आंद्रे आगासी. माझ्या मनातली त्याची प्रतिमा म्हणजे खेळ कमी आणि दिखावा जास्त. मुद्दाम पुस्तक मिळवून त्याच्याविषयी वाचावं असं काही मला आपणहून वाटलं नसतं. खरं सांगायचं तर माझ्या लाडक्या स्टेफीच्या नवर्याचं पुस्तक म्हणून हे पहिल्यांदा वाचायला घेतलं... म्हणजे पुस्तक सुंदर आहे म्हणून अनघाने आधी सांगितलं होतं,पण अंतस्थ हेतू स्टेफीला या पंकमध्ये नेमकं काय बरं दिसलं असावं हे तपासण्याचा होता. :D
पण पुस्तक वाचत गेले तसतसा त्यात दिसणारा आंद्रे खूप ओळखीचा वाटायला लागला. टेनिस आवडतही नाही, आणि सोडवतही नाही अश्या चक्रव्यूहात धडपडणारा. स्वतःच्या शोधातला.
व्यावसायिक टेनिसमधलं करियर म्हणजे पंधराव्या-सोळाव्या वर्षी सुरू होणार आणि तीस - पस्तिसाव्या वर्षी तुम्हाला ‘माजी’मध्ये जमा करणार. जे काही करून दाखवायचंय ते या पंधरा-वीस वर्षांच्या काळात. स्पर्धा, प्रसिद्धी, पैसा, फिरती आणि टेनिससारखा शारीरिक आणि मानसिक ताकदीचा कस लावणारा खेळ. इथे जागेवर टिकून राहण्यासाठीही धावत रहावं लागतं. हा सांघिक खेळ नाही. त्यामुळे विजयही तुमचाच आणि अपयशही फक्त तुमचांच. त्यात वाटेकरी नाहीत. तुमची एक एक चूक मॅग्निफाय करून जगाच्या कानाकोपर्यात स्लो मोशनमध्ये हजारो वेळा चघळली जाते. तुमचं काम म्हणजे हारेपर्यंत खेळत रहायचं, आणि हारल्यावर पुन्हा जिंकण्यासाठी!
अश्या खेळामध्ये एक मनस्वी खेळाडू उतरतो - किंवा ढकलला जातो. त्याला या खेळाविषयी कधीच प्रेम नव्हतं. त्याच्या लहानपणी त्याच्या वडलांनीच ठरवून टाकलंय की आन्द्रे टेनिस खेळणार, आणि तशी तयारीही चालू झालीय. टेनिस सोडून आन्द्रेला दुसरं काही येत नाही, आणि टेनिसचा तर मनापासून तिटकारा आहे. इतक्या वषांच्या सरावातून तो तांत्रिक दृष्ट्या खूपच सरस आहे. पण व्यावसायिक स्तरावर खेळताना खेळाचं तंत्र हा जिंकण्यातला फार छोटा भाग असतो. इथे बाजी मारून जातात त्या लढण्याची इच्छा, एकाग्रता, चिकाटी,consistancy अश्या गोष्टी. आणि मनातून वाटल्याशिवाय यांत्रिकपणे खेळणं आन्द्रेला येत नाही. त्यामुळे कधी उत्तम खेळी,कधी पहिल्याच फेरीत नामुष्कीचा पराभव, कधी लोकांच्या गळ्यातला ताईत, कधी सगळीकडून टीकेचा मारा असा आन्द्रेचा हा सगळा प्रवास आहे. निराशेच्या गर्तेत म्हणजे अगदी उत्तेजक द्रव्य घेण्यापर्यंत जाऊन तो परत येतो. परत उभा राहतो, कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचतो.
चुकणारा, सावरणारा, पुन्हा चुकणारा एक हाडामांसाचा माणूस या पुस्तकात भेटतो, म्हणून मला ‘ओपन’ आवडलं.
बाकी त्याचं विश्व आणि माझं विश्व यांची काहीच तुलना नसेल, पण आपल्याला आयुष्यात काय करायचंय याच्या कन्फ्युजनमध्ये आणि आपण कुवतीएवढं करून दाखवत नाही या टोचणीमध्ये मी त्याच्या अगदी जवळपासच आहे. :D :D
Open - An Autobiography
Andre Agassi
2009, Harper Collins Publishers