Thursday, March 22, 2012

रंग न डारो शाम जी ...




हे ऐकलं म्हणजे मी थेट रेल्वे कॉलनीमध्ये जाऊन पोहोचते. उन्हाळ्यातली संध्याकाळ. नुकताच सूर्यास्त होत असतो. खेळता खेळता फारच तहान लागली म्हणून नाइलाजाने पाणी प्यायला घरात जावं लगतं. बाहेर भानगावकर काकांची (त्यांच्या एवढ्याच वयाची) सायकल उभी आहे... म्हणजे कुमार लावलेले असणार. कुमारजी म्हणजे काकांचं दैवत. "गाणं ऐकणं" म्हणजे फक्त आणि फक्त कुमारजींना ऐकणंच असू शकतं काकांच्या मते. काकांनी रेल्वेत नोकरी केली त्याच्या दुप्पट वर्षं पेन्शन घेतली असावी. आणि आयुष्यभरात मिळालेला रेल्वेचा प्रत्येक पास कुमारांच्या मैफिली ऐकण्यासाठी गावोगाव हिंडण्यासाठीच वापरला असावा. घर बांधतांनासुद्धा, कुमारांचं गाणं ऐकायला मिळावं, म्हणून काकांनी कुमारांच्या देवासजवळ असलेल्या इंदोरला बांधलं!

घरी हॉलमध्ये आई, बाबा, मामी, काका बसलेत. पन्हं किंवा सरबताचे संपलेले ग्लास शेजारी दिसताहेत. कुमारांची नवीन बनवून आणलेली कॅसेट लावताना काकांचे डोळे लकाकतात. कॅसेट सुरू होते, आणि "दिन डूबा ..." सुरू झाल्याबरोबर काकांची समाधी लागते, ती थेट दीड तासाने "अवधूता कुदरत की गत न्यारी ..." संपल्यावरच उतरते. कुमारांची नवी कॅसेट ऐकण्याइतकाच खास अनुभव काकांना कुमार ऐकतांना बघण्याचाही असतो. या कॅसेटमधल्या "रंग न डरो शाम जी" मध्ये तर अशी जादू आहे, की दरवेळी ही बंदीश ऐकताना मला त्या उन्हाळ्यातल्या संध्याकाळचा वास येतो.
**************
कॅसेट्सचा जमाना जाऊन युगं झाली, पण आईकडून ढापलेली ही कॅसेट मी अजूनही जपून ठेवली आहे. एकदा नवर्‍याने ही कॅसेट बघितली. "कुठल्या जुनाट कॅसेट लावत असतेस- म्युझिक सिस्टीम खराब होऊन जाईल अश्याने." म्हणून त्या कॅसेटला घरच्या म्युझिक सिस्टीमवर प्रवेशबंदी झाली. अर्थात याने मला फार फरक पडला नाही. तसंही घरी निवांत बसून गाणं ऐकायचा मुहुर्त कधी लागतो? मी कॅसेट हळूच गाडीत नेऊन ठेवली, गाडीतल्या सिस्टीमवर ऐकायला सुरुवात केली ;)

पण तेंव्हापासून या कॅसेटचं वय झालंय, ती खराब झाली तर "रंग न डारो" कुठे ऐकायला मिळणार? या धोक्याची जाणीव झाली, . मागच्या आठवड्यात अखेरीस कुमारांच्या सिड्यांचा सेट घेतला, आणि माझ्या ‘रंग न डारो’ ची सोय झाली :) अडचण एकच आहे, - ही सिडी ‘अवधूता, कुदरत की गत न्यारी ...’ वर संपत नाही. त्यामुळे मैफिल अर्धीच राहून जाते.

तुमच्या जुन्या कॅसेट्स, सिड्यांचं तुम्ही काय करता?

13 comments:

Unknown said...

हे... आत्ताच एका गायिकेला भेटून थोड्या गप्पा करून आलो. आलो आणि इथं हे लेखन. मस्त!
तुझ्या प्रश्नाचं उत्तर: जुन्या सीडी वगैरे माझ्याकडे रहातच नाहीत. त्या इतरांकडं जुन्या होत असाव्यात आणि त्यांचं पुढं काही तरी होत असावं. हा अनुभव जुना आहे, त्यामुळं मी आता सीडी घेत नाही. कॅसेट्सचा तर प्रश्नच येत नाही. :)

Gouri said...

अज्ञात, सिड्या जुन्या न होऊ देण्याचा हा मार्ग चांगला आहे! :)

प्रसाद हरिदास said...

hech zal ahota maza, jenvha sandip salil chi pahili cassate" Ayushyawar bolu kahi juni zali tenvha" Ani "Natsamratchya cassets chalwayla record playerach urla nahi tenvhahi :)

Raj said...

