ओरिसाहून येतांना थेट पुण्याला येण्याऐवजी हैद्राबादला जाऊन यायचा बेत होता. हैद्राबादहून पोचमपल्ली बघायला जायची संधी मिळाली.
पोचमपल्लीच्या वाटेवरल्या रानफुलांचे फोटो मागेच टाकलेत. पोचमपल्ली हैद्राबादहून एक-दीड तासाच्या अंतरावर, एका दिवसात सहज जाऊन येण्यासारखा रस्ता आहे.
पोचमपल्लीजवळ संस्थान नारायणपूर तालुक्यातल्या पुट्टुपक्कम गावात विणकरांना भेटायचीही संधी होती.
प्रथम पुट्टुपक्कमला जाऊन नंतर पोचमपल्ली बघायचं ठरलं. या भागात सगळी ताडाची आणि कपाशीची शेती आहे. ताडापासून गूळही बनवतात. (अमिताभ बच्चनचा ‘सौदागर’ आठवला यावरून.) पण हा गूळ काही बघायला मिळाला नाही कुठे. बरीचशी घरं ताडाच्या झावळ्यांनी शाकारलेली. ही उतरती छपरं जवळजवळ जमिनीला टेकणारी.
|
ताडाच्या झावळ्यांचं छत |
कोरापूटला सगळीकडे हिरवं बघायची सवय झाल्यावर हा प्रदेश एकदम सपाट, उजाड वाटतो. विणकरांच्या घरात शिरल्यावर हवेतला दमटपणा चांगलाच जाणवतो. घराचं छत ताडाच्याच लाकडाचं. उन्हाळा थोडातरी सह्य करणारं. या भागातलं हवामान बघितलं, तर हैद्राबाद हिल स्टेशन वाटेल!
इथले हातमाग
कोटपाडपेक्षा आधुनिक आहेत. यावर एका वेळी एका नमुन्याचा चार साड्या विणल्या जातात. आम्ही गेलो तेंव्हा कुठल्या तरी तारांकित हॉटेलसाठी पडद्याचं कापड विणणं चाललं होतं.
|
पुट्टुपक्कमचे हातमाग |
या भागाची खासियत म्हणजे बांधणीमध्ये केलेली सुंदर कलाकुसर. ग्राहक / व्यापारी कागदावर डिझाईन काढून देतात. त्याप्रमाणे बांधणीचं काम करून इथले कारागीर साड्या बनवून देतात.
|
कागदावरच्या नमुन्याप्रमाणे साडी विणली जाते आहे |
हे डिझाईन प्रत्यक्षात उतरवतांना प्रत्येक रंगाचा प्रत्येक भाग बरोबर रंगवण्यासाठी किती मेहनत लागते, ते बघितल्याशिवाय समजत नाही. पांढरं रेशीम बंगलोरहून इथे येतं. प्रत्येक रंगासाठी ते रेशीम बांधायचं, रंगवायचं, वाळवायचं, त्यानंतर पुढचा रंग. आणि हे एकदा उभ्या धाग्यांसाठी, एकदा आडव्या धाग्यांसाठी.
|
बांधणी - रेशीम रंगवणं चालू आहे |
याप्रमाणे रेशीम रंगून विणण्यासाठी तयार व्हायलाच तीन आठवडे लागतात. त्यानंतर चार आठवडे विणकामासाठी. साडीचे रंग कधी न विटणारे, रेशीम मजबूत, जर अस्सल.
|
रंगवून विणण्यासाठी तयार असणारं रेशीम |
एवढ्या कुशल कारागिरांनी, इतक्या मेहनतीने बनवलेली साडी बाजारात येते, तेंव्हा तिची स्पर्धा असते गुजरातच्या यंत्रमागावर बनलेल्या, बांधणीसारख्याच दिसणार्या प्रिंटेड साड्यांशी. या स्पर्धेत आपण टिकणं शक्य नाही हे पोचमपल्लीने स्वीकारलंय. दिवसेंदिवस इथले कारागीर रंगकाम, विणकाम सोडून रोजगारासाठी हैद्राबादकडे वळताहेत. अजून काही महिन्यांनी यातले कितीतरी माग दिसणार नाहीत.
नुकत्याच बघितलेल्या कोटपाडबरोबर पोचमपल्लीची तुलना सुरू होते मनात. कोटपाडला नव्या कारागिरांसाठी हातमाग प्रशिक्षण चाललंय. आणि त्याला प्रतिसादही मिळतोय. तिथली एथनिक डिझाईन्स पुढे आणण्यासाठी प्रयत्न चाललेत. पोचमपल्ली बांधणी मरायला टेकली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातली नसेल ही साडी, पण एक समृद्ध परंपरा म्हणून तरी ती टिकून रहावी असं वाटतं.
|
पोचमपल्ली साडी |
संस्थान नारायणपूर, पुट्टुपक्कम हा सगळा नक्षलग्रस्त भाग. नक्षल प्रश्नाविषयी बरंच काही बघायला, वाचायला, ऐकायला मिळालं या भटकंतीमध्ये. पुढची पोस्ट त्याविषयी.
****************
पोचमपल्लीचे अजून फोटो इथे आहेत.
2 comments:
कष्ट आणि कष्ट... फळ आणि फळ!
सामान्यांच्या आवाक्यात नक्कीच नाही मत्र अस्सल आणि दुर्मिळ आहेत हे मात्र नक्की.
अभिषेक, एवढं कौशल्याचं काम, आणि इतकी मेहनत. यानंतर त्यांना मोबदला काय मिळतो हे बघितलं, तर त्यांनी रोजंदारीसाठी हैद्राबादची वाट धरणं चूक नाही म्हणता येणार. आणि हे काम करायला मिळावं म्हणून धडपडणारे कोटपाडचे आदिवासी तरूण बघितले, म्हणजे अंदाज येतो त्यांचं आयुष्य किती कष्टाचं असेल याचा :( मी कधी साडी वापरत नाही, पण तरी एखादी विकत घ्यावी असा मोह झाला होता पोचमपल्लीला. :)
Post a Comment