Friday, July 27, 2012

ओरिसाची भटकंती: केचला


ओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे ...

     विशाखापट्टण ते कोरापुट अंतर २१३ किमी. मधे एक तासभराचा जबरदस्त घाट आहे, आणि रस्ता खराब आहे. त्यामुळे चार – साडेचार तास सहज लागतात पोहोचायला. ताडाची झाडं, ताडाच्याच झावळ्यांनी शाकारलेली घरं, झावळ्यांच्याच विणलेल्या सुंदर छत्र्या आणि चांगला रस्ता हे संपलं म्हणजे समजायचं आपण आंध्र सोडून ओडिशामध्ये प्रवेश केला. पण रस्त्याकडे आणि घाटाच्या न  संपणाऱ्या वळणांकडे दुर्लक्ष करून जरा खिडकीतून बाहेर बघितलं, तर डोळ्यांचं पारणं फिटेल. (फोटो येतांना काढलेत.)

    कोरापुटला गेल्यावर पहिलं काम म्हणजे केचलाची शाळा बघायला जायचं. मला जायचं होतं त्याच दिवशी केचलाच्या शाळेच्या मुलांचा कोरापुटला कार्यक्रम होता. त्यामुळे मुलांबरोबरच त्यांच्या शाळेला परत जाणं शक्य होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी शाळेच्या मुलांच्या कलावस्तूंचं एक छोटंसं प्रदर्शन होतं. ते बघूनच केचलाला काय बघायला मिळणार याची छोटीशी झलक मिळाली.

ताजमहाल, कुतुबमिनार, मोर ... मुलांनी बनवलेल्या वस्तू


सात – आठ वर्षाच्या मुलाने तयार केलेलं हे गोष्टीचं पुस्तक:

The brave elephant story

    गोष्ट त्याने रचलेली, चित्रं स्वतः काढलेली, आणि लेखनही त्याचंच. आपल्या बोलीभाषेखेरीज कुठल्याच भाषेचा गंध नसलेल्या निरक्षर आईबापांचा हा मुलगा या शाळेत जाऊन पुण्यातल्या पहिली – दुसरीतल्या मुलाइतकं सहज इंग्रजी बोलतोय!

     त्यानंतरचा कार्यक्रम बघतांना जाणवलं, शाळेतला फक्त एकच ‘स्कॉलर’ मुलगा इतक्या आत्मविश्वासाने वावरणारा नाहीये ... सगळीच मुलं सहजपणे, कुठलं दडपण न घेता पाहुण्यांशी गप्पा मारताहेत. कलेक्टर सर, पोलीस अंकल हे सगळे त्यांचे ‘फ्रेंड्स’ आहेत.


जवळजवळ त्याच्याच उंचीचा ढोल वाजवणारा कमलू
यात निम्म्याहून जास्त मुली आहेत!
कार्यक्रमात सादर काय करायचं, हे मुलांनीच ठरवलंय!

    कार्यक्रम संपल्यावर एकेका सिक्स सीटरमध्ये बारा मुलं, दोन मोठे आणि ड्रायव्हर, खेरीज मागे ड्रम आणि बाकीचं सामान अश्या तीन गाड्यांमधून सगळे लॉंच सुटते तिथवर पोहोचलो. तासाभराच्या प्रवासात आमच्या गाडीतली निम्मी बच्चेकंपनी बसल्या जागी झोपली. खड्डे भरलेल्या रस्त्याने जाताना झोपलेली मंडळी (आणि त्यांचं सामान) कुठेतरी पडू नये म्हणून जागे असणारे सगळे इतक्या प्रेमाने काळजी घेत होते ... कार्यक्रमाच्या सादरीकरणापेक्षाही या प्रवासातलं आणि नंतर शाळेतलं मुलांचं वागणं बघून मला शाळेच्या यशाची खात्री पटली.


    कोलाब धरणाच्या पाण्यातून तासभर लॉंचने प्रवास केल्यावर आम्ही शाळेच्या बाजूला पोहोचलो. तिथून पुढचा अर्धा – एक किलोमीटर चालत. ही जागा इतकी शांत आणि सुंदर आहे ... इथे जाणं थोडं जरी सुलभ असतं, तर इथे हॉलिडे रिझॉर्ट उभे राहिले असते!

लॉंचमधल्या सहप्रवासी

शाळेचं पहिलं दर्शन.
  
