Wednesday, March 21, 2012

रमाबाई

    "उंच माझा झोका" बघायची अजून संधी नाही मिळाली मला. पण रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर कुणाला मालिका काढावीशी वाटली याचाच इतका आनंद झालाय!

    रमाबाई पहिल्यांदा मला भेटल्या त्या आजीने सांगितलेल्या आठवणींमधून. गावंच्या गावं ओस पाडणार्‍या प्लेगच्या साथीमध्ये आजीचे वडील तिच्या जन्मापूर्वीच दगावले, तिच्या अजाणत्या वयात आईही पुन्हा प्लेगलाच बळी पडली. मामाने भाचरांना आधार देण्याऐवजी होतं नव्हतं ते घशात घातलं, आणि ही भावंडं उघड्यावर पडली. सगळ्यात मोठा भाऊ बारा तेरा वर्षांचा, ही सगळ्यात धाकटी तीन-चार वर्षांची - जे घडून गेलं ते कळण्याचंही वय नसलेली. बाकीच्या भावंडांचं काय होईल ते होईल, किमान हिला तरी मी शिकवणार, शहाणी करणार म्हणून त्या बारा-तेरा वर्षांच्या ‘मोठ्या’ भावाने हिला पुण्यात सेवासदनला आणून सोडलं. ज्या काळात चांगल्या खात्यापित्या घरचे शहरातले आईबापसुद्धा मुलींच्या शिक्षणाचा फारसा विचार करत नव्हते, तेंव्हा त्या आडगावातल्या, जवळ शून्य पुंजी घेऊन आलेल्या भावाला आपल्या बहिणीला शिकवण्याची संधी दिली, ती सेवासदनने. तिच्यासारख्या कितीतरी निराधार मुली तिथे शिकल्या, कुणा नातेवाईकाच्या आश्रित होण्याऐवजी स्वाभिमानाचं जगणं जगल्या. रमाबाई रानडेंची ओळख म्हणजे केवळ न्यायमूर्ती रानड्यांची दुसरेपणावरची पत्नी एवढीच नाही. या माऊलीने सेवासदनमधल्या सगळ्या मुलींना आईची माया दिली. आजीच्या किश्श्यांमधून मला भेटल्या त्या सेवासदनमधल्या मुलींची पंगत बसल्यावर त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवत चौकशी करणार्‍या, त्यांना सुट्टीला आपल्या बंगल्यावर बोलावणार्‍या रमाबाई !

    पुढे नंतर त्यांची अजून ओळख झाली ती "आमच्या आयुष्यातील काही आठवणी" वाचताना. न्यायमूर्ती रानड्यांच्या योग्यतेच्या पुरुषाने एका लहान वयाच्या मुलीशी पुनर्विवाह करावा? कितीतरी वर्षं पटलं नव्हतं हे. पण रमाबाईंच्या आठवणी वाचताना जाणवलं, त्यांच्याइतकं परस्परपूरक आणि समृद्ध सहजीवन त्या काळात फार थोड्यांच्या वाट्याला आलं असेल. पेशवाईतल्या रमाबाई - माधवरावांसारखीच हीसुद्धा एक रमा-माधवाची जोडी. आणि रमाबाई केवळ न्यायमूर्तींची सावली बनून राहिल्या नाहीत. त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्त्वानेही त्या तितक्याच मोठ्या वाटतात मला.

    रमाबाई, तुम्ही घराबाहेर पडला नसतात तर आजीचं काय झालं असतं माझ्या?

23 comments:

मी बिपिन. said...

वाचताना थरारलो! !!!

Gouri said...

बिपिन, आजीच्या आठवणीतल्या रमाबाई म्हणजे खरोखर तिच्या आईच्या जागी होत्या. तिची आठवण झाली की जाणवतं, आपल्या मागच्या पिढ्यांनी किती संघर्ष केलाय, आणि आपलं आयुष्य त्यांच्यापेक्षा किती सोपं आहे !

अपर्णा said...

