Thursday, July 26, 2012

ओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे ...

    “इथे एक तोत्तोचानची शाळा आहे. तू बघायलाच हवीस!” हे निमंत्रण मिळाल्यावर माझ्या तोंडाला पाणी न सुटलं तरच नवल. फक्त एक छोटीशी अडचण होती - शाळेची जागा एखाद्या दिवसात जाऊन परतावी इतक्या जवळची नव्हती. पण एक नवा भाग बघायला मिळणार होता, आणि सरकारी काम कसं चालतं ते टेबलाच्या दुसर्या बाजूने बघायची संधीही होती. ज्या गावाचं नावसुद्धा मी कधी ऐकलं नव्हतं, अश्या ‘केचला’ नावाच्या ओरिसातल्या गावी ही शाळा होती. त्यामुळे साधारण ८ – १० दिवसांचा ‘फ्लेक्झिबल’ प्लॅन ठेवून पुण्यातून निघाले. (पुणे ते विशाखापट्टण रेल्वेने, पुढे होस्ट नेतील तसं कोरापुट या जिल्ह्याच्या गावी, केचलाच्या शाळेत, आणि जवळपास. येतांना परत विशा्खापट्टण ते हैद्राबाद, एक दिवस तिथे मुक्काम करून पुण्याला परत) 

    पहिला दणका पुण्यातून निघतानाच मिळाला. तिकिट इमर्जन्सी कोट्यातून कन्फर्म होणार होतं. जायच्या दिवशी सकाळपासून वीज नाही, त्यामुळे नेटवर स्टेटस बघणं शक्य नाही. रेल्वे एन्क्वायरीचा एकही फोन लागत नाही, लागला तर कुणी उचलत नाही. दुपारी साडेतीनची गाडी. अर्धा तास आधी स्टेशनवर पोहोचले. ‘भारतीय रेल’ने बहुतेक या गाडीला आज वाळीत टाकलं होतं. गाडीच्या नावाची अनाउन्समेंट नाही, डिस्प्लेवर नाव नाही. चार्टचा पत्ता नाही. असा परिपूर्ण ‘Be Happy!’ अनुभव. अर्धा तास असाच गेल्यावर एकदाची गाडी “पाच बजे आने की संभावना है” म्हणून डिस्प्लेवर माहिती मिळाली. सवा पाच वाजले तरी गाडी “पाच बजे आने की संभावना” कायम. प्लॅटफॉर्म नंबरचा पत्ता नाही. सव्वा पाचला अखेरीस त्या पाच च्या संभावनेची सहा वाजताची संभावना झाली. सहा दहा वाजता भारतीय रेलला यात्रीगणांची बहुतेक थोडी कीव आली, आणि डिस्प्लेवर प्लॅटफॉर्म नंबरही दिसायला लागला. प्लॅटफॉर्मवर जाऊन पोहोचल्यावर दहा मिनिटांनी दुसरीच एक गाडी तिथे लावणार म्हणून अनाउन्समेंट. हिचं कुठे नावच नाही. चार्टचा पत्ता नाही. एव्हाना ‘इमर्जन्सी कोट्यातून तिकिट कम्फर्म झालेलं नाही’ ही आनंदाची बातमी पण मिळाली होती. चोवीस तासांपेक्षा लांबचा प्रवास एकटीने रिझर्वेशन नसताना करायची माझी तयारी नाही. पण तीन तास स्टेशनावर काढलेच आहेत, तेंव्हा पुढच्या दहा मिनिटांनी गाडी आलीच, आणि टीसी भेटलाच, तर एक शेवटचा प्रयत्न करून बघावा म्हणून चिकटपणाने थांबले. अर्ध्या तासाने गाडी (शेजारच्या) प्लॅटफॉर्मला आली, टीसीचं दर्शन व्हायच्या आत निघूनही गेली. आता ब्यागा उचलून पुन्हा घरी जाणे. बॅक टू पॅव्हेलियन.

