सीतेचा आदर्श?
मला तर ती फार पॅसिव्ह वाटते.
जे काय वाट्याला येईल, ते निमूट भोगणारी.
नवरा म्हणजे देव मानणारी.
तो म्हणेल ते शिरसावंद्य.
पण मग तो जर कुठे चुकत असेल, तर ही त्याला मार्गावर कशी आणणार?
ही तर डोळे बांधलेल्या गांधारीसारखी चाललीय त्याच्या मागोमाग.
तो खड्ड्यात गेला, तर ही सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल टाकून खड्ड्यात जाणार.
शेवटी माणूसच आहे ना तोही?
त्याला कधी चुकायचं, तिच्या सल्ल्यामुळे सावरायचं स्वातंत्र्य नको?
मजा नाही अश्या जगण्यात.
बाई ग, तुला काहीच स्वतःची मतं, आवडीनिवडी, भावना नाहीत?
आयुष्यात कर्तव्यापलिकडे एन्जॉयमेंट म्हणूनही काही असतं ना!
भलतंच बोअरिंग आयुष्य वाटतंय हे.
त्यापेक्षा सावित्री किती डायनॅमिक.
कुठला तरी मठ्ठ पण लावून लग्न नाही केलं तिने.
स्वतः, आपल्याला हवा तसा नवरा शोधला.
कुळाची स्टेटस, कोण काय म्हणेल असला विचार न करता.
किंवा त्याला अमुक धनुष्य उचलता आलं, तमुक शरसंधान करता आलं असल्या सबबीमुळे नाही,
फक्त तो आवडला म्हणून.
हा फार जगणार नाही म्हणून लोकांनी सांगितल्यावरही ढळली नाही आपल्या निश्चयापासून.
त्याच्याशीच लग्न केलं.
परत हा वर्षभरात मरणार, मग ही सती जाणार असला मेलोड्रामा नाही.
त्यालाही जगवीन, मी ही आनंदाने जगेन असं म्हणण्याची,
आणि त्यासाठी साक्षात यमराजालाही झुकवण्याची धमक होती तिच्यात.
ही खरी आदर्श साथ.
काय वाटतं तुम्हाला?
4 comments:
खरे आहे..
मस्त मांडलेय.. :)
मला असे वाटते...
आज मी सीता बनायचे की सावित्री हा निर्णय बऱ्याचदा परिस्थिती ठरवते.
सीतेने कर्तव्यनिष्ठ पुत्राला साथ देण्याचे ठरवले आणि ती वनवासाला निघाली. घरात भांडणे लावून देण्यापेक्षा नवऱ्याबरोबर जंगलात मी आनंदाने राहीन अशी तिची विचारधारणा असावी. तसेच रामाने आपल्या राज्यातील एका नागरिकाचे वक्तव्य ऐकून दूर जंगलात पत्नीला पाठवण्याचे ठरवले, हा निर्णय एका कर्तव्यनिष्ठ राजाचा होता. आणि तो तिने मानला. आपल्या नातलगाला पाठीशी घालून समाजाच्या अहिताचे निर्णय, आपले नेते ज्यावेळी घेतात त्यावेळी नक्की काय घडते हे पदोपदी आपण बघतोच. आणि त्याचा नागरिक म्हणून त्रास देखील आपण सहन करतोच. रामाने हे जे दोन निर्णय घेतले, त्यामध्ये सीतेची फरफट झालेली आपल्याला दिसते. ते निर्णय चुकीचे होते, व ते सुधारण्याची गरज होती, वा खरे तर एक पत्नी म्हणून तिने ते सुधारण्यासाठी रामाची मदत करावयास हवी होती, असा विचार एक स्त्री म्हणून मनात येऊ शकतो. परंतु, आपला नवरा हा कोणी सामान्य नागरिक नाही तर तो एक राजपुत्र, एक राजा आहे ह्याचे भान त्या स्त्रीने ठेवायलाच हवे. व ते भान ठेवल्यावर जे तिचे मन तिला सांगेल ते तिने करावे. शेवटी, आपण जे निर्णय घेतो, त्याचे मरताना आपल्याला समाधानच मिळावे, इतकेच काय ते असते. जेव्हा समाज तिच्याकडे ती पवित्र आहे ह्याचे प्रमाण मागत होता त्यावेळी 'शेवटी, धरणीमाते मला आता पोटात घे ' हा निर्णय तिचा तिने घेतला. ह्या सर्व कथेमध्ये सीतेबरोबर एक माणूस म्हणून रामाची देखील फरफट झालेलीच आपल्याला दिसते. परंतु, एक पुत्र म्हणून आणि एक राजा म्हणून तो सन्मानाने, समाधानाने मरू शकला असेल, असे मला वाटते.
आता सावित्री...
