवढं, जमेल तसं काम कसं करावं, ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्याविषयी लिहिल्याशिवाय या भटकंतीची गोष्ट पूर्ण होणार नाही. - तर या विषयावरची ही पहिली पोस्ट.
*************************************************************
    संगणकक्षेत्रातलं काम म्हणजे दर प्रोजेक्टला नवी विटी, नवं राज्य. दर वेळी नवी टीम, नवे सहकारी. कधी कधी खूप इंटरेस्टिंग माणसं भेटतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं, पण काम संपलं, म्हणजे सगळे इतक्या वेगाने पांगतात, की कितीतरी सुंदर ओळखी मैत्रीमध्ये बदलण्यापूर्वीच संपून जातात. रायनर माझा असाच एका प्रोजेक्टमधला सहकारी. एक ‘दीर्घकालच्या मैत्रीमध्ये बदलू शकली असती तर खूप आवडली असती’ अशी ओळख.

    आमच्या ओळखीची सुरुवात फारशी उत्साह वर्धक नव्हती. खरं तर रायनर एका दुसऱ्या कंपनीचा. आमच्या कंपनीने त्यांना टेकओव्हर केलं, आणि मनात नसताना रायनर या कंपनीत येऊन पोहोचला. त्यात त्याचा प्रोजेक्ट ऑफशोअरिंगसाठी निवडला गेलेला, आणि मी ‘ऑफशोअर’वरून आलेले. गेली दहा वर्षं जे काम मी करतो आहे, ते कोणी भारतात बसून करून दाखवेल यावर त्याचा विश्वास नव्हता, आणि दुर्दैवाने आमची ऑफशोअर टीमसुद्धा त्याचं म्हणणं खरं करून दाखवत होती. त्यामुळे आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी ‘ही आता आणखी कशाला इथे’ असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण चार माणसांच्या त्याच खोलीत मला बसायला जागा मिळाली, आणि सहवासातून हळुहळू एकमेकांची ओळख होत गेली. थोडं काम आम्ही एकत्र केलं, आणि "together we make a great team" हे दोघांनाही पटलं. माझा जर्मनचा सराव करण्याचा बेत त्याच्या इंग्रजीच्या सराव करण्याच्या इच्छेपुढे बारगळला.

    रायनरच्या मशीनचा वॉलपेपर म्हणजे आल्प्सच्या पार्श्वभूमीवर एक रेस्क्यू हेलिकॉप्टर असा फोटो. थोडासा धूसर. आवर्जून वॉलपेपर म्हणून निवडावा असं काही मला त्या फोटोविषयी वाटलं नाही, त्यामुळे एकदा सहज त्याला विचारलं. तरूणपणी आल्प्समध्ये गिर्यारोहण करताना त्याला एकदा अपघात झाला, पाय मोडला. हा फोटो त्याच्यासाठी आलेल्या रेस्क्यू हेलिकॉप्टरचा. त्या हेलीकॉप्टरच्या खाली लोंबकळत त्याला हॉस्पिटलपर्यंत आणलं गेलं. त्यानंतर कित्येक महिने तो अंथरुणाला खिळून होता. नंतर सुदैवाने पूर्ण बरा झाला, पण हा फोटो समोर असला, म्हणजे ‘परिस्थिती तितकी वाईट नक्कीच नाही’ याचं स्मरण होतं, म्हणून अजूनही तो फोटो त्याच्या वॉलपेपरला होता.

    युरोपातली झाडं मला अनोळखी. त्यामुळे हिवाळा संपून वसंत सुरू झाला, आणि एका एका खराट्याचं झाडात रूपांतर व्हायला लागलं, तसतसा मी दिसतील त्या झाडांचे फोटो काढून ‘हे कुठलं झाड’ म्हणून रायनरला विचारायचा सपाटा लावला. त्या वर्षी उन्हाळा खूप मोठा, फारसा पाऊस नसलेला होता. दर शनिवार- रविवारी कॅमेरा आणि पाण्याची बाटली घेऊन माझं फुलांचे फोटो काढत भटकणं चाललं होतं. गुलाबी हॉर्स चेस्टनटच्या सुंदर फुलांचा फोटो मग रायनरने मला काढून आणून दिला.

