Wednesday, October 23, 2013

एक ट्रक लाकूड



कदंब तोडला आज त्यांनी.

सकाळपासून एक एक फांदी छाटणं चाललंय.

इतक्या राजबिंड्या झाडाला असं विद्रूप होत होत मरतांना बघावं लागतंय – सात आठ वेळा तरी त्याच्याखालून गेले असेन मी दिवसभरात.

रोज त्याच्या जवळून जातांना त्याचं हिरवं वैभव डोळ्यात साठवून घेण्याचं सुख भोगलंय. भर उन्हात त्याच्या सावलीचा थंडावा अनुभवलाय. पाऊस सुरू झाल्यावर सारखा हा फुलला का म्हणून नजर ठेवून असायचं. आणि हा असा चुकार की नेमका पाऊस लागून राहिला की फुलणार, त्या सुंदर फुलांचा मनासारखा फोटो काही काढू देणार नाही.

आज मान वर करून त्याच्याकडे बघायची हिंमत नाही झाली. पायाखाली त्याच्या हिरव्यागार पानांचा गालिचा खुपतोय. त्याच्या समोरून जाणं टाळण्यापलिकडे काहीही करू शकत नाही मी.

“का तोडताय तुम्ही हे झाड?”
“त्याच्या फांद्या रस्त्यावर येतात.”
“मग?”
“सोसायटीच्या आवारातलं झाड आहे. परमिशन आहे आमच्याकडे. (तुम्ही कोण चौकशी करणार? )” 

झाड सोसायटीच्या आवारात आहे. त्याच्या जगण्यामरण्याचे निर्णय घेण्याचा अधिकार सोसायटीचा आहे. तुम्ही विनाकारण रक्त कशाला तापवताय?

तो आहे, हा त्याचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

सिमेंटकॉंक्रिटच्या जंगलात एवढं सुंदर झाड लावायची चूक मुळात कुणी कशाला करावी?

आणि निमूट समोर बघत रस्त्याने जायचं सोडून सोसायटीच्या मालकीच्या झाडावर जीव जडवण्याचा मूर्खपणा करणार्‍याने करावे तसे भरावे.

13 comments:

हेरंब said...

:(

Gouri said...

हेरंब, समोर हे चाललंय, काही करता येत नाही, नुसती हळहळ. आजचा सगळा दिवस असा गेलाय! :(

Anagha said...

काय करायचं ? :(

Raj said...

:(

https://www.youtube.com/watch?v=JaZmdZACMNo

Gouri said...

अनघा, करता येईल असं काही दिसत नाही आणि होणारं बघवत नाही. :(

Gouri said...

राज,
It was indeed my friend ... I had known it for years :(

भानस said...

देवा!काय हे.. :(

पण सोसायटीमधले झाड खरे तर त्यांना तोडण्याचे काहीच कारण नाही ना गं गौरी. फांद्या रस्त्यावर येतात तर तेवढ्याच कापा नं. सोसायटीच्या कमिटीने हरकत नाही का गं घेतली?

:( :(

Gouri said...

चर्पटपंजरीवरच्या मंजिरीची एक सुंदर प्रतिक्रिया आहे या पोस्टवर .... त्यातले खाजगी संदर्भ गाळून ती चिकटवते आहे:

गौरी,

काल तुझ्या post ची summary बघितल्यावर मला ती उघडून वाचायचा धीरच झाला नाही!
पण आज सकाळी मी तो कदंब पाहिला आणि राहवले नाही म्हणुन तुला लिहित आहे. खरं तर तु ही comment नकोच publish करुस.
योगायोग आहे हा. तो कदंब गेली ३ -४ वर्ष माझा पण मित्र आहे. (म्हणजे त्या लोकानी वाव दिला तो परत तरारेल अशी मला आशा आहे) एका अशाच ओल्या पावसाळी सकाळी त्याच्या वेड लावणा-या गंधाने त्याची ओळख करुन दिली होती. माझ्या प्रभातचालीचा तो एक प्रसन्न मित्र आहे. दोन कदंब एकावेळी नाही कापले जाणार तेंव्हा तु ज्याच्यासाठी हळहळते आहेस तोच असणार तो!

तुझा blog मला आवडतो. छान लिह्तेस तु! आणि माझा dormant blog चर्पट्पंजरी तुझ्या list मध्ये बघुन खुप छान वाटले!

ह्या प्रार्थनेसकट की,
Girta hua woh asma se
Aakar gira zameen par
Khwabon mein phir bhi badal hi the
Woh kehta raha magar
ke phir se mai ug aaunga!

-Manjiri

Gouri said...

श्रीताई, अग सोसायटीच्या लोकांनीच तोडायला सांगितल्या होत्या फांद्या. आणि रस्त्यात फार झुकलाय - पडेल असं वाटतंय / विजेच्या वगैरे तारांच्या मध्ये येतोय असं काहीच कारण नव्हतं. आणि फांद्या कापायच्या म्हणजे अक्षरशः एकही पान शिल्लक ठेवलं नाहीये त्यांनी - सगळीकडच्या सगळ्या फांद्या छाटल्यात. नुसतं भुंडं खोड शिल्लक आहे!

प्रसाद साळवी said...

काय योगायोग आहे, माझ्याही सोसायटीतला कदंब तोडला . थोडी सावली होती तीही गेली . बाहेर जाऊन पाच कुंड्या आणल्या आणी स्वत:पुरती स्वत:ची समजूत करून घेतली .

Gouri said...

प्रसाद, सगळ्याच कदंबांवर संक्रात आहे की काय एकदम? :(

अपर्णा said...

:( I only hope it grows back and show them that you can't just take someone else's life in your control..

Gouri said...

अपर्णा, माझीही हीच प्रार्थना आहे सद्ध्या. अजून मान वर करून भुंड्या झाडाकडे बघायचं धाडस होत नाही पण ... पुन्हा पालवी फुटल्यावरच दिसावा तो असं वाटतं :(