भटकंती कितीही आवडली, तरी आपलं गाव, आपली जागा म्हणण्यासारखं, जिथे मला कुणी उपरं म्हणू शकणार नाही असं जगाच्या एका कोपर्यात काहीतरी असावं ही माझी एक प्राथमिक गरज आहे. माझ्या मागच्या कित्येक पिढ्या चाकरीसाठी भटकत राहिल्यात. नवर्याचीही तीच गत. त्यामुळे मला “आमचं गाव, आमचं शेत, आमचं घर” याविषयी सांगणार्या लोकांचा जरा हेवाच वाटायचा. आपण राहतो तेच आपलं गाव. मूळ गावावर जे काय प्रेम करायचं असेल ते त्यावरच करा हे आता कुठे कळायला लागलंय. (वळत नाहीच अजूनही!) पण तरीही रोज बदलणार्या, नवे रुपडे घेऊन येणार्या महानगराला आपलं म्हणणं थोडं जडच जातं. कितीही ओळखीचं झालं तरी ते बिनचेहर्याचं राहतंच. त्यामुळे जिथे सगळं गाव एकमेकाला ओळखतं, आपल्या पानातलं अन्न आपल्या शेतातूनच आलेलं असतं त्या “हरवलेल्या नंदनवना”ची स्वप्नं मला अजूनही पडतात. पावसानंतरच्या दिवसात बाहेरून बघताना ही गावं कितीही रमणीय दिसली तरी पोट भरायची मारामार झाल्यावर इथल्या रहिवाश्यांना यापेक्षा शहरातली झोपडपट्टी बरी म्हणावं लागतं हे माहित असूनही हे वेडं स्वप्न काही विरत नाही. या वेडेपणाची लागण माऊलाही व्हावी अशी इच्छा आहे. मातीची ओळख होणं हा त्यातलाच एक भाग. त्यामुळे ती जेमतेम चालायला लागली तेंव्हापासूनच तिला शेतात कधी घेऊन जाता येईल याचे मनसुबे मी रचते आहे.
या वर्षी अशी संधी मिळाल्यावर मी तिच्यावर (संधीवर बरं, माऊवर नाही !) झडप न घातली तरच नवल! माऊच्या मैत्रिणीच्या आईने कामाला येणार्या मावशी सुट्टी घेऊन भातलावणीला शेतात जाणार म्हटल्यावर त्यांच्या शेतावर जायचं आमंत्रण लावून घेतलं. तिथे जायला माऊ आणि मी अर्थातच एका पायावर तयार!
मधेच येणारी पावसाची सर, जरा दूरवर एकीकडे डोंगर आणि त्यातले धबधबे, वार्यावर डोलणारी पायर्या पायर्यांची भाताची खाचरं, शेजारून वाहणारा ओढा आणि पलिकडे धरणाचं पाणी! दोन्ही पिल्लांनी (आणि आयांनी) भातखाचरातल्या चिखलात, शेजारच्या ओढ्यात आणि सगळ्या प्रवासातच किती धमाल केली हे सांगायलाच नको! हे या छोट्याश्या भटकंतीचे काही फोटो:
आपण पाण्यात डुबुक डुबुक करू या? |
शेताशेजारचा ओढा |
चहाच्या ओढ्यात खेळावंच लागलं मग!
धरणाच्या पाण्याकडे |
धरणाच्या पाण्यात गाळ आहे, मावशी जाऊ देत नाहीये!
पाणी! |
वार्यावर डुलणारी भाताची रोपं, आणि झाडाला लागलेल्या कोवळ्या चिंचा!
पेरणीपूर्वी आजोबांनी नांगर धरलाय. |
4 comments:
Sundar :) chahachya panyat kitti majja keliye chhotyani. aajoli sheti aslyamule sheti, peeka, sugiche divas, sagle sagle agadi jeevki praan ahe :) kuthehi lal maati baghitli ki ajoba ajji cha shet dolya Samir yeta. Majhya chhoti la "farmer" vhaychay. 2.5 varshachi ahe pillu pan "seeds" matit ghalun tyala pani dyaychay. If she stays this ambitious till she grows up, my job's done :)
Kavs, लेकीला शेती करावीशी वाटली तर मज्जाच की! अजून काय पाहिजे!!!
Ho ga Gauri!! :) and I am really sorry for typing out Marathi in English, and all these typos! ��
Kavs, अग तुझ्या प्रतिक्रियेला मी उत्तरच लिहिलं नव्हतं इतके दिवस! सॉरी! अग वेळ नाही मिळाला तर मी सुद्धा कधीकधी English मध्येच लिहिते प्रतिक्रिया ... शेवटी संवाद जास्त महत्वाचा, नाही का?
Post a Comment