मलाला युसुफझाईवर
तालिबान्यांनी केलेला हल्ला, त्यातून तिचं वाचणं आणि मग जगभर तिचं झालेलं कौतुक हे
सगळं मागच्या वर्षी उडत उडत वाचलं. चौदा - पंधरा वर्षांच्या मुलीला अशी कितीशी समज असणार? तिच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला म्हणून पाश्चात्य मिडियाने तिला हिरो बनवली अशीच काहीशी
प्रतिमा झाली होती माझ्या मनात. आज प्रथमच तिचा तो बीबीसीवरचा ब्लॉग वाचला, त्यातुन उत्सुकता चळावली म्हणून जालावर तिच्याविषयी माहिती शोधली. तिच्या
बापाविषयी वाचलं, आणि त्याचं धैर्य (का वेडेपणा?) बघून थक्क झाले.
बाबारे, तुला कुटुंबकबिला
घेऊन पळून नाही जावंसं वाटलं? माझ्या देशात तालिबान नसतांनाही मुलांसाठी पुरेश्या
संधी नाहीत म्हणून भलेभले देश सोडून जातात, किंवा देश सोडता येत नाही
म्हणून हळहळतात. तालिबान्यांच्या गावात राहून अजाण वयाच्या मुलीला तू शाळेत
पाठवतोस, शिकून मोठी होण्याचं स्वप्न दाखवतोस. बीबीसीवर ब्लॉग लिहिण्यासाठी तिचं
नाव सुचवतोस, तिच्यावर डॉक्युमेंट्री काढू देतोस. तुला, तिला त्यांच्याकडून जिवे
मारण्याच्या धमक्या मिळत असतांनाही मी स्वातचं काहीतरी देणं लागतो, स्वातच्या अवघड
काळात स्वात सोडून जाणार नाही, इथेच राहणार म्हणून हटून बसतोस. आपली लाडकी मुलगी,
तिच्याहूनही लहान मुलगे – या सगळ्यांचं कसं होईल म्हणून भीती नाही वाटली तुला? स्वातमध्ये
तू उभी केलेली शाळा चालणं इतकं महत्त्वाचं वाटलं? मनात आणलं असतं तर स्वात सोडून
जाणं अशक्य नव्हतं तुला. अवघड नक्कीच होतं ... आपलं घर सोडून परमुलुखात वसणं
कुणाला सोपं असतं?
आम्हाला पत्ताही
नसतांना तुझ्यासारखे वेडे लोक जगभरातल्या कुठल्या कुठल्या दुर्गम भागात तालिबानशी वेड्यासारखे
लढत असतात म्हणून त्यांना जिंकता येत नाही.
***
मलालाविषयी एक माहितीपट इथे आहे.
***
मलालाविषयी एक माहितीपट इथे आहे.
2 comments:
गौरीताई, अगदी खरे लिहिले आहेस, मलाला बद्दल जितके वाचू तितके थक्क करून सोडणारे आहे. तिच्या वडिलांच्या दृष्टीकोनातून तर हे अजूनच जाणवते. तिची एक मुलाखत इथे बघितली : http://www.youtube.com/watch?v=gjGL6YY6oMs
गौरी, त्या लिंकबद्दन धन्यू ग! ती बघून मगच तुला उत्तर लिहावं असा विचार होता, पण ती काही नीट बघता येत नाहीये आज मला ... नेट फार मंद आहे बहुतेक :(
Post a Comment