Monday, July 1, 2013

समृद्धीचे घेटो



सद्ध्या मला मराठी आणि इंग्रजी पेपरांच्या शनिवारच्या रंगीत पुरवण्या बघितल्यावर आपण स्वित्झर्लंडात असल्याचा भास होतो. फक्त स्वित्झर्लंडाची जनसंख्या भारताएवढी झाल्याने तिथे व्हिला बांधण्याऐवजी टोलेजंग इमारतींमध्ये माणसं रहायला लागली असावीत एवढाच फरक. सर्व सुखसोयींनी सज्ज रिझॉर्ट असावेत तसे अगम्य नावांचे गृहप्रकल्प पुण्याच्या आसपास कावळ्याच्या छत्र्यांसारखे सगळीकडे उगवतांना दिसतात. कारण त्यांना मार्केट आहे.

चांगली गोष्ट म्हणजे या सगळ्या सुखसोयी असणारी घरं घेण्याइतका पैसा इतक्या लोकांकडे आलाय. त्याहून चांगली गोष्ट म्हणजे यातल्या बहुसंख्यांनी हा स्वतः कमावलाय. त्याहून चांगली गोष्ट म्हणजे हा पैसा कमावणारे वेगवेगळ्या गावातून, आर्थिक, सामाजिक स्तरातून शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर पुढे आलेले आहेत.

हे लोक कंपनीच्या बसने किंवा स्वतःच्या वाहनाने कामावर जातात. त्यांची मुलं स्कूलबसने शाळेला येतात – जातात. शाळा खार्चिक आहेत, पण परवडतात. त्या दर्जाच्या सुविधा दुसर्‍या स्वस्तातल्या शाळांमध्ये मिळत नाहीत. यांची खरेदी बिग बझार, रिलायन्स किंवा एखाद्या मॉलमधून होते. त्यांच्या मनोरंजनासाठी मल्टीप्लेक्स आहेत. या वर्तुळाच्या आत सगळं काही शक्य तेवढं आलबेल आहे. बाहेरच्या घाणीपासून आणि गदारोळापासून दूर, सुसज्ज सिक्युरिटीच्या आत.

सरकारी सिस्टीम्स, बाकीचा समाज यापासून अलिप्त असे हे समृद्धीचे घेटो ठिकठिकाणी दिसतात, आणि दर वेळी त्यांचं बाकी समाजापासूनचं तुटलेलंपण बघितलं की हे आपल्याला पुढे कुठे घेऊन जाईल असा प्रश्न पडतो. समाजातला सामाजिक, आर्थिकदृष्ट्या उंचावलेला असा हा मोठा गट दूर जाण्यात फार मोठा धोका वाटतो. ते साध्या शाळांमध्ये मुलांना घालत नाहीत, त्यामुळे साध्या शाळांचा दर्जा खलावत जातो. ते सरकारी दवाखन्यात जात नाहीत, त्यामुळे तिथली बेपर्वाई वाढत जाते. ते सार्वजनिक वाहतुक वापरत नाहीत, मग सार्वजनिक वाहतुक स्त्रियांसाठी सुरक्षित राहत नाही. त्यांची मुलं सार्वजनिक बागांमध्ये खेळत नाहीत, आणि सार्वजनिक बागांमधलं मवाल्यांचं प्रमाण वाढत जातं. ते मतदान करत नाहीत, आणि गुंड निवडून यायला हातभार लागतो. ते सरकारी नोकर्‍यांचा विचार करत नाहीत, आणि  सरकारी नोकर्‍यांमध्ये सर्वोत्तम टॅलंट पोहोचत नाही.

आपल्याकडे मध्यमवर्गाचं एलियनेशन तसं जुनंच आहे ... पण आज जीवनशैलीमधल्या बदलामुळे ते अजून विस्तारलंय असं वाटतं. सगळ्याच क्षेत्रात रस्त्यावरच्या गर्दीपासून हा शहाणा गट तुटून अजून दूर दूर जातोय. परदेशात न जाताही आपल्याच देशात परका बनतोय. यात त्यांचा दोष आहे असं नाही, पण मुद्दामहून प्रयत्न केले, तरच त्यांना कुंपणापलिकडचं जग दिसेल अशी परिस्थिती आहे आता. ज्यांना कधी बाकी समाजात मिसळायची संधीच मिळाली नाही, अश्या यांच्या पुढच्या पिढीची परिस्थिती काय असेल? हा फार मोठा तोटा वाटतो एकूण समाजाचा. समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातून कुणी याचा अभ्यास करत असेल का? काय उपाय आहे यावर?

13 comments:

Anagha said...

तुझं निरीक्षण आणि त्याचं विश्लेषण आवडलं ! फार पटलं !

Raj said...

सहमत. खरं सांगायचं तर मला हल्लीचा समृद्ध मध्यमवर्ग डोक्यात जायला आहे. समृद्धी आहे ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे पण या समृद्धीमागे तृप्त भावना दिसत नाही. उलट जे आहे त्यापेक्षा अजून
कसं मिळेल त्यामागे धावण्याची वखवख दिसते. या मध्यमवर्गाचा विकेंड सतत जास्तीत जास्त कन्स्युम कसं करता येईल यातच जाताना दिसतो. चर्चाही यावरच होताना दिसतात.
लेटेस्ट मॉडेलचा आयफोन घ्यायचा कारण त्याची जाडी काही मिमीने कमी आहे, दोन महिन्यात परत नवीन मॉडेल येतं. यामुले किती कचरा निर्माण होतोय त्याची कुणाला फिकीर नाही.
गेली पन्नास वर्षे उपाशी राहील्यानंतर अचानक भरलेलं ताट समोर आलं तर जी वखवख होईल तीच सगळीकडे दिसते आहे.