गौरी मला या मालिकेबद्द्ल काही माहिती नाहीये पण आताशा वृत्तपत्रांमध्येही कव्हरेज येतंय त्यावरूनही वाटतंय पाहायला हवी..यू ट्युबवर जाऊन मालिका पाहायचा पेशंस माझ्यात नाहीये पण प्रयत्न करेन.....
ही पोस्ट जास्त अशासाठी भावली की तुझ्यातलं वेगळेपण (चांगल्या अर्थानेचं...) कशामधून आलंय त्याचा थोडाफ़ार शोध लागला आहे असं वाटतंय...आणि तू ते इतक्या साधेपणाने मांडलंस याबद्दल तुझं खूप अभिनंदन.....

Gouri said...

अपर्णा, आपण आपल्या आई-वडिलांचे, त्यांच्या आई-वडिलांचे, भावंडांचे, सगळ्यांचे अनुभव आपल्यात घेऊन मोठं होतो, नाही का?

Priyaranjan Anand Marathe said...

My mother told me to see this serial. I don't watch any serials, so told her that I will. :). But now I need to call her and thank her for the recommendation.

Is it available on Youtune? Thanks for writing it so well.

Priyaranjan Anand Marathe said...

My mother told me to watch the serial. I don't watch serials, but guess missed this one. Will see it now. Thanks.

Anagha said...

गौरी, ही मालिका मी बघते अधूनमधून. 'छोटीशी रमा' ही फार दूर नाहीये आपल्या. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच वर्ष मागे आहे. माझ्या लेकीला मी हे नेहेमी म्हणत असते. तिचं ते नववारी साडीतलं हसरंखेळतं रूप बघून माझ्या पोटात कालवाकालव होते !
रत्नागिरीत आलेल्या प्लेगने माझ्या बाबांना उघड्यावर टाकलं होतं. हे सगळं असं कितीसं दूर आहे आपल्या ?

शेवटचं वाक्य, खूप हृदयस्पर्शी झालंय....खूप सुंदर. :)

सिद्धार्थ said...

आमच्या घरी तशी कुठलीही धारावाहिक मालिका पाहिली जात नाही पण हल्ली "उंच माझा झोका" ही मालिका मात्र न चुकता लागते. मी देखील काही भाग पाहिले आहेत. छान आहे मालिका. जुना काळ, त्या वेळचे रीती रिवाज, जीवन शैली हे सगळे अतिशय उत्तमरित्या दाखवले आहे.

> रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर कुणाला मालिका काढावीशी वाटली याचाच इतका आनंद झालाय! +1

Gouri said...

प्रियरंजन, मी अजून बघितली नाहीये मालिका. घरी टिव्हीवर मला झी मराठी कुठे लागतं ते सुद्धा शोधावं लागेल अशी परिस्थिती आहे, आणि रात्री दहाच्या आधी काहीही बघायला सवड मिळण्याची शक्यता नाही. पण यूट्यूबवर आहे असं ऐकलंय. मुद्दाम सवड काढून बघायचा बेत आहे.

Gouri said...

अनघा, खरंय ग ... हे सगळं फार तर एक दोन पिढ्यांमागचं वास्तव आहे ... आणि प्लेगने गाव साफ करणं ही तर तेंव्हा दर चार -पाच वर्षांनी होणारी गोष्ट होती. माझ्या आजीसारख्या किती जणींची हीच कहाणी असेल!

Gouri said...

सिद्धार्थ, तसेही टीव्हीवर बघण्यालायक कार्यक्रम कितीसे असतात आपल्याकडे? तू केलेल्या वर्णनावरून वाटतंय मला बघायलाच हवी मग ही मालिका ... वेळ जमवता आली पाहिजे.

kirti said...

heey ! loved loved this post. Such an inspiring and positive tell of your aji and mama ajoba. what happened next ? how did mama ajoba do in his life? he was a visionary . my salute to him.
We as a society owe so much to Ramabai . Though I do not watch serial regularly and i am curious to see the later part when she starts her mission of women's education and evolves into an indepndent thinker and achiever.

Anand Kale said...

खुपच छान पोस्त झाली आहे...
मी फक्त उंच माझा झोका आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिका पाहतो...

रमाबाईंबद्द्ल माहीती कमीच आहे.. या मालिकेमुळे त्या कायमच्या लक्षात राहतील..
न्यायमुर्ति रानडे आणि रमाबाई रानडें यांवरील पुस्तके माहीत असतिल तर कळव..