सत्यवान सावित्री ही कथाच एकूण फार काल्पिक आहे. म्हणजे रामायण वा महाभारत वाचताना जसे आपण काही सद्य परिस्थितीचे संदर्भ लक्षात घेऊन विचार करू शकतो, तसे काही सावित्रीचा विचार करताना होत नाही. कारण एकूणच यमराज समोर दिसणे आणि मग त्याच्याकडे हट्ट धरून आपल्या नवऱ्याचा आत्मा परत मिळवता येणे ही तर एक कथा झाली. जी कोणा पुरुषाने लिहिली असावी, जेणेकरून समाजाला आदर्श स्त्रीसाठी एक प्रतिक मिळेल. व स्त्रीवर सावित्री बनण्याचे बोझे टाकता येईल. त्यामुळे मला सावित्री व्हायला आवडेल असे म्हणण्यात मला तसे फारसे तथ्य दिसत नाही. कारण एकूण प्रेमात पडणे आणि त्याच माणसाशी लग्न करण्याचा हट्ट धरणे इथपर्यंत ठीक आहे. हे आजही घडतेच. आजही स्त्री त्यासाठी, खडतर आयुष्य जगतेच. अंतिम ध्येय लक्षात ठेवून त्यासाठी झगडणे आणि ते प्राप्त करण्याची धडाडी अंगी बाळगणे हे कौतुकाचेच. दोन्ही स्त्रियांना स्वत:च्या पसंतीचा पती मिळाला होता. दोघींचा आपल्या नवऱ्याबरोबर रहाण्याचा हट्ट होता. आणि त्यासाठी त्यांनी पडतील ते कष्ट भोगले. फक्त दोघींची परिस्थिती वेगळी होती. व आपापल्या भूमिकेला अनुसरून त्या आपापल्या भूमिका जगल्या. सीतेला जे रावणाने पळवून नेले त्यामागे शेवटी तिचा सोनेरी हरणाचा क्षणिक मोह होता. आणि त्याची तिला देखील जाणीव असावी. त्या एका घटनेतून पुढे रामायण घडले. त्यामुळे तिने आलेले खडतर आयुष्य आपल्या मुलांबरोबर वनवासात व्यतीत केले असावे.
आजच्या घटकेला स्त्रीने सीता व सावित्री ह्यामध्ये काय निवड करावी हे शेवटी परिस्थिती ठरवते. स्त्रीचे मानसिक बळ हे इतके अफाट असते, की ती आयुष्यातील कुठल्याही प्रसंगाला तोंड देऊन पुन्हा तेव्हढ्याच ताकदीने ती उभी रहाताना आपल्याला दिसून येते. कधी तिच्यात सीता दिसते तर कधी सावित्री. आणि मग आपल्याला आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान वाटतो.
नाही का?
:)
भक्ती, उशिराने उत्तर देते आहे, सॉरी.
मुपी थाटाच्या एका लेखात ‘सीतेचा आदर्श ठेवावा’ असं वाचलं, तेंव्हापासून हे डोक्यात होतं :)
अनघा,
तुझी कॉमेंट वाचली आणि मोठ्ठ्या विचारात पडले. :)
तू म्हणतेस परिस्थितीवर बरंच काही अवलंबून असतं हे अगदी पटलं.
दोन्ही कथा पुरुषांच्या दृष्टीकोनातूनच लिहिल्या गेलेल्या, त्यांच्या सोयीच्या. तरीही सावित्रीच्या गोष्टीचे काही तपशील मला सीतेपेक्षा जास्त अपील होतात.
रामाबरोबर वनवासात जायचा निर्णय सीतेने घेतला तो ठीक. पण तो नंतरचा धोब्याचा प्रकार मला काही पटत नाही. काय संबंध त्या धोब्याचा? It was none of his business. राजा झाला म्हणून रामाने कुणाचंही ऐकून तिला दूर धाडावं? समाजाचं कुठलं हित साधलं याने? उलट तिच्या चारित्र्यावर विनाकारण कुणी शिंतोडे उडवत असेल, तर तिच्या पाठीशी उभं रहाणं काम होतं त्याचं. कलियुगातून रामायणाकडे बघतांना हे माझं मत. :)
पतीविषयी म्हणशील, तर सीतेला मिळाला तो पती पसंत होता, सावित्रीने पसंत होता त्याच्याशी लग्न केलं. सीतेचं स्वयंवर पण लावून झालं – म्हणजे जो कुणी पण जिंकला असता, त्याच्या गळ्यात माळ घालणं तिला भाग होतं. तो पण रामाने जिंकला, आणि तिला राम आवडला हा भाग वेगळा, पण रामाला वरण्यामध्ये तिचं मत, तिचा निर्णय कुठेच नाही. इथे “मी याच्याशीच लग्न करणार” असं स्वतः म्हणणारी सावित्री मला जास्त भावते.
सावित्रीच्या गोष्टीला पातिव्रात्य, जन्मोजन्मी हाच नवरा हवा वगैरे खूप संदर्भ जोडलेले आहेत, त्यांच्याकडे मी इथे बघत नाहीये. आपल्या पौराणिक कथांमधल्या आदर्श मानल्या जाणार्याव स्त्रीव्यक्तिरेखा मला बर्याहचश्या पॅसिव्ह वाटतात. म्हणजे त्या खूप मोठे त्याग वगैरे करतात, पण “मला असं जगायचंय” असं ठामपणे म्हणतांना फारश्या कुठे दिसत नाहीत. त्या दृष्टीने मला सावित्री आवडते.
Post a Comment