Saturday, September 10, 2011

अंताजीची बखर आणि बखर अंतकाळाची

    शाणपट्टीवरच्या आळश्यांच्या राजाच्या मागणीवरून नंदा खरे यांनी लिहिलेली ही पुस्तकं विकत घेतली, तेंव्हा अंधुक कल्पना होती हा पेशवाईच्या काळाचा ‘वर्म्स आय व्ह्यू’ आहे म्हणून. मागच्या आठवड्यात ‘अक्षरधारा’मध्ये दोन्ही पुस्तकं मिळाली, आणि वाचत सुटले. लेखकाने नागपूरकर भोसल्यांच्या बंगालवरच्या स्वार्‍यांपासून ते प्लासीच्या लढाईपर्यंत (१७४० ते १७५७) आणि नंतर पेशवाई बुडेपर्यंत (१८१८) चा काळ या दोन पुस्तकांमध्ये मिळून मांडलाय.

    थोरल्या बाजीरावानंतरची पेशवाई हा काही आपल्या इतिहासातला गौरवकाळ नव्हे. परीक्षेच्या अभ्यासापलिकडे आवर्जून या काळाविषयी काही वाचावं असं कधी वाटलं नव्हतं. पण तरीही, एवढा मोठा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा बघता बघता कोसळतो कसा? एवढे शहाणे होते का इंग्रज आपल्यापेक्षा? अख्ख्या हिंदुस्थानात त्यांच्या तोडीचं शहाणपण सापडू नये? ही उत्सुकता होतीच. आणि परीक्षेच्या अभ्यासात फारश्या न डोकावणार्‍या सामाजिक इतिहासाचीही.

    एखादं पुस्तक वाचताना फार त्रास होतो, आणि तरीही पुस्तक खाली ठेववत नाही. ‘अंताजीची बखर’ वाचताना हे झालं, आणि ती संपल्याबरोबर ‘बखर अंतकाळाची’सुद्धा लगे हाथ वाचणं भाग पडलं. एखादं दुःस्वप्न बघावं आणि ते संपून जाग येण्याची शक्यताच न उरावी - हे स्वप्न नसून सत्यच आहे हे जाणवावं, असं काहीसं.

    पुस्तकं केवळ मनोरंजनापुरती नाहीत. त्यात लेखकाचा अभ्यास दिसतो. पण पब्लिकला निरस किंवा जड वाटणार्‍या शोधनिबंधाऐवजी एका सामान्य बारगीराच्या भूमिकेतून बखरीच्या बाजात तो मांडल्यामुळे पानं कशी उलटली जातात हे समजतही नाही.

    इतिहासाची, त्यातही मराठी इतिहासाची आवड असेल, तर ही पुस्तकं आवश्य वाचा. प्रत्येक ऐतिहासिक पुरुषाला महामानव बनवणार्‍या गोडगट्ट ‘ऐतिहासिक’ कादंबर्‍यांची आवड असेल, तर या पुस्तकांच्या वाटेला न गेलेलंच बरं. कारण यात हाडामांसाची माणसं आहेत. त्यांच्यात गुण आहेत तसेच दोषही आहेत. अंताजी कुणालाच देव्हार्‍यात बसवत नाही. सार्‍यांचीच कुलंगडी माहित असणारा तो एक खबर्‍या. तो कुणाचाच भाट नाही. सामान्य माणसाचं शहाणपण त्याच्या बोलण्यातून दिसतं. म्हणून अंताजी वेगळा वाटतो.

या दोन्ही पुस्तकांची सुंदर विस्तृत परीक्षणं ‘मिसळपाव’वर  इथे आणि इथे उपलब्ध आहेत. मला पुस्तक वाचण्यापूर्वी त्याच्याविषयी काही वाचायचं नव्हतं, त्यामुळे आता वाचलीत.

**********************************************************
अंताजीची बखर
लेखक: नंदा खरे
मनोविकास प्रकाशन
मूल्य: २५० रुपये

बखर अंतकाळाची
लेखक: नंदा खरे
मनोविकास प्रकाशन
मूल्य: २५० रुपये

13 comments:

हेरंब said...

दोन्ही विशलिस्टमधे गेली... प्रामुख्याने या वाक्यामुळे..