सुरेख आठवण्!
जुन्या कॅसेट, शिड्या कुठे गेल्या कुणास ठाउक. सध्या सगळं एम्पी३ वर आहे त्यामुळे कितीही वेळा इकडून तिकडे कॉपी होत असतं. आणि दुर्मिळ नसणारी गाणी नेटावर कधीही मिळू शकतात त्यामुळे त्याबद्दल काळजी वाटत नाही.

Gouri said...

प्रसाद, :)

Gouri said...

राज, हिंदी गाण्यांची वगैरे मी काळजी करत नाही. पण या जुन्या क्लासिकल च्या कॅसेट आहेत ना, त्या पुन्हा मिळवणं फार अवघड असतं कधी कधी.

Anagha said...

काही वर्षांपूर्वी मी मोठ्या हौसेने शोधून शोधून खूप गाणी रेकोर्ड करून घेतली होती...आणि खूप कॅसेट्स तयार करून घेतल्या होत्या. एकदा घरात पाणी पाणी झालं आणि सगळ्या कॅसेट्स खराब झाल्या. :(
आता आपली मी ज्या काही बाहेर मिळतात त्या सिड्या विकत घेत असते ! :)

aativas said...

माझ्याकडे फारशा नाहीतच त्या. ज्या येतात त्या कोणाकडे तरी जातात .. त्यामुळे अनेकदा मला जे ऐकायच असत ते माझ्याजवळ नसायच. आता पेन ड्राइव्ह आणि मोबाईलवर काही अत्यंत आवडीची गाणी आहेत त्यात कुमारांची काही आहेत मोजकी.

Gouri said...

Anagha, Savita, Tanvi, sorry for late response. I have limited access to net. Will reply to the comments tomorrow.

Gouri said...

अनघा, हे थोरोचं तत्त्व झालं. काही गोळा करून ठेवलं नाही, म्हणजे त्याची राखण करत बसावी लागत नाही ;)

Gouri said...

सविता, तुम्हा सगळ्यांनाच गाण्याच्या बाबतीत अनासक्तभाव जमलेला दिसतोय!
माझंच अवघड दिसतंय ... लाडकी गाणी आणि पुस्तकं मला नेहेमी जवळपास हवी असतात - कधीही वाटलं तर वाचता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे अशी!
:)

अपर्णा said...

गौरी माझी आजची पोस्ट वाचलीस तर माझं आणि क्लासिकलचं नातं तर फ़ार जूनं नाहीये हे लक्षात येईल पण फ़ार पूर्वीपासून कानसेन आहे मी त्यामुळे हे तू पोस्ट केलेलं रंग न डारो आवडल..त्याबद्दल धन्यवाद..
आणि हो तुझा शेवटचा यक्षप्रश्न, आम्ही आमच्या सिडीच्यातरी डिजीटल रुपांतर करून सगळं घरातल्या विविध आय (पॉड,फ़ोन,पॅड)मध्ये ठेवायच्या विचारात होतो..(विचार सत्यात यायला वेळ लागतो त्यातल्या त्यात आरंभशूर लोकांनी ठरवलं असेल तर...:)) कॅसेटचं निदान सिडीमध्ये तरी रुपांतर करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये पण आता हा किडा डोक्यात गेला आहे याची मंडळाने नोंद घ्यावी...तू काय करतेस तुझ्या सिडी आणि कॅसेट्सचं??
अगं इथे विशेष करून घर बदलायला लागलं की जाम गोष्टी जातात गं...मागच्यावेळी पुस्तकांची जवळजवळ दोन मोठी बॉक्सेस, जुने अंक इ.इ...लायब्ररी आणि मैत्रीणींना देऊन आले होते..तेव्हापासून का कुणास ठाऊक पुस्तकंच विकत घ्यावीशी वाटत नाही आहेत....त्याऐवजी मी आता किंडलची अ‍ॅप वापरते..पण मराठी पुस्तक मात्र कागदावरच आहेत नं अजून???

Gouri said...

अपर्णा, मीही कानसेनच आहे. त्यातही ऐकायला आवडतं पण समजत काहीही नाही.
जुन्या कॅसेट मी (नवर्‍याची नजर चुकवून) गाडीतल्या म्युझिक सिस्टीमवर ऐकते. गाडी जुनी आहे, म्युझिक सिस्टीमही जुनी, त्यामुळे अजून कॅसेटप्लेयर आहे त्यात :)
जुन्या सिड्या रिप करायची पंचवार्षिक योजना आहे. बघू कधी प्रत्यक्षात येते ते!
किंडलची कल्पना आवडली, तरी दोन गोष्टींमुळे अजून मी किंडल घेतलेलं नाही - एक तर मराठी पुस्तकं अजून किंडलवर नाहीत, आणि प्रत्येक पुस्तक ऍमेझॉनवरून घेणं मला परवडणारं नाही. याला स्वस्त पर्याय हवाय. त्यामुळे अजून ‘डेड ट्री फॉर्मॅट’च आहे.