Wednesday, September 28, 2011

घटस्थापना (?)

    महाशिवरात्रीची व्याधाची गोष्ट आपल्याला माहित असते.
    शिकारीसाठी झाडावर बसलेला असताना समोरचं नीट दिसावं म्हणून तो समोरची पान तोडत होता. योगायोगाने ते झाड बेलाचं होतं. योगायोगाने झाडाखाली महादेवाची पिंड होती. आणि योगायोगानेच तोडलेली पानं पिंडीवर पडत होती. त्यामुळे शंकर व्याधाला प्रसन्न झाला इ.इ.
    योगायोगाने परवा गहू निवडले, आणि त्यातला कचरा केराच्या टोपलीत टाकण्याऐवजी चिमण्या खातील म्हणून बाहेर कुंडीत टाकला. योगायोगाने चिमण्यांनी तो खल्ला नाही,आणि योगायोगानेच नेमके घट बसण्याच्या दिवशी त्या गव्हाला मस्त कोंब आलेत.


    पण देवी म्हणजे काही भोळा सांब नव्हे. माझं पाखंडीपण तिला चांगलंच माहित आहे. ती मला प्रसन्न होईल अशी उगाचच आशा लावून बसू नये. :)

*****************************************
रच्याकने, आमच्या कासवाने आज चक्क शंभरी गाठलीय. ही माझी शंभरावी पोस्ट. त्यातल्या १० -१२ पोस्टा आवडत्या कवितांच्या आहेत ते सोडा ... ‘मी लिहिलेली शंभरावी पोस्ट’ कुठे म्हटलंय ;)

Tuesday, September 27, 2011

सोनकी

    कासविषयी सुहासने इथे लिहिलंय.

    अनघाने इथे लिहिलंय. आणि देवेंद्रने इथे.

    बाकीच्यांचं लिहून व्हायची मी वाट बघते आहे ... म्हणजे त्यांचेही दुवे इथे देता येतील. :)

    हे सगळं वाचून अजून काही कासच्या फुलांविषयी वाचायचा धीर असेल तर तुमच्यासाठी ही पुढची गोष्ट.

**************************
   
       घाटाच्या माथ्यावरचं एक छोटंसं गाव. घाटात लावलेलं रेल्वेचं इंजिन इथे काढतात म्हणून रेल्वेच्या नकाशात महत्त्वाचं. बाकी जगासाठी अनेक खेड्यातलंच एक खेडं. गावात बाहेरचे लोक म्हणजे रेल्वेवाले. त्यांची मोठी कॉलनी, त्यांचाच दवाखाना. एवढ्या संथ गावात राहून कंटाळणारी ही माणसं. आपल्यातच गट करून राहणारी, त्या गटातल्या पार्ट्या, हेवेदावे, राजकारण हेच त्यांचं मन रिझवण्याचं साधन.

    या सगाळ्या वातावरणात अजिबातच फिट न होणारं एक तरूण जोडपं. वाचन, संगीत, गावाच्या जवळपासची भटकंती ही त्यांची करमणूक. गावाजवळची गोल टेकडी तर विशेषच प्रेमाची. अगदी रोज फिरायला जाण्याची जागा. फिरायला जाताना शेजारच्या आंबेमोहोराच्या शेतांमधून घमघमाट यायचा. आणि टेकडीवरची रानफुलं तर वेड लावायची.

    नोकरीमध्ये बदली झाली, गाव सुटलं. पुढचं दाणापाणी मोठ्या शहरात लिहिलेलं होतं. पण ती टेकडी, तिथे फिरायला जाणं, आणि ती रानफुलं कायमची मनात घर करून राहिली.

    ते गाव कधी न बघितलेल्या त्यांच्या लेकीने या रानफुलांची एवढी वर्णनं ऐकली, की न भेटताच ती ओळखीचीच वाटायला लागली तिला. 

    कासच्या पठारावरच्या रानफुलांमधली ही सगाळ्यात कॉमन रानफुलं असावीत. सोनकीची. (senecio grahami)
 पण त्यांच्याविषयी इतकं ऐकलंय, की ती फार स्पेशल आहेत माझ्यासाठी. 

Tuesday, September 20, 2011

गुंता




पॉवर शिवाय काय चालणार? ती पाहिजेच.
जग कुठे चाललंय याचं भान हवं असेल तर कनेक्टिव्हिटी मस्टच. त्याखेरीज काम कसं चालणार?
आणि सिक्युरिटी म्हणजे नॉन निगोशिएबलच की.

