Thursday, December 26, 2013

मोठी तिची सावली ...

एक होती बाहुली.
तिच्या बाबांची लाडकी.
बाबा शहाणे होते.
आपल्या बाहुलीने शहाणं व्हावं असं त्यांना वाटायचं.
त्यांनी बाहुलीला शिकवायला सुरुवात केली.
आपल्या बाहुलीच्या हातून असं पाप होत असलेलं कुणा घरातल्याला बघवलं नाही.
त्यानी काचेची पूड करून बाहुलीला भरवली.
संपली लहान बाहुलीची गोष्ट!

***

सद्ध्या मनीमाऊला दिवसातून एकदा तरी "लहान माझी बाहुली" ऐकायचं असतं. ते म्हणतांना रोज मला ही दीड शतकापूर्वीची बाहुली आठवतेच आठवते! डॉक्टर विश्राम रामजी घोले यांच्या लहान मुलीची ही चटका लावणारी गोष्ट. अशा किती बाहुल्या कुणाला न कळता हरवून गेल्या असतील!

***
हे वाचल्यावर आईने मला डॉ. अरुणा ढेरे यांचं डॉ विश्राम रामजी घोलेंवरचं पुस्तक काढून दिलं परत वाचायचं असेल तर म्हणून. बाहुलीची गोष्ट पुन्हा एकदा तपासली त्या पुस्तकात. तिला काचा कुटून कुणी भरवल्या त्याचा उल्लेख नाही पुस्तकात - नातेवाईकांपैकी कुणीतरी हे केलं असं म्हटलंय. तशी दुरुस्ती केलीय वर.

Wednesday, December 25, 2013

Throwaway prototype


Nobody has ever thrown away a throw away prototype

हे ब्रह्मसत्य सॉफ्टवेअरमध्ये काम केलेलं कुणीही सांगेल.Throwaway protptype” ही एक सॉफ्टवेअर इंजिनियरिंगमधली एक कवीकल्पना आहे. आजवर कुणी प्रोटोटाईप बनवायचे कष्ट घेतल्यावर तो टाकून देऊन पुन्हा शून्यातून काम केलेलं नाही.
यंदा कंदील बनवतांना या कंदिलाला नेमके किती गोल लागतात आणि ते कसे जोडायचे हे मला अजिबात आठवत नव्हतं. म्हणून मग त्याचा छोटा प्रोटोटाईप बनवला. आयुष्यात पहिल्यांदा थ्रो-अवे प्रोटोटाईप आपण बनवतोय म्हणून मी एकदम खूश वगैरे होते. कंदील तयार झाल्यावर हा प्रोटोटाईप जवळजवळ थ्रो-अवे केलाच होता – तेवढ्यात कीर्तीची प्रतिक्रिया आली – कंदील कसा बनवलाय ते लिही म्हणून. मला लगेच प्रोटोटाईप आठवला – याचा फोटो टाकला तर लगेच समजेल कंदील कसा बनवलाय ते, म्हणून मग मग पुन्हा उत्खनन करून तो वर  काढला, जरा ठीकठाक करून फोटो बिटो काढले त्याचे. (हे पोस्टेपर्यंत पूर्णिमाचीही प्रतिक्रिया येऊन जुनी झालीये, आता तिला पुढच्या ख्रिसमसला बनवावा लागेल असा कंदिल :( )

तर, कंदिलाची सोपी कृती अशी:

लागलेला वेळ:
मला अडीच तीन तास लागले.

साहित्य:
जाड कागद १ (मी ६० सेमी * ९० सेमीचा कार्डशीट पेपर वापरला.), पातळ कागद (हा चक्क जुना बटारपेपर वापरलाय ;), कात्री, फेवीकॉल, दोरा. डिझाईनला उठाव द्यायला हवं असेल तर मार्कर, स्केचपेन वगैरे.

कृती:
पहिल्यांदा जाड कागदाचे ७.५ सेंटीमीटर त्रिज्येचे एकूण २० गोल कापून घेतले. (१९ मध्येही काम चालू शकतं.) (याचा कंदील साधारण फुटबॉलएवढा होतो.)

त्यांच्या अश्या त्रिकोणी घड्या घातल्या. (या घड्या जितक्या नेटक्या होतील, तितक्या कमी फटी पडतील कंदील तेवढा चांगला दिसेल. माझ्याकडे मुळात कंपासच नसल्याने आणि “मनीमाऊ उठण्यापूर्वी” ही महत्त्वाची अट असल्याने मी चालू काम केलंय.)


त्रिकोणावर सोप्पं डिझाईन कापून त्यावर पातळ कागद चिकटवून घेतले. इथे तुमच्या कल्पनाशक्तीला वावच वाव आहे. खूप कलात्मक वगैरे करायचं असेल, तर घडी होणार्‍या भागावरही डिझाईन करता येईल.


आता हे त्रिकोण जोडायचेत. म्हणजे वर्तुळाचे घडी घातलेले भाग एकमेकांना जोडायचेत. एका तुकड्याला तिन्ही घड्यांवर जोडण्याने सुरुवात केली. (प्रत्येक घडी वाळेपर्यंत थांबणं शहाणपणाचं, जे मी केलेलं नाही.) प्रत्येक जॉईंटला पंचकोन तयार करायचाय. निम्मे भाग जोडल्यावर असं दिसतं:



(हाच तो माझा टाकाऊ प्रोटोटाईप. :D )

असेच उरलेले नऊ (किंवा दहा) तुकडेही वरच्या बाजूला जोडले. शेवटचा (सगळ्यात वर येणारा, विसावा त्रिकोण) जोडला नाही तरी चालतं, किंवा डिझाईन ऐवजी बल्ब आत सोडता येईल असं भोक पाडून तो त्रिकोण चिकटवला, तर कंदीलाला अधिक बळाकटी येते.

आता कंदील टांगायला दोरा ओवायचा, आणि कंदिल तयार!