   ही शाळा आहे अरविंद आश्रमाची. इथल्या दुर्गमातल्या दुर्गम भागात उत्तम शाळा चालवून दाखवण्याच्या जिद्दीने प्रांजल जौहार या माणसाने उभी केलेली. शाळेसाठी पैसा उभा करणं, जमीन मिळवणं, बांधकाम, मुलं आणि शिक्षक गोळा करणं ही सगळी या माणसाची धडपड. शाळा सुरू होऊन चार वर्षं झालीत. इथल्या शाळेची मुलं बारा महिने शाळेच्या वसतीगृहात राहतात, आठवड्यातून एक दिवस रात्री आपापल्या घरी जातात. शाळेत सद्ध्या सहा ते नऊ वयोगटातली सुमारे ७० मुलं आहेत. ही ‘फ्री प्रोग्रेस स्कूल’ आहे. कुठलीच शैक्षणिक पार्श्वभूमी नसणाऱ्या या मुलांचा आत्मविश्वास जागा करणं, त्यांना शिक्षणाची गोडी लावणं, त्यांना इंग्रजी, हिंदी, ओडिया भाषेत सहज संवाद साधता येणं हे या शाळेचं यश. ही मुलं मोठी झाल्यावर बहुधा आसपासच्या दुसऱ्या साध्या शाळेत जातील. केचलाच्या शाळेतलं शिक्षण त्यांना तिथे टिकून रहायला बळ देईल.

    गावात अजूनही वीज नाही. मोबाईल कव्हरेज बहुतेक भागात नाही. शाळेने सोलार, बोअर आणि पवनचक्कीच्या सहाय्याने वीज आणि पाण्याची व्यवस्था केलीय. आम्ही पोहोचलो त्या दिवशी संध्याकाळी वीज नव्हती. सगळे अंधारात चाचपडतांना “सोनू को देखा क्या?” म्हणून विचारत होते. प्रत्येकाने चौकशी करावी असा / अशी सोनू कोण बरं? म्हणून विचार करत होते. लवकरच उलगडा झाला – सोनू हे शाळेत पाळलेल्या साळिंदराचं नाव. गावातल्या आदिवासींनी खाण्यासाठी धरलेलं हे साळिंदराचं पिल्लू त्यांना पैसे देऊन शाळेने सोडवून घेतलंय. सध्या त्याचा शाळेच्या आवारात मुक्तसंचार आहे. सूर्य मावळला, म्हणजे सोनूचा दिवस सुरू होतो. शाळेची मुलं त्याला घाबरत नाहीत, बाहेरून येणारे मात्र घाबरतात. आणि सोनूला लोकांना घाबरवायला आवडतं. जेवतांना कधी सहज मागे बघितलं, तर अचानक सोनू मागे उभा दिसतो! चपला खाणं, रात्रभर कुठल्या तरी खोलीच्या दारावर धडका देत राहणं, खोलीचं दार उघडं दिसलं, की लगेच आत शिरून गादी ‘पावन’ करून ठेवणं अश्या सोनूच्या लीला ऐकायला मिळतात. पण हा खोडकरपणा सोडला, तर सोनूचा कुणाला त्रास नाही. केचलाच्या शाळेचा तो एक अविभाज्य भाग आहे.

सोनू
    सोनूसारखंच एक हरणाचं पिल्लूसुद्धा सोडवून आणलंय शाळेने.

    दुसऱ्या दिवशी हरी, जगन, मुदली आणि त्यांचा अजून एक मित्र असे चौघं मला आश्रमाची बाग दाखवायला घेऊन गेले. भाजीपाला, फुलझाडं, फळझाडं रानफुलं असं जे त्यांना आवडेल त्याचा फोटो घ्यायचा असे आम्ही दीड – दोन तास बागेत भटकत होतो. सहा सात वर्षांची मुलं सोबत आहेत आणि तुमचा कॅमेरा हाताळायला मागत नाहीत असा माझा पहिलाच अनुभव. आपल्या सोडून कुणाच्याही खोलीत शिरायचं नाही, कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही, पाहुण्याचा कॅमेरा मागायचा नाही अश्या सगळ्या गोष्टी इतकी सहज शिकली आहेत ही मुलं ... दोन दिवस त्यांच्यासोबत राहतांना कुठे भांडण, मारामाऱ्या बघायला मिळाल्या नाहीत!

Kechla - Orchard
    दुपारच्या वेळी एक गावातली बाई औषध घ्यायला शाळेत आली होती. गावातल्यांना लागतील अशी थोडीफार औषधं शाळा पुरवते. वैद्यकीय मदत हवी असेल, तर शाळेच्या लॉंचमध्ये घालून दवाखान्यात पोहोचवतात काही वेळा. नकळत मनात हेमलकसा प्रकल्पाचा विचार आला. तोही दुर्गम आदिवासी भागातच आहे. दोन्ही ठिकाणची गरज बऱ्याच प्रमाणात सारख्याच असणार. पण दृष्टीकोनात फरक आहे. केचला प्रकल्प मुख्यतः पुढची पिढी डोळ्यासमोर ठेवून उभा केलेला आहे.