Raj said...

सुरेख. असं काही वाचलं की आपल्या रोजच्या अडचणी भातुकलीतल्या खेळासारख्या वाटायला लागतात.

Inspiring!

Gouri said...

कीर्ती, खरंच किती अवघड परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढला तेंव्हा! माझी आजी शिकली, थोडे दिवस तिने सेवासदनमध्येच नोकरी केली, मग अतिशय कर्तबगार माणसाशी, पण दुसरेपणावर असं तिचं लग्न झालं. आयुष्याच्या सुरुवातीसारखी हालाखीची परिस्थिती तिला पुन्हा कधी भोगावी लागली नाही. तिनेही आयुष्यात खूप काही केलं, खूप जग बघितलं, संकटांशी सामना केला आणि आनंदही उपभोगला. वयाच्या पंचाण्णवाव्या वर्षी गेली ती. तिचं आयुष्य मला एखाद्या कादंबरीसारखं वाटतं कधीकधी! मामा आजोबाही खूप शिकून पुढे आले. पण उत्तरायुष्यात आजीची आणि त्यांची विशेष जवळीक राहिली नाही त्यामुळे त्यांच्या विषयी मला पुढची फारशी माहिती नाही.

Gouri said...

आ का, "आमच्या आयुष्यातील काही आठवणी" हे रमाबाईंनी लिहिलेलं पुस्तक हे मराठी स्त्रियांच्या अगदी सुरुवातीच्या आत्मचरित्रांपैकी आहे - बहुतेक पहिलंच. उपलब्ध आहे हे बाजारात. आवर्जुन वाचण्यासारखं.

Gouri said...

राज, खरंय. अडचणी काय असतात आणि त्यावर कशी मात करावी हे यांच्याकडे बघून शिकावं. माझे आजोबा आफ्रिकेत होते. तिथेच खूप आजारी पडले. ही आजी आजोबांना गाडीत घालून स्वतः गाडी चालवत चाळीस मैलांवर कुठे दवाखाना होता तिथे एकटी घेऊन गेली होती इलाजासाठी. तिथेही इलाज होत नाही म्हटल्यावर थेट लंडनला नेलं तिने आजोबांना!

Anonymous said...

गौरे अगं आमच्याकडे फक्त मीच नाही तर दोन्ही मुलंही सध्या न चुकता चिमुकली ’रमा (यमुना)’ पहाताहेत ....
मला पुढे काय असणार मालिकेत माहित असुनही एकही भाग चुकवावा वाटत नाहीये.
बाकि तुझ्याच भाषेत सांगायचे तर...
>>>आपल्या मागच्या पिढ्यांनी किती संघर्ष केलाय, आणि आपलं आयुष्य त्यांच्यापेक्षा किती सोपं आहे !

हेरंब said...

मी रमाबाई आणि ही सिरीयल दोन्हींबद्दल सारखाच अनभिज्ञ आहे. युट्युबवर मिळतेय का बघतो ही सिरीयल. पुस्तकही बघतो कुठे मिळालं तर.

ग्रेट पोस्ट.. मस्तच !

Gouri said...

तन्वे, नक्की बघ ग ... माझा सद्ध्या रमाबाईंचं पुस्तक मिळवण्याच प्रयत्न चाललाय. पुन्हा वाचायचंय एकदा तरी. ते मिळालं तर त्याविषयी लिहिते.

Gouri said...

हेरंब, पुस्तक बाजारात आहे सद्ध्या. प्रकाशन माझ्या लक्षात नाही. :(
ज्या लोकांनी फार मोठं काम केलं पण त्यांचं काम विशेष कुणाला माहित नसतं अश्यांपैकी मला न्ययमूर्ती रानडे आणि रमाबाई वाटतात. अश्या आपल्याला माहित नसलेल्या अनेकांनी एक एक कोपरा उजळल्यावर आपल्याकडचा अंधार जरा कमी झाला, नाही का?

Harshada Sawarkar said...

’आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे पुस्तक वरदा प्रकाशनाचे आहे.

Gouri said...

हर्षदा, माहितीबद्दल आभार!