>> प्रत्येक ऐतिहासिक पुरुषाला महामानव बनवणार्‍या गोडगट्ट ‘ऐतिहासिक’ कादंबर्‍यांची आवड असेल, तर या पुस्तकांच्या वाटेला न गेलेलंच बरं. कारण यात हाडामांसाची माणसं आहेत.

Anonymous said...

>>>>पण तरीही, एवढा मोठा डोलारा पत्त्यांच्या बंगल्यासारखा बघता बघता कोसळतो कसा? एवढे शहाणे होते का इंग्रज आपल्यापेक्षा? अख्ख्या हिंदुस्थानात त्यांच्या तोडीचं शहाणपण सापडू नये?

नेहेमीचा प्रश्न मांडलास गं गौरी.....

नक्की मिळवून वाचावी लागतील पुस्तकं... सध्या "चकवाचांदण " वाचतेय तुझ्याच सुचनेवरून आणलेले :)

Raj said...

या दोन्ही पुस्तकांबद्दल बरेच ऐकले आहे. आता वचायलाच हवीत. :)

Gouri said...

हेरंब, आपल्याकडे ‘पॉप्युलर हिस्टरी’ च्या पुस्तकांचा तुटवडा आहे असं मला वाटतं ... म्हणजे जनमान्य पुस्तकं इतिहास सांगत नाहीत, आणि इतिहासाची पुस्तकं क्लिष्ट आहेत. ही दोन पुस्तकं इतिहासापासून फारकत न घेता रंजन करतात.

Gouri said...

तन्वी, अग इंग्रजांच्या लांब पल्ल्याच्या तोफा, कवायती फौजा या नेहेमी वाचायला मिळणार्‍या कारणांच्या पलिकडेही काही कारणं सांगितले आहेत इथे. आणि ती पटण्यासारखी आहेत.

Gouri said...

राज, नक्की वाच आणि तुझं मत टाक या पुस्तकांविषयीचं.

Gouri said...

तन्वी, ‘चकवाचांदणं’ आवडलं का?

Anagha said...

मी इनामदारांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या खूप वाचत असे.
समिधा आणलं...वाचलं....किती सुंदर ग ! अप्रतिम !
'प्रत्येक ऐतिहासिक पुरुषाला महामानव बनवणार्‍या गोडगट्ट ‘ऐतिहासिक’ कादंबर्‍यांची आवड असेल, तर या पुस्तकांच्या वाटेला न गेलेलंच बरं. कारण यात हाडामांसाची माणसं आहेत.' ही अतिशय चांगली गोष्ट ! 'हाडामांसाची माणसं' हे कारण खूप प्रभावी आहे ही पुस्तकं वाचण्यासाठी !

Gouri said...

अनघा, समिधा एकदा वाचावं, ठेवून द्यावं. थोड्या दिवसांनी परत वाचावं ... काहीतरी नवंच सापडतं दर वेळी! मी मोठ्ठी पंखी आहे त्या पुस्तकाची ... मागच्या काही पोस्टींवरून हे दिसलंच असेल म्हणा :)
इनामदारांच्या कादंबर्‍या मी फारश्या नाही वाचलेल्या. कादंबर्‍या एकूणातच कमी वाचते मी ... त्यापेक्षा नॉन फिक्शन जास्त आवडतं. या बखरी मात्र फारच आवडल्यात. जरूर वाच.

aativas said...

Added these two books in the "To Read" list :-)

Gouri said...

सविता, जरूर वाचा.

pratibha_khare said...

दोन्ही कादंबऱ्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. 'अंतकालाची बखर' तर उद्विग्न करून सोडते, अन्ताजीच अखेरचं विवेचन आणि लेखकांच शेवटचं भाष्य पुरेसं बोलकं आणि वस्तुनिष्ठ आहे. प्रश्न असा आहे कि आपण यापासून काही शिकणार आहोत की फक्त अस्वस्थच होणार आहोत? आणिक एक इतिहासाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दिल्याबद्दल खरोखरीच आभार मानायला havet.

Gouri said...

प्रतिभा, ब्लॉगवर स्वागत.
इतिहासापासून आपण काही शिकलो नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती होते हे तर खरंच आहे. ‘अंतकाळाच्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यातलं लेखकाने दाखवलेलं साम्य अस्वस्थ करून जातं. बखरीच्या शेवटच्या भाष्याविषयीचा उल्लेख पोस्टमध्ये सुटून गेलाय.