    कितीही काम असलं, तरी रायनर आठवड्याचे तीन दिवस साडेपाचच्या पुढे ऑफिसमध्ये बसत नाही याचं मला आश्चर्य वाटायचं. नंतर समजलं - हे तीन दिवस तो स्वाहेली शिकायला जातो. याला एकदम स्वाहेली का बरं शिकावंसं वाटावं? मी विचार करत होते. तर केनियामधलं एक खेडं याने दत्तक घेतलंय. तिथे शाळा सुरू केलीय, तिथल्या दवाखान्यालाही मदत चालू आहे. बसल्या जागेवरून तिथे पैसे पाठवण्यापुरता त्याचा सहभाग मर्यादित नाही. दर वर्षी सुट्टीमध्ये रायनर आणि क्लाउडिया - त्याची बायको - स्वतः या गावाला भेट देतात. तिथल्या लोकांशी संवाद साधणं सोपं जावं म्हणून हा स्वाहेली शिकत होता! या कामासाठी नवरा- बायको दोघं मिळून एक संस्था चालवतात. रायनरने संस्थेसाठी वेबसाईट तयार केलीय. हे सगळं करताना आपण काही फार मोठं ग्रेट करतोय असा कुठलाच भाव नाही, त्याचं ओझं नाही. आपल्या शाळेविषयी तो जितक्या प्रेमाने बोलतो, तितक्याच प्रेमाने दुपारी ऑफिसमधल्या पोरांबरोबर ‘किका’ (फूसबॉल) खेळणार. ऑफिसच्या खोलीत दंगा करणार, रोज जिन्समध्ये येणार्‍या एका सहकार्‍याला कस्टमर व्हिजिटसाठी कडक फॉर्मलमध्ये यावं लागल्यावर दिवसभर त्याला चिडवून भंडावून सोडणार. एकदा एक सहकारी आमच्या या दंगेखोर खोलीमध्ये काहीतरी डिस्कस करायला आली, आणि दीड तास अखंड एकसूरी बडबडात होती. ती खोलीच्या बाहेर पडल्याबरोबर मी रायनरला म्हटलं, आमच्याकडे हिंदीमध्ये म्हणतात "इतनी बाते करनी होती तो भगवान ने दो मुह और एक कान दिया होता।". रायनरने हे खोलीतल्या व्हाईट बोर्डवर रोमन लिपीत लिहून घेतलं, आणि दुसर्‍या दिवशी ती बाई आल्यावर त्याचा हिंदीचा जोरदार ‘अभ्यास’ सुरू झाला. हे वाक्य गाण्यासारखं चालीवर म्हणून त्याने खोलीतल्या बाकी तिघांना चेहेरे सरळ ठेवणं अवघड करून ठेवलं. यापुढे कधी त्या बाईने आमच्या खोलीत यायची हिंमत केली नाही :)

    आपल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या तिथल्या अवतारात रायनरची निवड झाली. आमच्या खोलीतल्या दंग्यात केबीसीच्या तयारीची भर पडली. अचानक "भारतामध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणारं राज्य कुठलं?" यासारखे प्रश्न आमच्यावर बरसायला लागले. जय्यत तयारीनिशी रायनर शोच्या शूटिंगसाठी गेला. जाताना त्याला विचारलं, जिंकलेल्या पैशांचं काय करणार? "घराची दुरुस्ती आणि शाळेसाठी फर्निचर" रायनरचं शांत उत्तर. सगळे पैसे मलाच हवेत असा हव्यास नाही, आणि सगळे शाळेसाठी वापरून नंतर मग थोडे घराला हवे होते म्हणून हळहळणं नाही. मनात म्हटलं, देवा याला मिळू देत दहा लाख युरो. तो पैसा कसा वापरायचा ते याच्याएवढं कुणाला समजत नसेल. रायनर तिथे शेवटून तिसर्‍या प्रश्नापर्यंत यशस्वीरित्या पोहोचला, आणि ते पैसे त्याने नक्कीच आधी ठरवल्याप्रमाणे वापरले असतील अशी खात्री वाटते.

    ऑनसाईट असाईनमेंट संपवून परतताना रायनरला म्हटलं, तुझा मला हेवा वाटतोय. मला जे करावंसं वाटतं पण अजूनही माझ्या वेळेच्या, पैशाच्या गणितात बसत नाही, ते सगळं तू आज जगतो आहेस!

20 comments:

माया said...

खरं आहे गौरी, आपल्याला वेळ नि पैसा याच्या गुंत्यातून वेळ मिळाला तरी कम्फर्ट सोडायला जी ताकद लागते ती कमी पडते...

खूप छान लिहिलंय तू ! अजुउन लिही. :)

माया said...

खूप छान लिहिलं आहेस गौरी !

खरं आहे तुझं.. पैसा आणि वेळ यांचा गुंता सुटला तरी कम्फर्ट सोडायला लागणारी ताकद कमी पडते. वेगळं जगण्याची नुसती आस असुन् भागत नाही. तशा जगण्याकडे जाणारं एकेक पाउल एकेका कड्या एवढं वाटतं.

Unknown said...

lekhanshaili chan ahe. ashi manse bhetnyacha yog yen hi pan changli gosht ahe...

Unknown said...

lekhanshaili mala awadli.

Gouri said...

