Sunday, January 22, 2012

वारसा


    आजोबांच्या दवाखान्यातली बाटली. टांगानिका टेरिटरी ते हिंदुस्थान एवढा मोठा प्रवास बोटीने करून ती बाटली भारतात आली. पु्ण्यातल्या भाड्याच्या घरात राहिली, मुंबईला राहिली, नंतर फिरतीच्या नोकरीमधली सगळी बदलीची गावं तिने बघितली. मग पुन्हा पुण्यात, अजून एक नवं घर. तब्बल ऐशी नव्वद वर्षं आपल्या नाजुक तब्येतीला सांभाळत ती झाकणाला धरून होती. या वर्षी मात्र तिच्या मधे काच बसवलेल्या पत्र्याच्या झाकणाने राम म्हटलं.

    इतकी वर्षं वडलांची आठवण म्हणून आईने जपून वापरलेली बाटली अखेर बिनाझाकणाची होऊन तिच्या लोणच्याच्या बरण्यांच्या ताफ्यातून बाहेर पडली, आणि "यात काहीतरी छान लाव" म्हणून माझ्याकडे आली.

    केवढं जग बघितलंय या बाटलीने !

    तिने आजोबांकडे भक्तीभावाने येणारे मसाई पेशंट्स बघितले असतील.

    आजोबांच्या मागे सगळ्या मुलांची शिक्षणं खंबीरपणे पूर्ण करणार्‍या आजीची धडाडी बघितली असेल.

    आपल्या वडलांचा वारसा चालवणार्‍या त्यांच्या लेकीकडे त्याच भक्तीभावाने येणारे पेशंट्स बघून तिला आफ्रिकेतले दिवस आठवले असतील.

    ही बाटली मला कुणाकडे सुपुर्द करायची वेळ आली, तर माझ्याविषयी सांगण्यासारखं तिच्याकडे काय असेल बरं?



12 comments:

आनंद पत्रे said...

तुझ्या पानाफुलांच्या प्रेमाअनुरूप तू त्यातही प्लॅंटच लावलस... तेच सांगायसारखं असेल :-)

Gouri said...

आनंद, तिला सांगण्यासारखं काहीतरी मिळू देत म्हणजे झालं ... ते झाडांविषयी असेल तर बेस्टच! :)

Anagha said...

ती सुंदर कोवळी पानं...म्हणजेच नवजीवन....त्या बरणीला खूप काही असेल तुझ्याविषयी सांगायला...नक्कीच... :)
खूप आवडली पोस्ट... :)

Gouri said...

अनघा, :)
आपल्या मागच्या पिढ्यांचं आयुष्य किती खडतर होतं याचा विचार केला म्हणजे वाटतं ... आपल्याला सगळं इतकं सहज मिळालंय, ते आपण कारणी लावतो आहोत ना?

Abhishek said...

ऐंशी नव्वद वर्षाची वस्तू! still most brittle still most hard!
अनघाच 'नवजीवन' आवडल!

Gouri said...

अभिषेक, बहुतेक जर्मन बनावटीची आहे ती. आणि खरंय. most brittle and still most hard!

Anonymous said...

अनघाला पुर्णपणे अनूमोदन.... गौरे त्या बरणीतली चिमूकली पानं खूप बोलताहेत, सांगताहेत तसेही... तुझ्या लहानश्या तरिही खूप बोलणाऱ्या पोस्टसारखे !!!

Gouri said...

तन्वे, तेरे मुह मे घी शक्कर :)

Mahendra Kulkarni said...

सुपर लाइक..खूप सुंदर मनातले विचार उमटले आहेत. थोडं सेंटी पण छान वाटलं.

Gouri said...

काका, वर वर दिसायला एवढ्या साध्या वस्तूला सुद्धा केवढा मोठा इतिहास असतो ना कधीकधी ... आपल्यासाठी ती वस्तू मग फार मोलाची होते.

भानस said...

कोवळी पानं पाहून येऊ घातलेल्या वसंताची चाहूल लागली बघ. :) नुसता त्या बरणीला तू हात लावलास तरी किती संमिश्र भावना उमटत असतील गं!

खरेच शेवटी ज्याची अमानत होती त्याकडे इतका प्रवास करून ती पोचलीच... सोबत नव्वद वर्षाचा इतिहास घेऊन...

Gouri said...

श्रीताई, मला तर आधी वाटत होतं ही जपून आतच ठेवून द्यावी म्हणून. पण मग म्हटलं, आपली उगाच अडगळ झालेली तिलाही आवडणार नाही बहुतेक.