परवा नॉम चॉमस्कीची मुलाखात वाचली. तो म्हटला मला भारताबद्दल सर्वात आश्चर्यकारक गोष्ट वाटते ती म्हणजे इथल्या मध्यमवर्गाचा निबरपणा.

http://tehelka.com/what-is-striking-in-india-is-the-indifference-of-the-privileged/

Gouri said...

अनघा, तुलाही जाणवतंय ना हे?

Gouri said...

राज, खरंय. आपल्या मागच्या बऱ्याच पिढ्यांना एवढी सुबत्ता बघायला मिळालेली नाही. माझे पैसे, मी उडवले, काय बिघडलं असा काहीसा भाव आहे त्यामुळे. त्याला वखवख म्हणायचं का महत्त्वाकांक्षा हे ज्याने त्याने ठरवावं, नाही का? पण त्याचे दुष्परिणाम नक्कीच दिसतात.
चॉमस्की च्या मुलाखतीतला फोटो किती बोलका आहे !

Mahendra Kulkarni said...

समाजापासून लोकं तुटलेले आहेत हे पटलं. मला पण समोरच्या घरात कोण रहातं हे माहीत नाही, कारण काही संबंधच नाही. जरी आपण ओळख करून घ्यायला गेलो , तरी अर्धं दार उघडून समोरची व्यक्ती बोलायला लागली की मग कसे संबंध टिकवायचे हा प्रशन पडतोच. असो. लेख वस्तुस्थितीला धरून आहे

Mahendra Kulkarni said...

अगदी बरोबर. कोणालाच कोणाशी संबंध टिकवायची इच्छा नसते. परवाच आमच्या स्किम मधे एकाचा मृत्यु झाला , तेंव्हा त्याच्या पार्थिवाबरोबर जाण्यासाठी ७-८ लोकं पण नव्हते.
संबंध नको असतो, कारण समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून काही तरी हवं आहे अशी आपली मनोधारणाझालेली असते. असो.

आळश्यांचा राजा said...

can't agree more on this. perfect analysis.

Gouri said...

महेंद्रकाका, "मला काय गरज?" असा थोडा भाव वाटतो, थोडा वेळेचा आभाव. त्यामुळे कामाशिवाय कुणाशी बोलणं दुर्मीळ.

अपर्णा said...

एकदम पटलं. आत्ताच्या भारतवारीत तर हे जास्त प्रकर्षाने जाणवलं आणि अनुभवलं देखील… ह्म्म्म्म… :(

Gouri said...

आरा, हे लिहितांना आपण गप्पा मारतोय असं वाटत होतं मला :)

Gouri said...

अपर्णा, बर्‍याच दिवसांनी मायदेशी आल्यावर हा फरक अजूनच प्रकर्षाने जाणवत असेल तुला!

akhildeep said...

अतिशय समर्पक लिहिलं आहे. मी माझ्या ऑफिस मध्ये देखील बघतो ना. अमेरिका वारी करून आलेल्याना रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट भारी असं तिकडे कळल्यामुळे साठवलेल्या पैश्यातून इकडे प्रॉपर्टी जमा करायची असते. १ घर असताना अजून २ घर घेणारे महाभाग मी बघितले आहेत. इतरांच देखील फार काही वेगळं नाही . २ बी एच के समजू शकतो पण दोघांच्या कुटुंबासाठी ३ बी एच के ? कळत नाही याची गरज काय आहे? स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करताना देखील दिसत नाहीत तथाकथित उच्च मध्यवर्गीय लोक . आयफोन कसा भारी याच जस्टीफिकेशन बरोब्बर देतील हे पण त्याचा इतरांच्या संपर्कासाठी वापर करायचा विसरत आहेत. माणसं तुटत आहेत हे तर कटू सत्य. अर्थात मी पण थोडा फार त्यातलाच. कळतं पण वळत नाही म्हणतात ते खरंच. उपाय हाच कि घरच्यांनी तरी सामाजिक जाणिवेचे धडे दिले पाहिजेत नाहीतर शाळेने तरी. शाळेत मुलांना होम वर्क मध्ये "शेजारचे काका काय काम करतात किंवा काकू च गाव कोणतं , बोलीभाषा कोणती' असे प्रश्न द्यावेत, जेणेकरून मुलांच्या निमित्ताने पालक एकमेकात मिसळतील . दोन वेगळ्या स्तरातल्या लोकांना कसं मिसळवायचं (किंवा मिसळवायचं कि नाही ) हे मात्र जहाल कोडं आहे. कारणही तसंच त्यांना जरा वाव भाव दिला कि डोक्यावर मिरी वाटायला निघतात. आमच्या बिल्डींग खालचा ग्यारेज वाल्याशी (ग्यारेजचा मालक स्वकष्टाने झालेला) जरा जवळीक केली तर तो मला घराची किल्ली मागायला लागला कशाला? तर दारू प्यायला जागा नाही म्हणे! आता कशी साधायची समानता?

Gouri said...

अखिल, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी अगदी मिसळलं नाही तरी चालेल एकवेळ, पण एकमेकांच्या आयुष्यात किमान डोकावायला तरी हवंच ... नाहीतर आपल्या पलिकडेही काही जग आहे हेच विसरायला होईल. सद्ध्या ते होतंय असं वाटतं मला.