आजकाल माझी टीम व्हर्च्युअल असते. म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या कोपर्यात बसलेले लोक स्वतःला एक टीम म्हणवून घेतात आणि एकत्र काम करतात. महिनेच्या महिने बरोबर काम करून कधी समक्ष भेटण्याचा योग येत नाही. याचा एक फार मोठा तोटा आज जाणवला - ऑफिसच्या मिटिंग रूममध्ये सगळ्यांनी एकत्र बसून मिटिंग मिटिंग खेळायची संधी क्वचितच मिळते, आणि यातून कलाक्षेत्राची मोठी हानी होते आहे.
नॉन व्हर्च्युअल मिटिंगच्या सुखद आठवणीत आज बुडून गेले होते.
एखादं काम आज हातावेगळं करायचंच म्हणून आपण आज सगळं बाजूला ठेवून बसावं, आणि मॅनेजरने पकडून मिटिंगला घेऊन जावं. मिटिंग रूममध्ये कुडकुडत (ऑफिसच्या मिटिंगरूममध्ये बसलेला माणूस गार पडलाच पाहिजे असा नियम असावा. एवढं कमी टेंपरेचर तिथे कशाला करून ठेवतात माहित नाही.) आपण बाहेरच्या कामाच्या उबदार आठवणीने तळमळत असावं. पाच एक मिनिटात आपल्याला अंदाज येतो, आपल्या पक्षाची चार टाळकी दिसावीत म्हणून आपल्याला इथे ओढून आणलंय - इथे आपलं काहीही काम नाहीये. यानंतर सुरू होते निव्वळ जागं राहण्याची धडपड. त्या धडपडीतून मग अश्या कलाकृती निर्माण होतात:
आता मला सांगा, डेस्कवरून केलेल्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये असं काही निर्माण करण्याची ताकद आहे का? आपल्या कामाचं इथे काही चाललेलं नाही म्हटल्यावर मी फोन हळूच डिस्कनेक्ट करून टाकीन, किमान पक्षी ‘म्यूट’ करून आपल्या कामाला लागेन. पण मग कलेचं काय?