‘समिधा’ जवळ नव्हतं त्यामुळे अजून काही कविता इथे टाकायच्या राहिल्या होत्या. ही त्यातली एक.
**********************************************************
सारंगिया
नाही, आपण समजता ते खरे नाही.
किनखापी गवसणीतून माझी सारंगी बाहेर पडते ती धनासाठी नव्हे.
तारांच्या या समुदायावरून माझी धनुकली फिरू लागते ती आपले मनोरंजन कराण्यासाठी नव्हे.
त्या उभयतांच्या मीलनातून मी मधुर रागरागिण्यांची बरसात करतो ती कीर्तीसाठी नव्हे.
मला धन मिळत असेल, कीर्ती मिळत असेल आणि आपले मनोरंजनही होत असेल.
पण यातील कोणत्याही गोष्टीसाठी मी सारंगीला स्पर्श करीत नाही.
मी सांगणार आहे ते आपल्याला खरे वाटणार नाही कदाचित्, पण ते खरे आहे.
सारंगीतून निघणारे स्वर मला दिसतात म्हणून मी सारंगी वाजवतो. ते पुनःपुन्हा दिसावेत म्हणून मी सारंगिया झालो.
मोहळाला स्पर्श करताच त्यातून असंख्य मधमाशा चारी दिशांना उडू लागल्या,
त्याप्रमाणे माझ्या धनुकलीचा तारांना स्पर्श होताच त्यांमधून ध्वनि-लहरींचा एक जथा बाहेर पडून उडू लागतो.
तारांवर बसलेली लहान लहान पाखरेच जणू माझी धनुकली उठवून देते!
काही स्वरलहरी पाण्याच्या धारेसारख्या रुपेरी असतात, काही रमणींच्या गालांवरील लज्जेप्रमाणे आरक्त असतात, काही फुललेल्या अंगाराप्रमाणे ताम्रवर्ण असतात, काही सोनेरी असतात, काही चांदण्यासारख्या चंदेरीही असतात.
मी तार छेडली की या विविधरंगी ध्वनिपुष्पांचा दाट मांडव माझ्याभोवती घातला जातो.
आणि एका विलक्षण आनंदाने माझे अंतःकारण बेहोष होते.
माझ्या हातातली धनुकली तारांवर फिरत असते आणि माझे मिटलेले डोळे त्या सुंदर लहरींचा मागोवा घेत असतात.
नृत्यांगना आपल्या झिरझिरीत वस्त्राचा पिसारा फुलवते त्याप्रमाणे त्या स्वरलहरी आपल्या रंगाचा सुरम्य विस्तार करतात.
आणि नाचत नाचत, हासत खेळत, गात आणि गुणगुणत, मागे वळून पाहात, खाली वाकून बघत,
मेघमंडलापर्यंत जातात आणि अंतर्धान पावतात.
हे अलौकिक दृष्य पुनःपुन्हा दिसावे म्हणून मी सारंगिया झालो.
7 comments:
खुपच छान :-)
माझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://www.prashantredkarsobat.blogspot.com/
सुरेख. स्वत:शी प्रामाणिक असणाRया कलाकाराचे मनोगत वाचतो आहे असे वाटले. इतर कविताही वाचतो आहे, इथे दिल्याबद्दल अनेक आभार. :)
प्रशांत, प्रतिक्रियेसाठी आभार!
राज, खरंय. असं फक्त स्वतःच्या आनंदासाठी केलेलं आणि इतरांना आनंद देणारं काहीतरी आयुष्यात असावं, नाही का?
सुंदर ! स्वत:शी प्रामाणिक राहून सादर केलेल्या कलेची गोष्टच आगळीवेगळी ! अद्वितीयच ! हो ना ?! :)
:-)
अनघा, अगदी. आणि कला प्रथम आपल्या आनंदासाठी आहे, टाळ्या, पैसा, कीर्ती गौण हे समजणं किती सुंदर आहे!
Post a Comment