सद्ध्या मऊचा आणि माझा दिवस पुस्तक वाचल्याशिवाय पूर्णच होत नाही. तिची सुंदर सुंदर पुस्तकं बघितली की पुन्हा मला तिच्या वयाचं होऊन ही पुस्तकं बघावीशी वाटतात.
आज तिच्या लाडक्या “बुप्पा”
आणि “मंबू” विषयी. ही सद्ध्या माऊची सगळ्यात आवडती पुस्तकं.
जंगलातल्या सगळ्या
लहान प्राण्यांच्या खोड्या काढणार्या, त्यांना त्रास देणार्या बुक्का हत्तीला एक
दिवस चांगलीच अद्दल घडते. त्याची आई, बाबा, मित्र कुणी सापडत नाहीत, आणि जंगलातलं
कुणीच त्याला मदत करायला तयार होत नाही. मग बुक्का शहाणा होतो. सुंदर चित्र,
सोप्पी गोष्ट, वाजवी किंमत. नॅशनल बुक ट्रस्टचं पुस्तक.
लंबू जिराफ आणि नॉटी
खारुताई यांच्या मैत्रीची गोष्टही एनबीटीचीच. लंबू जिराफ आहे, आपल्यापेक्षा वेगळा
आहे मग आपला मित्र कसा होणार असा प्रश्न पडलेल्या नॉटीला लंबू जूंबा हत्ती आणि
गप्पू माकड, रंगीला फुलपाखरू आणि फुलं असे मित्र दाखवतो, आणि आपल्यापेक्षा वेगळा
असला तरी लंबू आपला मस्त मित्र आहे हे नॉटीला पटतं.
माऊसाठी आतापर्यंत जी
काही पुस्तकं धुंडाळलीत, त्यात मला ज्योत्स्ना प्रकाशन, प्रथम प्रकाशन आणि नॅशनल
बुक ट्रस्ट यांची पुस्तकं सगळ्यात आवडली. पुस्तकातली चित्र, गोष्ट, किंमत या
सगळ्यात उजवी. बाकी स्लीपिंग ब्युटी आणि सिंडरेला सगळीकडे सहज मिळताहेत, पण कितीही
सुंदर कागदावर छापलेली मिळाली तरी छळ करणारी सावत्र आई, दुष्ट सावत्र बहिणी, गरीब
बिचारी नायिका आणि सोडवायला येणारा राजपुत्र असल्या भाकड गोष्टी तिला आवर्जून
सांगाव्यात असं मला तरी वाटत नाही.
तुम्ही दीड वर्षाचे
असाल तर काय काय वाचाल? अजून कुठली पुस्तकं सुचवाल मनीमाऊला?
12 comments:
http://www.arvindguptatoys.com/
Ruminations and Musings, धन्यवाद! मस्तच लिंक आहे अरविंद गुप्तांच्या साईटची ... तिथे केवढ्या पुस्तकांच्या पीडीएफ आहेत!
"तरी छळ करणारी सावत्र आई, दुष्ट सावत्र बहिणी, गरीब बिचारी नायिका आणि सोडवायला येणारा राजपुत्र असल्या भाकड गोष्टी तिला आवर्जून सांगाव्यात असं मला तरी वाटत नाही. "
अगदी खरं. कधीकधी वाटत मनुष्यस्वभावाचं नको इतकं बाळकडू लहानपणीच ढोसतो की काय मुलांना आपण.
छान लेख. :)
mercvision, ब्लॉगवर स्वागत!
एकदा माऊला सिंडरेलाची गोष्ट सांगायचा प्रयत्न केला तेंव्हा मला जाणवलं ही गोष्ट किती स्टिरियोटाईप्सनी भरलेली आहे ते. शेवटी आम्ही फक्त प्रत्येक पानावरचे उंदीरमामा काय करताहेत त्याची नवी गोष्ट बनवली!!!
मी तुला माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेली पुस्तकं सुचवेन. राधा आणि जय या दोघांची पुस्तकं माझ्या घरी तरी आवडतात. माझ्या ब्लॉगवर मी मध्ये मध्ये लिहिलं असणार पण या पुस्तकांबद्दल लिहिलं नाहीये हे आता ही कमेंट लिहिताना लक्षात आलं. तू वाच आणि लिही :)
अपर्णा, "राधाचं घर" मला खूप आवडलंय. त्याचा उल्लेख करायचा विसरले मी (अजून माऊबरोबर वाचलं नाही ते म्हणून)... ते पण ज्योत्स्ना प्रकाशनचंच आहे बरं! :)
मध्यंतरी मी हेरंबच्या लेकासाठी मराठी पुस्तकं घ्यायला आयडियलमध्ये गेले होते. आणि मी इतकी हिरमुसली होऊन परतले होते की काही विचारू नकोस ! काही नाहीच मिळाली मला मराठी पुस्तकं ! घेतली ती फक्त एकदोन माधवी पुरंदरे ह्यांचीच ! मला साधी विंदा करंदीकरांची कवितांची पुस्तकं पण मिळाली नाहीत ! किती वैताग आहे हा !!!
तुझा लेख मला माझ्या 'किशोर' मासिकाच्या जगात घेऊन गेला ! मी माझ्या लहान बहिणींना आणि नंतरच्या काळात लेकीला करंदीकरांच्या कविता भारी नाटकंबिटकं करून म्हणून दाखवत असे ते आठवलं ! किती मजा ! :) :)
अनघा, फार थोड्या ठिकाणी मिळतात ग मुलांची मराठी पुस्तकं! पुण्यात ‘अक्षरधारा’ ला मिळाली मला. नॅशनल बुक ट्रस्टची मुलांसाठीची इंग्रजी / मराठी पुस्तकं पण फक्त त्यांच्याकडेच बघितली पुण्यात. दुसरीकडे कुठे दिसली नाहीत. :(
लहानपणी ‘किशोर’ (आणि अमर चित्र कथा) ची पारायणं चालायची माझीही! :)
गौरीताई फारच छान विषय आहे ब्लॉग चा. खरतरं एरवी मी या विषयाबद्दल फारसा विचार केला नसता पण अलीकडेच पुण्यात शिफ्ट झालेय, आणि सध्या पुतण्याशी गप्पा-गोष्टी सुरु असतात. तो पण दीड वर्षाचा आहे. तू सांगितलेल्या प्रकाशनाची पुस्तके त्याच्यासाठी नक्कीच आणेन. कुठेतरी एक quote वाचला होता - 'a child who reads will be an adult who thinks' पुस्तकांशी मैत्री करण्याचे हेच योग्य वय आहे आणि दर्जेदार पुस्तकांसाठी जरा चोखंदळपणा करणे आवश्यक आहे.
गौरी, "a child that reads will be an adult who thinks" असं असेल तर फारच छान ... लेकीला सद्ध्या तरी पुस्तकं खूप आवडतात, त्यामुळे तिच्यासाठी वेगवेगळी पुस्तकं शोधणं हे माझं लाडकं काम आहे. :)
bookmarked!
पंकज, तुझ्याकडे पण आता अशी पुस्तकं जमा झाली असतील ना? :)
Post a Comment