Monday, April 9, 2012

काय हरकत आहे?

काही दिवसांपूर्वी ‘सामाजिक कामाचं कॉर्पोरेटायझेशन’ या विषयावर या लेखाच्या अनुषंगाने जाणकारांचे विचार वाचायला मिळाले. होते. नुकतंच जॉन वुडचं ‘Leaving Microsoft to change the World' वाचलं. मला या विषयावर काय वाटतं, ते या पुस्तकामुळे थोडं स्पष्ट झालं, म्हणून ही पोस्ट.

*******************************
    १९९९ मधली गोष्ट. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारा जॉन वुड एका तीन आठवड्यांच्या सुट्टीसाठी नेपाळला गेला. तिथल्या भटकंतीमध्ये त्याला नेपाळच्या दुर्गम भागातली एक शाळा बघायला मिळाली. मुख्याध्यापकांनी कुलुप लावलेल्या कपाटातली चित्रविचित्र पुस्तकं शाळेचं ‘ग्रंथालय’ म्हणून दाखवल्यावर जॉन थक्क झाला. इटालियन भाषेतल्या कादंबरीपासून ते ‘लोनली प्लॅनेट गाईड टू मंगोलिया’ पर्यंत जी काही पुस्तकं त्या भागात आलेले पर्यटक मागे सोडून गेले होते, ती पुस्तकं एखाद्या मौल्यवान ठेव्यासारखी शाळेने कपाटात जपून ठेवली होती - मुलांनी हाताळून खराब होऊन येत म्हणून! जॉनला आपलं बालपण आठवलं, अमेरिकेत कार्नेजीनी गावागावात उभ्या केलेल्या ग्रंथालयांनी आपल्या शिकण्यामध्ये किती मोलाची कामगिरी बजावली आहे हे त्याला जाणवलं, आणि प्रश्न पडला, की नेपाळच्या त्या शाळेतल्या मुलांनाही अशी पुस्तकं वाचायची संधी का मिळू नये?

तसं बघितलं, तर हिमालयात ट्रेकला येणार्‍या अनेक संवेदनशील माणसांना हे जाणवतं. त्या क्षणी त्या शाळेसाठी काही करायची ऊर्मीही दाटून येते, पण हिमालयातून परत जाऊन रोजच्या रूटीनला लागलं, की विसरूनही जाते. जॉनचं वेगळेपण म्हणजे नेपाळहून परत गेल्यावरही आपण या शाळेसाठी पुस्तकं कशी पाठवायची हा प्रश्न त्याच्या डोक्यात राहतो, आणि पुढच्या वर्षी जॉन आणि त्याचे वडील पुस्तकांची खोकी घेऊन नेपाळमध्ये दाखल होतात!

या नेपाळ भेटीनंतर जॉनला जाणवलं, की आपण पुन्हा पुन्हा इथे येत राहणार आहोत. एका शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकं पुरवण्याने इथलं काम पूर्ण होणार नाहीये. त्याने आपल्या आजवर जमवलेल्या पुंजीचा अंदाज घेतला, मायक्रोसॉफ्टला राजिनामा दिला, आपल्या गर्लफ्रेंडला हा निर्णय सांगितला, तिला यात आपली साथ देणं शक्य नाही हे स्वीकारून हे नातं संपवलं, आणि नोकरीनिमित्तचा बीजिंगमधला तळ हलवून तो अमेरिकेला परत गेला. यापुढची जॉनची गोष्ट म्हणजे एका मायक्रोसॉफ्ट एक्झिक्युटिव्हने आपल्या कंपनीतलं वर्क कल्चर वापरून मायक्रोसॉफ्ट इतक्याच वेगाने वाढणारं एक सामाजिक काम कसं उभं केलं याची कहाणी आहे.

जॉन वुडसारखा माणूस जेंव्हा कॉर्पोरेट जगातल्या तिमाही टार्गेट्सच्या भाषेत बोलत सामाजिक काम उभं करतो, तेंव्हा त्याचे फायदे - तोटे काय आहेत ?