माया, कम्फर्ट सोडायला लागणारी ताकद कमी पडते हे खरंच. सुखसोयींची आपल्याला इतकी सवय झालेली असते, की त्याच्याशिवाय जगणं मुष्कील वाटतं.
मला रायनरचं काम आवडलं, कारण स्वतःची ही मर्यादा त्याला समजते, आणि त्या मर्यादेत राहूनही तो काहीतरी काम करतोय. हे त्याच्या जगण्याचा सहज भाग बनलंय.
पु लंच्या ‘तुझे आहे ... ’ मधल्या काकाजींच्या शब्दात सांगायचं, तर तो बरोबर आपली पट्टी पकडून गातोय.

Gouri said...

पूर्णिमा, ब्लॉगवर स्वागत! अशी माणसं भेटण्याचा योगही आपल्या भाग्यात असायला लागतो हे खरंच. या बाबत मी फार नशीबवान आहे असं मला वाटतं.

हेरंब said...

मलाही रायनरचा प्रचंड हेवा वाटतोय.. आणि तुझाही (संदर्भ : आधीच्या दोन पोस्ट्स.)

Gouri said...

हेरंब, :)

अपर्णा said...

अशा सर्वच ज्ञात अज्ञात माणसांना सलाम आणि बोलती बंद आहे हे सगळं(संदर्भ : आधीच्या दोन पोस्ट्स.) वाचून तरी गौरी तुझ्या दृष्टीच कौतुक केल्याशिवाय राहवत नाही ग....
जियो...मला वाटत लवकरच तू काही वेगळ करत असशील....काय ग ओळख दाखवशील न तेव्हा?? :)

Gouri said...

अपर्णा, एवढं ग्रेट नाही, पण आपल्याला झेपेल असं काही सुरू करावंस फार वाटतंय ग ... बघू कसं जमतंय ते.

Anagha said...

काय माहित, ह्याच्या एक पट तरी हातून काही घडणार आहे की नाही आयुष्यात!
सुंदर झाली आहे पोस्ट... :)

Gouri said...

अनघा, अग मला वाटतं आपण आपल्याला झेपेल इतपत प्रयत्न करायचा. प्रत्यक्षात किती गोष्टी घडतात आणि किती मोठं काम होतं ते आपल्या हातात कुठे आहे?

Harshad Samant said...

खूप छान लिहिलंय..
-http://harshadsamant.wordpress.com

Gouri said...

ब्लॉगोबा, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी आभार!

Anonymous said...

गौरी ...

जे वाटतय ते करायलाच हवं ही उर्मी अजून चांगली जोरदार मनात दाटण्याच्या क्षणाची नुसती वाट पहायची की हाच तो क्षण हे स्वत:ला पटवायचे असा काहिसा संभ्रम आहे मनात...
कारण जरा जास्त रेंगाळला हा संभ्रम की अजून मुलं लहान आहेत, जरा निदान स्वत:साठी गंगाजळी साठवूया वगैरे कारणं चटाचट पुढे येतात...


मग हातात रहाते ते रायनर सारख्यांचे कौतूक करणे :)... ठीक आहे निदान ते तरी करूया... कौतूक तुझेही अगदी मनापासून :)

Gouri said...

तन्वी,
खरंच अवघड प्रश्न आहे. आतून, मनापासून वाटल्याशिवाय करून उपयोग नाही, आणि नुसतीच वाट बघण्यात वेळ निघून गेली म्हणून नंतर पश्चात्ताप करत बसण्याची वेळ न यावी. आपल्याला स्वतःलाच ही उत्तरं स्वतःपुरती शोधावी लागणार. तोवर, आणि नंतरही रायनरसारख्यांचं कौतुक तर करायलाच हवं - म्हणजे आपल्याला काय करायचंय याची आठवण राहते.

Ravi said...

My God गौरी, किती छान लिहील आहेस.. असे acquaintances होण हि पण खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि हि लोक जितक्या सहज काही दिवस आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात ना.. तितक्याच easily समुद्रातल्या ओंडक्या प्रमाणे वेगळे पण होऊन जातात..

Gouri said...

रवी, धन्यवाद! रायनरची ओळख झाली हे खरंच माझं नशीब. आणि ती असाईनमेंट संपल्यावर पुन्हा त्याचा माझा काही संबंध नाही!

विशाखा said...

Khoop aawadli post! Vyaktichitra agadi jamlay. Hyat of course, ek great vyakti eka great lekhike la bhetane, ha dugdhsharkara yog ahech!

Gouri said...

विशाखा, इतकी जुनी पोस्ट कुणी वाचतंय हे बघून छान वाटलं :)
तुमच्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा या पोस्टची आठवण झाली आणि लक्षात आलं ... अजून बर्‍याच लोकांविषयी लिहायचं ठरवलं होतं, ते राहूनच गेलं ... त्यांच्या नोंदीही करून ठेवल्या नाहीत, आता लिहायला आठवणारही नाही :(