सीतेचा आदर्श?
मला तर ती फार पॅसिव्ह वाटते.
जे काय वाट्याला येईल, ते निमूट भोगणारी.
नवरा म्हणजे देव मानणारी.
तो म्हणेल ते शिरसावंद्य.
पण मग तो जर कुठे चुकत असेल, तर ही त्याला मार्गावर कशी आणणार?
ही तर डोळे बांधलेल्या गांधारीसारखी चाललीय त्याच्या मागोमाग.
तो खड्ड्यात गेला, तर ही सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल टाकून खड्ड्यात जाणार.
शेवटी माणूसच आहे ना तोही?
त्याला कधी चुकायचं, तिच्या सल्ल्यामुळे सावरायचं स्वातंत्र्य नको?
मजा नाही अश्या जगण्यात.
बाई ग, तुला काहीच स्वतःची मतं, आवडीनिवडी, भावना नाहीत?
आयुष्यात कर्तव्यापलिकडे एन्जॉयमेंट म्हणूनही काही असतं ना!
भलतंच बोअरिंग आयुष्य वाटतंय हे.
त्यापेक्षा सावित्री किती डायनॅमिक.
कुठला तरी मठ्ठ पण लावून लग्न नाही केलं तिने.
स्वतः, आपल्याला हवा तसा नवरा शोधला.
कुळाची स्टेटस, कोण काय म्हणेल असला विचार न करता.
किंवा त्याला अमुक धनुष्य उचलता आलं, तमुक शरसंधान करता आलं असल्या सबबीमुळे नाही,
फक्त तो आवडला म्हणून.
हा फार जगणार नाही म्हणून लोकांनी सांगितल्यावरही ढळली नाही आपल्या निश्चयापासून.
त्याच्याशीच लग्न केलं.
परत हा वर्षभरात मरणार, मग ही सती जाणार असला मेलोड्रामा नाही.
त्यालाही जगवीन, मी ही आनंदाने जगेन असं म्हणण्याची,
आणि त्यासाठी साक्षात यमराजालाही झुकवण्याची धमक होती तिच्यात.
ही खरी आदर्श साथ.
काय वाटतं तुम्हाला?