म्हणजे घरी बनवलेला, घरी सजवलेला, घरी बसवलेला आणि घरीच विसर्जित केलेला बाप्पा.
यंदा बाप्पाचे दिवस जवळ आले तसे दुकानातले बाप्पा बघून माऊ इतकी खूश होती, की बाप्पा
घरी असणं मस्टच होतं. विकत घेतलेला बाप्पा आम्ही बसवत नाही, त्यामुळे बाप्पा बनवणं
ओघाने आलंच. मागे केलेल्या बाप्पाच्या अनुभवावरून यंदा त्यापेक्षा चांगला बाप्पा बनवायचे
मनसुबे मी रचत होते.
पण सुरुवातीलाच माशी शिंकली. माती आधी जास्त घट्ट, मग जास्त सैल, ती थोडी वाळल्यावर
बनवावी इतका वेळ नाही अशी सगळी गंमत गंमत झाली, आणि “होईल तसा करू” म्हणून मी तश्या
सैल मातीचाच बाप्पा बनवला. जरा वेळाने थोडा वाळल्यावर अजून एक हात फिरवता येईल अशी
आशा होती, पण थोड्या वेळानंतरची ती घडी काही आलीच नाही. बिचारा बाप्पा बनवला तसाच ओबडधोबड
वाळून गेला. आणि मी पण “हम तो बना चुके” म्हणून तसाच तो रंगवला. खरं तर मागच्या अनुभवावरून
बाप्पा शक्यतो रंगवायचा नाही असं ठरवलं होतं (मूर्ती पाण्यात विरघळल्यावर पोस्टर कलरचा
– प्रामुख्याने दागिन्यांना वापरलेला सोनेरी रंगाचा - वर तवंग आला होता मागच्या वेळी.
त्यामुळे न रंगवताच बसवायचा विचार होता आधी.) पण मूर्ती सुबक न झाल्याने नुसता पांढरा
रंग द्यायचा ठरवला मग.
असा बाप्पा चतुर्थीच्या तब्बल एक दिवस आधी तयार झाला, आणि मग पानाफुलांची आरास
करून झाल्यावर एकदम वेगळाच भासायला लागला. मातीची मूर्ती आणि बाप्पा यातलं ट्रान्स्फॉर्मेशन
खरंच माझ्या समजण्याच्या पलिकडचं आहे. पण आपणच केलेली, आतापर्यंत सगळ्या अंगांनी बारकाईने
निरखलेली मूर्ती आरती झाल्यावर वेगळीच दिसायला लागते एवढं खरं.
माऊच्या उत्साहापुढे मूर्ती तयार होईपर्यंत आणि नंतरही कशी टिकाव धरणार याची मला
फार शंका होती. “आपला बाप्पा आहे, त्याला हात नाही लावायचा, दूरूनच ‘मोरया’ करायचं”
हे तिला कितीही पढवलेलं असलं तरीही. पण दुसर्या दिवशी सकाळी तिला खुर्चीत चढून बाप्पाशी
गप्पा मारतांना ऐकलं ... “गुड मॉर्निंग बाप्पा ... कसा आहेस? तुझी गाई झाली का? :)”
आणि मग मी निश्चिंत झाले. बाप्पाचे पाच दिवस माऊला बाप्पा बाप्पा करत घरभर नाचतांना
बघणं एवढं मोठं सुख नसेल.
विसर्जनाच्या दुसर्या दिवशी बादलीत मूर्ती पूर्ण विरघळल्यावर “बाप्पा आता त्याच्या
घरी गेलाय.” हे थोडंफार पटलंय, पण “आई आपला बाप्पा कुठे गेला? तो कधी येणार आहे?” हे
प्रश्न अजून चाललेत. एवढ्यासाठीच तर होता ना घरचा बाप्पा? :)
8 comments:
" मूर्ती आरती झाल्यावर वेगळीच दिसायला लागते एवढं खरं." - एकदम खरंय !!
" दुसर्या दिवशी सकाळी तिला खुर्चीत चढून बाप्पाशी गप्पा मारतांना ऐकलं ... “गुड मॉर्निंग बाप्पा ... कसा आहेस? तुझी गाई झाली का? "
- :) काहीही 'मागणे' न ऐकवता…आपुलकीने केलेलील विचारपूस 'बाप्पाला' नक्कीच भावून गेली असणार !
नक्कीच!!!
बाप्पाच्या आणि माऊच्या अश्या प्रायव्हेट गप्पा जोरात चालल्या होत्या बरं पाचही दिवस! :)
सुंदर ! :) :)
अनघा, (नेहेमीप्रमाणेच) यंदाही आधी खात्री नव्हती वेळेत बाप्पा पूर्ण होईल म्हणून. त्यामुळे तुला म्हटलं नाही आधी. पुढच्या वेळी (जेंव्हा केंव्हा ती वेळ येईल तेंव्हा) नक्की ये बरं बाप्पाला भेटायला!
मस्तच :)
माऊचा बाप्पाशी संवाद आवडला.
सागर, माऊ आणि बाप्पा एकत्र अनुभवणं इतकं छान होतं ना! :)
सविता, एकदम वरिजनल ना! ;)
Post a Comment