Friday, March 9, 2012

कं पोस्ट २ अर्थात चुकत माकत कंपोस्ट

धागेदोरे वर कंपोस्टिंगच्या प्रकल्पाविषयी प्राची यांनी लिहिलंय. त्यांच्या प्रतिक्रियेवरून हे माझ्या कंपोस्ट प्रकल्पाचे काही फोटो आणि माहिती.

मागे कं पोस्टमधे म्हटलंय त्याप्रमाणे मी कंपोस्ट बिन घरीच बनवली, ‘डेली डंप’चं डिझाईन वापरून. हे त्या प्रयोगाचे टप्पे:

१. रंगाचे २० लिटरचे २ रिकामे डबे घेतले.

कंपोस्ट बिनसाठी वापरलेले रंगाचे डबे

    (आता खरं तर डेली डंपच्या डिझाईनमध्ये ३ डबे आहेत. वरच्या डाब्यात कचरा टाकत रहायचा. दुसर्‍या डब्यात तयार होत असलेलं कंपोस्ट असतं, आणि सगळ्यात खालच्या तिसर्‍या डब्यात तयार कंपोस्ट ठेवतात. पण रंगाच्या दुकानात तेंव्हा दोनच रिकामे डबे शिल्लक होते आणि एकदा प्रयोग करायची सुरसुरी आल्यावर तिसरा डबा मिळेपर्यंत मला दम नव्हता :). त्यामुळे कंपोस्ट तयार झाल्यावर जेंव्हा गरज पडेल तेंव्हा तिसरा डबा घेऊ असा विचार करून दोन डबे घरी आणले.

    तुम्ही कुठल्याही बायोडिग्रेडेबल मटेरियलपासून बनवलेले डबे वापरा असं डेली डंपवाल्यांचं म्हणणं आहे. रंगाचे डबे बायोडिग्रेडेबल नसले तरी रिसायकल्ड आहेत त्यामुळे चालतील असं मी ठरवलंय.)

२. या डब्यांमध्ये वाळलेल्या रंगाचा जाड थर होता. डबे घासून शक्य तितका रंग काढून टाकला.

३. रंगाचा वरच्या डब्याचा तळ आणि खालच्या डब्याचं झाकण घरच्या विंजिनेराकडून याप्रमाणे कापून घेतलं:
खालच्या डब्याचं झाकण आणि वरच्या डब्याचा तळ दोन्ही असं कापून घेतलं.

(दुसर्‍या डब्याचा तळ नंतर गरज लागेल तेंव्हा कापू असा विचार केला. तो नंतर अंमळ महागात पडला. कसा ते पुढे समजेलच.)

४. ड्राय बाल्कनीमध्ये ओल्या - सुक्या कचर्‍याचे डबे होते, तिथेच शक्यतो हा खांब ठेवायचा विचार होता. खालचा डबा, त्यावर कापलेलं झाकण, त्यावर तळ कापलेला डबा असा पिसाचा मनोरा तिथे ठेवला. वरचा डबा ठेवताना त्याच्या तळाच्या पट्ट्या आणि खालच्या झाकणाच्या पट्ट्या शक्यतो एकावर एक ठेवल्या.

५. टाकलेला कचरा खालच्या डब्यात पडू नये आणि थोडं पाणी शोषलं जावं, म्हणून वरच्या डब्यात तळाला टाईम्सचा एक अख्खा पेपर घातला. त्यावर ‘इनोरा’चं कंपोस्ट स्टार्टिंग मिक्स घातलं. थोडी बागेतली खराब झालेली माती घातली. कंपोस्ट बिन तयार! हा होता मागचा फेब्रुवारी महिना.

६. यावर रोज स्वयंपाकघरातला ओला कचरा आणि बागेतला कचरा घातला. त्यावर पाण्यात मिसळलेलं ‘इनोरा’चं मायक्रोबॅक्टेरियल लिक्वीड रोज फवारायचं आणि कचरा वरखाली करायचा. बिनचं झाकण लावताना थोडी फट ठेवायची.