मान्य आहे फक्त रिझल्ट्सचा विचार करताना फार मूलगामी विचार करता येणार नाही. ‘तुमचं शिक्षणविषयक तत्त्वज्ञान काय?’या प्रश्नावर जॉनच्या संस्थेकडे उत्तर नाही, ते उत्तर शोधण्याची गरजही त्यांना वाटणार नाही. पण आजच्या घडीला किती देशांमध्ये किती शाळा बांधून झाल्या, किती पुस्तकं या मुलांपर्यंत पोहोचवून झाली हा नेमका आकडा ते देऊ शकतात. आणि हे आकडे पुरेसे बोलके आहेत. शिक्षणक्षेत्राविषयी मूलगामी विचार करणार्‍या, शैक्षणिक प्रयोग करणार्‍या कामांची गरज तर आहेच. पण साक्षरता आणि जगभरात सर्वांना प्राथमिक शिक्षण हे अगदी प्राथमिक उद्दिष्ट गाठायला जॉनच्या ‘रिडिंग रूम’चीही तितकीच आवश्यकता आहे. There is enough space for all kind of work in this field.

11 comments:

Anagha said...

गावी एक वाचनालय सुरु करायचं मनात आहे खरं...कधी आणि कशा प्रकारचं हे काळच ठरवेल बहुधा.

Gouri said...

अनघा, तुला पुस्तकं मिळवायला मी मदत करू शकेन. :)

हेरंब said...

जबरदस्त !!

Gouri said...

हेरंब, मल सगळ्यात आवडलं म्हणजे हा काम करणारा माणूस आहे.
आपल्याला काय करायचंय हे त्याला बिझनेस गोल्सइतकंच स्पष्ट आहे, आणि तितक्याच फोकसने तो हे काम करतोय!

Raj said...

सुरेख परिचय.

वाचायची यादी = +१
लवकरच एरर येणार, मेमरी संपली म्हणून. :)

Gouri said...

राज, वाचायच्या पुस्तकांची यादी, भेट देण्याच्या जागांची यादी, बघायच्या सिनेमांची यादी या गोष्टी न संपणार्‍या आहेत, आणि अजून आपल्याकडे एक्स्टर्नल हार्डडिस्क आणि ऍडिशनल रॉमची सोय नाही :)

Meghana Bhuskute said...

तुला खो दिलाय - http://meghanabhuskute.blogspot.in/2012/04/blog-post.html :)

Gouri said...

मेघना, बघते. :)

रोहन... said...

मस्त... डोंगरात फिरताना असे खूप वाटत राहते पण अजूनही शक्य होत नाहीये. नाही म्हणायला एक फिरते ग्रंथालय बनवले होते मागे रायगड डोंगरी भागासाठी... पण पुढे फार काही झालेले नाही.. :(

Gouri said...

रोहन, काही करायची इच्छा तर आहे. कधी, कसं जमतं बघू या.

अपर्णा said...

गौरी, खूप छान पोस्ट.
माझी एक बांधकाम क्षेत्रात काम करणारी मैत्रीण आहे तिने शहापूरमध्ये एक शाळा बांधून दिली. मला तिचं इतकं कौतुक वाटतं नं? आम्ही तिघी एकत्र असायचो त्यातल्या आम्ही उरलेल्या दोघींनी मध्ये मध्ये त्या शाळेत शिकवायला जाऊया असं म्हटलं...पण ते मी तिथे असेपर्यंत कधीच शक्य झालं नाही...आणि मी इथे आल्यावर तर ते तसंही शक्य नाही.....बघ नं...
माहित नाही केव्हा पण घरगुती जबाबदार्‍या कमी झाल्यावर तरी आपल्या हाताने एक काही सत्कृत्य करायला हवं गं असं फ़ार वाटतं....सध्या सगळंच बोलाची कढी त्यामुळे जाऊदे...

पोस्ट नेहमीप्रमाणेच अप्रतिम...:)