निर्भयाची घटना घडली, तेंव्हा फक्त धक्का, अविश्वास एवढंच
वाटलं होतं, यापलिकडे काही सुचणं शक्यच नव्हतं. त्या घटानेतलं क्रौर्यच इतकं होतं
की विचारशक्ती गोठून जावी. हे सगळं घडलं तेंव्हा मी नवी आई होते, लेकीमध्ये पूर्ण
बुडून गेलेली. आपल्यासमोरचं हे इवलुसं गाठोडं उद्या मोठं होऊन घराबाहेर पडणार आहे
हा विचारही तेंव्हा मनाला शिवलेला नव्हता!
ती दवाखान्यात मृत्यूशी झगडत होती तेंव्हा असंही वाटलं
होतं, की हिला लवकर मरण यावं आणि या सगळ्यातून सुटका व्हावी तिची एकदाची. म्हणजे
चारित्र्यावर कलंक वगैरे म्हणून नाही, पण यातून ही वाचलीच, तरी काय स्वरूपाचं जगणं
वाट्याला येणार तिच्या? अजून एक अरुणा शानभाग म्हणून खितपत पडायचं का हिने?
शारीरिक पंगुत्व घेऊन आणि आयुष्यभरासाठी “रेप सर्व्हायव्हर” चा शिक्का घेऊन हिला
जगावं लागणार. १६ डिसेंबर २०१२ च्या मागे – पुढे तिला काही अस्तित्वच नाही!
“इंडियाज डॉटर” ही निर्भयाच्या
केसची मला तरी अतिशय उत्तम हाताळाणी वाटली. निर्भयाचे आईवडील – सामान्य
परिस्थितीतून पुढे आलेल्या त्यांची मुलीच्या भल्यासाठीची धडपड आणि ती गेल्यावरही,
तिने काही चूक केलेलं नाही, तिचं नाव का लपवून ठेवावं? हा विचार यामुळे त्यांना
खरोखर सलाम करावासा वाटला. त्यांचं बोलणं ऐकल्यावर प्रथमच मनापासून वाटलं, निर्भया
जगायला हवी होती. तिला जगायला मिळालं असतं.
सगळ्यात धक्का बसला तो गुन्हेगार (आणि त्यांचे वकील) यांचं
बोलणं ऐकून. दिल्लीच्या रस्त्यावर दिसणार्या कुठल्याही सर्वसामान्य माणसासारखेच
हे दिसतात, बोलतात. विकृत लिंगपिसाटसारखे नाही. त्यांच्या बोलण्यात केल्या गोष्टीचा
पश्चात्ताप कुठे दिसला नाही – “दोन्ही हातांनी टाळी वाजते. तिला अद्दल घडवण्यासाठी
आम्ही हे केलं. ती निमूट राहिली असती तर ही वेळ आलीच नसती!” असं समर्थनच दिसलं! दिल्लीत
शिकत असतांना याच रस्त्यांवरून मी बसने प्रवास केलेला आहे. रात्री आठ वाजताही. फक्त
मित्राबरोबरही. फरक इतकाच की बस इतक्या कमी गर्दीची नव्हती, खच्चून भरलेली असायची,
आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझं नशीब बलवत्तर होतं!
या गुन्ह्यातला तथाकथित बालगुन्हेगार अजून नऊ दहा महिन्यात उजळ माथ्याने पुन्हा दिल्लीत वावरत असेल या कल्पनेने थरकाप उडाला. तिहार जेलचे मानसतत्ज्ञ म्हणतात, तिहारमध्ये दोनशे दोनशे बलात्कार केलेलेही कैदी आहेत. दोनशे हा त्यांना आठवणारा आकडा. खरा आकडा याहून मोठाही असू शकेल! यातल्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या बलात्कारांसाठी त्यांना शिक्षा झालीय आजवर. बलात्कार झाल्यावर गुन्हेगार सहीसलामत सुटणं ही नेहेमीची बाब, शिक्षा होणं अपवादात्मक. आणि स्त्री समोर दिसली, तर पुरुषाचा हक्कच आहे हा ही भावना. ज्यांच्याकडे पैसे असतात ते पैसे फेकून मिळवतात, आमच्यात धमक होती म्हणून आम्ही पैसे न फेकता उपभोग घेतो हा माज! फाशीच्या शिक्षेने हे संपणारं नाही, मान्य. वृत्ती बदलायला हवी, मान्य. कुठे, कधी, कसं बदलणार हे सगळं? तोवर मुलींनी मुळात जन्मालाच येऊ नये, आलं तर घराबाहेर पडू नये, बाहेर पडल्यास परिणाम निमूट भोगावेत असं म्हणायचं का?
2 comments:
नमस्कार गौरी ताई … तुझं निर्भायाबद्दलचं मत पटलं पूर्ण … तुला आई म्हणून वाटणारी भीतीही कळतेय मला कारण माझ्याही आईच्या डोळ्यात हीच भीती थोड्या फार प्रमाणात पाहिली आहे मी … तू शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंसं वाटला मला … वृत्ती निश्चितपणे बदलायला हवी … ती खरोखर बदलेल कि नाही माहित नाही … पण तो पर्यंत मुलींनी सहन करायचं असा त्याचा अर्थ होत नाही … तोपर्यंत मुलींनी सक्षम व्हायला हवं … प्रतिकार करायला शिकायला हवं … समाज कधी बदलेल याची वाट नाही बघत बसू शकत आपण … आपण आपल्या मुलींना martial arts शिकवू … आणि अशक्य नाहीये हे … फक्त स्वतःवर स्वतःचा विश्वास हवा पूर्ण …
-निकिता
निकिता, सक्षम तर व्हायलाच हवं ग!
त्या शेवटच्या वाक्यात फार वैताग भरलाय ... बलात्कार करणार्याचं आर्ग्युमेंट पार डोक्यात गेलं माझ्या ... तिने प्रतिकार केला नसता, निमूटपणे सहन केलं असतं तर जीव गेला नसता म्हणे तिचा!!!
Post a Comment