७. आठवड्यातून एकदा एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा खायचा सोडा यात मिसळला. यामुळे वास येत नाही आणि किडे कमी होतात. फार ओलसर वाटलं, तर माती / पेपराच्या कपट्या असं घालायचं.

८. असं साधारण मार्च मध्यापर्यंत चाललं. एक दीड महिना हा प्रयोग केल्यावर घरात मोठे डास आणि चिलटं दिसायला लागली, बिनला वास यायला लागला, आणि बिनची रवानगी बंदिस्त ड्राय बाल्कनीतून बाहेरच्या बाल्कनीत झाली. माझी बाहेरची बाल्कनी उघडी आणि उत्तरेला आहे. उन्हाळ्यात पूर्ण बाल्कनी उन्हाने भाजून निघते. कंपोस्ट बिन सावलीच्या जागी कुठे ठेवणार? बाल्कनीतच कमीत कमी ऊन लागेल अश्या कोपर्‍यात हा खांब ठेवला.
बाल्कनीतला खताचा खांब

    (बिन हलवताना लक्षात आलं - खालच्या डब्याला भोकं न पाडल्याने कचर्‍यातून पडणारं पाणी खाली गोळा झालं होतं. त्यामुळे डास झाले होते. तातडीने खालच्या डब्याला भोकं पाडून घेतली. पाणी साठायचं थांबल्यावर डास गेले. )

९. साधारण दोन महिन्यांनी एप्रिलमध्ये वरचा डबा भरला. तो खाली ठेवून खालचा रिकामा डबा वर घेतला. पुन्हा डब्यात कचरा टाकायला सुरुवात केली.

१०. उन्हाळा संपला आणि पाऊस सुरू झाला. आता वरच्या डब्याचं झाकण थोडंही उघडं ठेवता येई ना. पावसाचं पाणी आत जायला लागलं. शिवाय पाऊस पडत असताना बाहेर जाऊन कचरा टाकायचा मंडळी हळुहळू कंटाळा करायला लागली. शेवटी मी पावसाळ्यापुरता हा प्रयोग स्थगित केल्याचं जाहीर केलं.

११. साधारण दिवाळीच्या सुमाराला मी पहिला डबा कंपोस्ट म्हणून वापरायला घेतला. गांडुळ खतासारखं चहाच्या भुकटीचं टेक्श्चर यात तयार होत नाही, पण तयार खताला अजिबात वास वगैरे नाही.

**********************************************

याचा पुढचा भाग लवकरच पोस्टते.

6 comments:

अनघा said...

पाय दे....दंडवत घालते ! :)
सही गं बाई ! मला जमणं कठीणच दिसतंय ! एव्हढी मोठ्ठी जागा नाहीये ना माझ्याकडे ! म्हणून गं ! :p :) :)

Gouri said...

अनघा :D :D
बाकी जागा म्हणशील तर एंड प्रॉडक्टला सव्वा फूट बाय सव्वा फूट चटईक्षेत्र लागतंय ;)

Pankaj - भटकंती Unlimited said...

सव्वा बाय सव्वा म्हणजे किमान सहा हजाराचे बिल्टअप झाले की.

Gouri said...

हे हे पंकज, म्हणूनच मी ‘सेलेबल एरिया’विषयी बोलत नाहीये - फक्त कार्पेट एरिया सांगितलाय ;)
बाकी हा हिशोब तुला समजलाय म्हणजे तू एकदम पुण्यातला बिल्डर शोभशील!

Raj said...

प्रयत्न आणि चिकाटी कौतुकास्पद आहेत. अभिनंदन.

>>वरच्या डब्यात तळाला टाईम्सचा एक अख्खा पेपर घातला.>>
ट्याब्लॉइड ऑफ इंडियाचा कुठेतरी उपयोग होतो आहे हे ही नसे थोडके. :)

Gouri said...

राज, कंपोस्टमध्ये घालता येतो म्हणूनच हल्ली मला पेपरमध्ये जास्त पानं असली तर आनंद होतो :) बाकी वाचायला फारसं काही नसतंच.