    परतीचा प्रवास सरकारी लॉंचमधून आणि सरकारी गाडीमधून झाला. ज्या प्रवासाला जातांना तीन तास लागले होते, तेच अंतर परततांना आम्ही एक – दीड तासात कापलं. हा आहे शाळेकडच्या आणि सरकारी रिसोर्सेसमधला फरक. तसं बघितलं, तर केचलाच्या मुलांना शाळा उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम. ते काम कुणी स्वयंस्फूर्तीने करत असेल, आणि सरकारने त्यांना मदत केली, तर किती चांगला परिणाम साधता येतो, हे पुढच्या भटकंतीमध्ये बघायला मिळालं.

क्रमशः

केचलाचे अजून काही फोटो इथे आहेत.

Thursday, July 26, 2012

ओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे ...

    “इथे एक तोत्तोचानची शाळा आहे. तू बघायलाच हवीस!” हे निमंत्रण मिळाल्यावर माझ्या तोंडाला पाणी न सुटलं तरच नवल. फक्त एक छोटीशी अडचण होती - शाळेची जागा एखाद्या दिवसात जाऊन परतावी इतक्या जवळची नव्हती. पण एक नवा भाग बघायला मिळणार होता, आणि सरकारी काम कसं चालतं ते टेबलाच्या दुसर्या बाजूने बघायची संधीही होती. ज्या गावाचं नावसुद्धा मी कधी ऐकलं नव्हतं, अश्या ‘केचला’ नावाच्या ओरिसातल्या गावी ही शाळा होती. त्यामुळे साधारण ८ – १० दिवसांचा ‘फ्लेक्झिबल’ प्लॅन ठेवून पुण्यातून निघाले. (पुणे ते विशाखापट्टण रेल्वेने, पुढे होस्ट नेतील तसं कोरापुट या जिल्ह्याच्या गावी, केचलाच्या शाळेत, आणि जवळपास. येतांना परत विशा्खापट्टण ते हैद्राबाद, एक दिवस तिथे मुक्काम करून पुण्याला परत) 

    पहिला दणका पुण्यातून निघतानाच मिळाला. तिकिट इमर्जन्सी कोट्यातून कन्फर्म होणार होतं. जायच्या दिवशी सकाळपासून वीज नाही, त्यामुळे नेटवर स्टेटस बघणं शक्य नाही. रेल्वे एन्क्वायरीचा एकही फोन लागत नाही, लागला तर कुणी उचलत नाही. दुपारी साडेतीनची गाडी. अर्धा तास आधी स्टेशनवर पोहोचले. ‘भारतीय रेल’ने बहुतेक या गाडीला आज वाळीत टाकलं होतं. गाडीच्या नावाची अनाउन्समेंट नाही, डिस्प्लेवर नाव नाही. चार्टचा पत्ता नाही. असा परिपूर्ण ‘Be Happy!’ अनुभव. अर्धा तास असाच गेल्यावर एकदाची गाडी “पाच बजे आने की संभावना है” म्हणून डिस्प्लेवर माहिती मिळाली. सवा पाच वाजले तरी गाडी “पाच बजे आने की संभावना” कायम. प्लॅटफॉर्म नंबरचा पत्ता नाही. सव्वा पाचला अखेरीस त्या पाच च्या संभावनेची सहा वाजताची संभावना झाली. सहा दहा वाजता भारतीय रेलला यात्रीगणांची बहुतेक थोडी कीव आली, आणि डिस्प्लेवर प्लॅटफॉर्म नंबरही दिसायला लागला. प्लॅटफॉर्मवर जाऊन पोहोचल्यावर दहा मिनिटांनी दुसरीच एक गाडी तिथे लावणार म्हणून अनाउन्समेंट. हिचं कुठे नावच नाही. चार्टचा पत्ता नाही. एव्हाना ‘इमर्जन्सी कोट्यातून तिकिट कम्फर्म झालेलं नाही’ ही आनंदाची बातमी पण मिळाली होती. चोवीस तासांपेक्षा लांबचा प्रवास एकटीने रिझर्वेशन नसताना करायची माझी तयारी नाही. पण तीन तास स्टेशनावर काढलेच आहेत, तेंव्हा पुढच्या दहा मिनिटांनी गाडी आलीच, आणि टीसी भेटलाच, तर एक शेवटचा प्रयत्न करून बघावा म्हणून चिकटपणाने थांबले. अर्ध्या तासाने गाडी (शेजारच्या) प्लॅटफॉर्मला आली, टीसीचं दर्शन व्हायच्या आत निघूनही गेली. आता ब्यागा उचलून पुन्हा घरी जाणे. बॅक टू पॅव्हेलियन.