    प्रचंड वैतागून घरी परतताना बरोब्बर कुणीतरी भेटतं, “गावाहून येते आहेस का? कुठे गेली होतीस? कसा झाला प्रवास?” या प्रश्नांना उत्तर देणं भाग पडतं. डोकं जरा शांत झाल्यावर जुनी रिझर्वेशन्स रद्द करणं, नवी करणं, बदललेल्या तारखा सगळ्यांना कळवणं आणि पुन्हा नव्याने प्रवासाची तयारी. जले पे नमक म्हणजे मी गावाला जाणार म्हणून नवर्याने ‘माहेरी’ जायचं बुकिंग करून ठेवलं होतं आधीच. (तो गेल्यावर मी माझा सगळा वैताग कुणावर काढू? :))

    तर इतकी हॅपनिंग अ-सुरुवात झाली तरी बाकी प्रवास मस्त झाला.

    पुण्याहून निघालेली गाडी मजल दर मजल करत दुसर्‍या दिवशी रात्री विशाखापट्टणला पोहोचली. दुसर्‍या दिवशी दुपारी तिथून निघायचं होतं, त्यामुळे सकाळचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी तिथल्या बीचवर एक फेरफटका मारला. समुद्रकिनारा आणि हिरवेगार डोंगर अशी दोन्ही नेत्रसुखं इथे एकाच ठिकाणी बघायला मिळतात. गाव पाहिल्याबरोबर आवडलं - आटोपशीर, पण सर्व सोयी-सुविधा असणारं असं वाटलं. जातानाच इथेला समुद्रकिनारा बघायला मिळाला, ते बरं झालं – पुण्याहून आल्यावर जे शहर आटोपशीर आणि सुंदर वाटलं, ते कोरापुटहून आल्यावर वाटलं नसतं :) 
 


Vizag Beach


Vizag Beach
क्रमशः

16 comments:

Anagha said...

मुलगी लिहायला लागली बाबा शेवटी ! :)

Gouri said...

अनघा, अग आधी फोटो मार्गी लावायचे होते. मग लिहायचं. :)

हेरंब said...

Vaizag beach is ossam !!

Gouri said...

हेरंब, हो, मस्त आहे विशाखापट्टणचा बीच.

Raj said...

मस्त, पण मजा येत होती तेवढ्यातच भाग संपला. म्हणजे जसराज 'मंगलं भगवान विष्णु'म्हणून थांबले तर जसं वाटेल तसं काहीसं. :)

Gouri said...

राज, मोठ्ठी कहाणी आहे. सगळी एका दमात सांगायचा माझा स्टॅमिना नाही, आणि वाचणार्यांचाही नसणार, म्हणून लहान लहान तुकड्यात लिहिते आहे. पुढच्या इन्स्टॉलमेंटपासून फोटो सुरू होतील, मग इतकी लहान नाही वाटणार पोस्ट. :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

मुलगी लिहायला लागली बाबा शेवट!

>> "कसलं काय. बबन नमन कर" नंतर "बबन फणस आण" च्या आधीच धडा संपलाय. श्या !

Gouri said...

पंकज, पोस्टीचं नाव काय आहे बरं? हा फक्त पहिला घास आहे ना? ;)

Pankaj - भटकंती Unlimited said...

पण आचमनातच उरकलीये ना :-(

अपर्णा said...

अ-सुरुवात...
सुरुवात तर झाली ;)

Gouri said...

अरे उपवास सोडताना थोडं थोडं खाऊन सुरुवात करावी. नाही तर अपचन होतं. :)

Gouri said...

अपर्णा :)
अग मी इतकी वैतागले होते ना, की जाणंच रद्द करावं असं वाटत होतं मला!

Anonymous said...

गौरी, तोत्तोचानच्या शाळेचा उल्लेख करून उत्कंठा वाढवलीस. पण........तुकड्या-तुकड्याने भेटणार ती आणि तू पण ! असो . फार वाट पाहायला लावतेस बुवा...ठीक आहे भेटलीस हेही नसे थोडके :-) waiting for next post

Gouri said...

तृप्ती, पुढच्या पोस्टना इतकी नाही वाट बघायला लावणार ग!

Seems said...

Gouri tujhe blogs wachayla chan watate. Tu pustakach lihayla laag. An E-book mhanje chapaychi bhangad naahi

Gouri said...

Seems, ब्लाॅगवर स्वागत! मला एखाद्या पानाएवढं छोटं ललित / स्फुट लिहिता येतंय. एकदम पुस्तक म्हणजे मोठ्ठी उडी होईल! :)