मागच्या आठवड्यात ‘द पियानिस्ट’ बघितला - त्याच्यावरून नॉर्मलला यायच्या आधी आज ‘हॅनाज सूटकेस’ हाती पडलं, आणि वाचून होईपर्यंत खालीच ठेवता आलं नाही. इथे लिहिल्यावर कदाचित थोडं मनाला हलकं वाटेल, म्हणून इथे लिहिते आहे - नाहीतर आकाश भरून भरून आलंय. काळेकुट्ट ढग जमलेत अगदी :(
झेकोस्लोवाकियामधल्या एका बारा - तेरा वर्षाच्या ज्यू मुलीची, हॅना ब्रॅडीची ही गोष्ट. ‘डायरी ऑफ ऍन फ्रॅंक’ची झेक आवृत्ती म्हणू का याला? तितकीच अस्वस्थ करणारी.
तोक्योच्या हॉलोकास्ट एज्युकेशन रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर फुमिको इशिओका यांच्या हाती हॉलोकास्टची स्मृती म्हणून एक सूटकेस आली. पोलंडमध्ये आऊसश्विट्झच्या संग्रहालयाकडून आलेल्या या सूटकेसवर तिच्या तेरा वर्षांच्या मालकिणीचं नाव होतं. एवढ्या माहितीच्या जोरावर फुमिकोनी जगभरची हॉलोकास्ट संग्रहालयं, ज्यूंविषयी माहिती देणारी केंद्र धुंडाळली. या शोधाशोधीतून त्यांना जगाच्या दुसर्या टोकाला कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या हॅनाच्या भावाचा पत्ता मिळाला, आणि संग्रहालयातल्या एका अनोळखी वस्तूला चेहरा मिळाला. लहान मुलांसाठी लिहिलेल्या या पुस्तकात हॅनाची गोष्ट आणि फुमिकोची हॅनाच्या शोधाची गोष्ट अश्या दोन्ही गोष्टी समांतर जातात.
जेमतेम शंभर - सव्वाशे पानांचं पुस्तक. लहानच काय, मोठ्यांनासुद्धा मुळापासून हलवून सोडणारं. सत्यकथा.
इथे हॅनाविषयी अजून माहिती मिळेल. इनसाईड हॅनाज सूटकेस नावाची डॉक्युमेंटरी आहे या गोष्टीविषयी. सध्यातरी मला ही डॉक्युमेंटरी बघण्याची हिंमत नाही.
5 comments:
नात्झी, ज्यू संबंधीची पुस्तकं वाचायची, चित्रपट बघायची छातीच होत नाही हल्ली !! :((
माझ्याकडे शिंडलर्स लिस्टची डीव्हीडी होती. काही वेळा बघितल्यानंतर मित्राला देऊन टाकली. दर वेळेस त्या चक्रातून जायला नको वाटायला लागलं. ती लाल ड्रेसमधली मुलगी पाहिली की पोटात ढवळायला लागतं.
आणि मग कुठे, कुणी 'हिटलर कसाही असला तरी त्याच्यामध्ये महान नेतृत्वाचे गुण होते' अशी मुक्ताफळे उधळली की माझी कवटी सटकते.
ह्या सगळ्या गोष्टींमधील क्रूरता ढसाढसा रडवते !
हेरंब, राज, अनघा. खरंय. हा अनुभव emotionally draining आहे. आणि माहिती करून घेण्यासाठी असा एखादा सिनेमा बघणं असेल किंवा पुस्तक वाचणं असेल, एकदा करणं गरजेचं आहे ... पण परत परत हे वाचणं म्हणजे मुद्दामहून स्वतःला त्रास करून घेणं आहे असं वाटायला लागलंय हल्ली मला. पण ‘द पियानिस्ट’ आणि हे पुस्तक दोघांनीही बेसावध गाठलं. दुसराच सिनेमा बघायचा होता, चुकून ‘पियानिस्ट’ लावला आणि मग संपेपर्यंत बघावाच लागला, हे पुस्तक तर खास भेट म्हणून मिळालंय आईला - आणि एकदा हातात घेतल्यावर न वाचता खाली ठेवणं शक्य नाही.
Post a Comment