या सगळ्या सोसापायी मग असा गुंता तयार होतो. 

Saturday, September 10, 2011

अंताजीची बखर आणि बखर अंतकाळाची

    शाणपट्टीवरच्या आळश्यांच्या राजाच्या मागणीवरून नंदा खरे यांनी लिहिलेली ही पुस्तकं विकत घेतली, तेंव्हा अंधुक कल्पना होती हा पेशवाईच्या काळाचा ‘वर्म्स आय व्ह्यू’ आहे म्हणून. मागच्या आठवड्यात ‘अक्षरधारा’मध्ये दोन्ही पुस्तकं मिळाली, आणि वाचत सुटले. लेखकाने नागपूरकर भोसल्यांच्या बंगालवरच्या स्वार्‍यांपासून ते प्लासीच्या लढाईपर्यंत (१७४० ते १७५७) आणि नंतर पेशवाई बुडेपर्यंत (१८१८) चा काळ या दोन पुस्तकांमध्ये मिळून मांडलाय.

    थोरल्या बाजीरावानंतरची पेशवाई हा काही आपल्या इतिहासातला गौरवकाळ नव्हे. परीक्षेच्या अभ्यासापलिकडे आवर्जून या काळाविषयी काही वाचावं असं कधी वाटलं नव्हतं. पण तरीही, एवढा मोठा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा बघता बघता कोसळतो कसा? एवढे शहाणे होते का इंग्रज आपल्यापेक्षा? अख्ख्या हिंदुस्थानात त्यांच्या तोडीचं शहाणपण सापडू नये? ही उत्सुकता होतीच. आणि परीक्षेच्या अभ्यासात फारश्या न डोकावणार्‍या सामाजिक इतिहासाचीही.

    एखादं पुस्तक वाचताना फार त्रास होतो, आणि तरीही पुस्तक खाली ठेववत नाही. ‘अंताजीची बखर’ वाचताना हे झालं, आणि ती संपल्याबरोबर ‘बखर अंतकाळाची’सुद्धा लगे हाथ वाचणं भाग पडलं. एखादं दुःस्वप्न बघावं आणि ते संपून जाग येण्याची शक्यताच न उरावी - हे स्वप्न नसून सत्यच आहे हे जाणवावं, असं काहीसं.

    पुस्तकं केवळ मनोरंजनापुरती नाहीत. त्यात लेखकाचा अभ्यास दिसतो. पण पब्लिकला निरस किंवा जड वाटणार्‍या शोधनिबंधाऐवजी एका सामान्य बारगीराच्या भूमिकेतून बखरीच्या बाजात तो मांडल्यामुळे पानं कशी उलटली जातात हे समजतही नाही.

    इतिहासाची, त्यातही मराठी इतिहासाची आवड असेल, तर ही पुस्तकं आवश्य वाचा. प्रत्येक ऐतिहासिक पुरुषाला महामानव बनवणार्‍या गोडगट्ट ‘ऐतिहासिक’ कादंबर्‍यांची आवड असेल, तर या पुस्तकांच्या वाटेला न गेलेलंच बरं. कारण यात हाडामांसाची माणसं आहेत. त्यांच्यात गुण आहेत तसेच दोषही आहेत. अंताजी कुणालाच देव्हार्‍यात बसवत नाही. सार्‍यांचीच कुलंगडी माहित असणारा तो एक खबर्‍या. तो कुणाचाच भाट नाही. सामान्य माणसाचं शहाणपण त्याच्या बोलण्यातून दिसतं. म्हणून अंताजी वेगळा वाटतो.

या दोन्ही पुस्तकांची सुंदर विस्तृत परीक्षणं ‘मिसळपाव’वर  इथे आणि इथे उपलब्ध आहेत. मला पुस्तक वाचण्यापूर्वी त्याच्याविषयी काही वाचायचं नव्हतं, त्यामुळे आता वाचलीत.

**********************************************************
अंताजीची बखर
लेखक: नंदा खरे
मनोविकास प्रकाशन
मूल्य: २५० रुपये

बखर अंतकाळाची
लेखक: नंदा खरे
मनोविकास प्रकाशन
मूल्य: २५० रुपये