    प्रचंड वैतागून घरी परतताना बरोब्बर कुणीतरी भेटतं, “गावाहून येते आहेस का? कुठे गेली होतीस? कसा झाला प्रवास?” या प्रश्नांना उत्तर देणं भाग पडतं. डोकं जरा शांत झाल्यावर जुनी रिझर्वेशन्स रद्द करणं, नवी करणं, बदललेल्या तारखा सगळ्यांना कळवणं आणि पुन्हा नव्याने प्रवासाची तयारी. जले पे नमक म्हणजे मी गावाला जाणार म्हणून नवर्याने ‘माहेरी’ जायचं बुकिंग करून ठेवलं होतं आधीच. (तो गेल्यावर मी माझा सगळा वैताग कुणावर काढू? :))

    तर इतकी हॅपनिंग अ-सुरुवात झाली तरी बाकी प्रवास मस्त झाला.

    पुण्याहून निघालेली गाडी मजल दर मजल करत दुसर्‍या दिवशी रात्री विशाखापट्टणला पोहोचली. दुसर्‍या दिवशी दुपारी तिथून निघायचं होतं, त्यामुळे सकाळचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी तिथल्या बीचवर एक फेरफटका मारला. समुद्रकिनारा आणि हिरवेगार डोंगर अशी दोन्ही नेत्रसुखं इथे एकाच ठिकाणी बघायला मिळतात. गाव पाहिल्याबरोबर आवडलं - आटोपशीर, पण सर्व सोयी-सुविधा असणारं असं वाटलं. जातानाच इथेला समुद्रकिनारा बघायला मिळाला, ते बरं झालं – पुण्याहून आल्यावर जे शहर आटोपशीर आणि सुंदर वाटलं, ते कोरापुटहून आल्यावर वाटलं नसतं :) 
 


Vizag Beach


Vizag Beach
क्रमशः

Saturday, July 14, 2012

जाईन विचारत रानफुला ...

    गेले दोन महिने मोठ्ठा ‘नेटोपवास’ झालाय. खूप लिहायचंय. पण उपास सोडायला हलक्या फुलक्या रानफुलांपासून सुरुवात करावी म्हणते आहे. :)

**********************************************
    गाडीचा चक्रधर आणि मार्गदर्शक दोघांची चुकामुक झालीय. गाडीतले बाकी सगळे आपापल्या परीने हा गुंता सोडवायचा प्रयत्न करताहेत. मला रस्ता माहित नाही, भाषा माहित नाही. वाट बघणं सोडून करण्यासारखं काहीही नाही. दोन मिनिटं गाडीत वाट बघत बसल्यावर रस्त्याच्या कडेची पिवळी फुलं खुणावायला लागतात.

    एका पिवळ्या फुलाचे फोटो काढता काढता त्या फुलांमध्ये लपलेली इतक्या वेगवेगळ्या प्रकारची रानफुलं समोर येतात ... इतकं काही आपल्या आजुबाजूला घडत असतं आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो!


    हा त्या पहिल्या पिवळ्या फुलाचा धाकटा भाऊ असावा. मोठं झाड दीड फुट उंच आणि फूल साधारण एक इंच व्यासाचं, तर हे झाड सहा इंचाचं, फूल पाऊण सेंमीचं. फूल दिसायला सारखंच, पानं वेगळी:


ही फुलं अगदी जमिनीलगतची:


तर ही झुडुपावरची:


एखादं फूल किती नाजुक असावं? तीन ते चार मिलिमिटर व्यासाचं हे फूल, अखंड वार्‍यावर डोलणारं:




 
















    हे कासचं रमणीय पठार नाही – पावसाळ्यातही वरकरणी रुक्ष, रखरखीत वाटाणार्‍या आंध्रामधल्या एका रस्त्याच्या कडेचा रानफुलांचा गालिचा आहे हा!

या चिमुकल्या फुलांचा बनलाय तो गालिचा !
  

****************************************

    रच्याकने, मे महिन्यात ब्लॉगचा चौथा वाढदिवस झाला. पण वाढदिवस आता इतका शिळा झालाय, की तो साजरा करण्याऐवजी “मोठ्यांचे वाढदिवस साजरे नाही केले तरी चालतात” म्हणून मी ब्लॉगची समजूत घातलीय. :D
    वाढदिवस काय आपोआप होत राहतात, त्यासाठी काही करावं लागत नाही. पण मी जरासे टायपायचे कष्ट घेतल्याने आमच्या कासवाने य़ा वर्षी शंभरी ओलांडलीय. त्यामुळे मी खूष आहे !!