Friday, June 17, 2016

नेति नेति

सॉफ्टवेअरमधलं, सॉफ्टवेअरशी संबंधित काम सोडून मला चार वर्षं झाली.

त्यानंतरचे सहा महिने फक्त तब्येत सुधारण्याच्या प्रयत्नांचे.

पुढचं दीड वर्ष फक्त माऊचं.

मग हळुहळू जरा हातपाय हलवायला सुरुवात केली, काय करता येईल, काय करावं, याचा थोडा अंदाज घेतला, एकीकडे कोर्सेरावर थोडंफार नवं काही शिकत राहिले. एका सेवाभावी संस्थेत थोडं काम केलं. गेल्या आठ नऊ महिन्यांपासून पुन्हा थोडं काम करायला सुरुवात केलीये.

या सगळ्या काळात LinkedInवर मी फिरकलेही नाहीये, कारण तिथे मी अजूनही “IT Specialist” आहे. ज्या कुणी मला “काय करते आहेस / करणार आहेस” म्हणून विचारायचं धाडस केलंय त्यांना मी त्या क्षणी काय मनाला येईल ते सांगितलंय. कारण नेमकं उत्तर मलाच माहित नव्हतं. आज मात्र हे नेमकं उत्तर ठरवायचंच म्हणून बसले आहे.

काय करतेय मी नेमकं? एका social enterprise मध्ये मी संशोधक म्हणून काम करते आहे सद्ध्या. कशातलं संशोधन? नागरी विकास आणि नियोजनातलं. आपली शहरं अजून राहण्याजोगी कशी बनतील, काही मोजकी ओसंडून वाहणारी महानगरं आणि बाकी बकाल, ओस पडत असणारी गावं अशी परिस्थिती निर्माण न होता जिल्ह्याच्या शहरांमध्ये जान कशी आणता येईल - जेणेकरून महानगरांमधला स्थलांतरितांचा लोंढा कमी होईल, विकासातला समतोल साधला जाईल - याचं एक मॉडेल मांडलंय आम्ही. हे मॉडेल विदर्भ / मराठवाड्याला लावून पुढच्या दहा वर्षात भागांचा संतुलित विकास करण्याचा आराखडा तयार करतोय आम्ही सद्ध्या. यासाठी एकीकडे या भागांच्या परिस्थितीचा अभ्यास, तिथल्या लोकांना, विकासातल्या सर्व प्रकारच्या stakeholdersना भेटणं आणि दुसरीकडे आपलं मॉडेल अजून सुस्पष्ट, नेमकं बनवणं, विकास नेमकं कशाला म्हणणार आपण याचा विचार असं चाललंय. माऊला वेळ देणं हे मोठी priority असल्याने या think tank चं काम पूर्णवेळ करणं शक्य नाहीये मला अजून, पण मी freelancing करत जमेल तितका वेळ यासाठी देते आहे. मी पूर्णवेळ असू शकणार नाही, काही वेळा घरून काम करेन, माझ्या अन्य commitments असणार हे स्वातंत्र्य मला इथे मिळतंय.

काम आवडतंय, करायला मज्जा येतेय. इतकी वर्षं ज्या गोष्टी आवड म्हणून वाचत होते, त्या आता कामाचा भाग म्हणून अभ्यासायला मिळताहेत. डोक्याला खाद्य मिळतंय. मी वेळ काढू शकेन तेंव्हा fieldwork चीही संधी मिळेल. आयटीमध्ये शिरतांनाच हे आपण पाच ते दहा वर्षं करणार आहोत (तोवर hopefully आपल्याला काय हवंय हे समजलेलं असेल आणि मनासारखं काम सापडलेलं असेल) असं मनाशी ठरवलं होतं. आणि शिकायच्या / कामाच्या पहिल्या दिवसापासून आपण हे आयुष्यभर करू शकणार नाही याविषयी पूर्ण खात्री होती. आता हाती घेतलेलं काम करत राहू शकेन असा विश्वास वाटतोय. म्हणजे मी हे सोडणारच नाही असं नाही, पण “हे माझं काम नाही” म्हणून नाही, तर यापेक्षा नेमकं “माझं” काम सापडलं तर सोडेन.

हे सगळं छंद – विरंगुळा म्हणून फावल्या वेळापुरतं ठेवायचं नसेल तर त्यातून काही प्रमाणात तरी पैसे मिळायला हवेत असं माझं मत. आयटी क्षेत्राइतके मिळालेच पाहिजेत अशी अपेक्षा अर्थातच नाही, पण आपल्या खर्चासाठी कुणावर अवलंबून रहायची वेळ येऊ नये इतके नक्कीच मिळावेत. खेरीज funding source समजला म्हणजे काम खरं कुणासाठी चालतं हे स्पष्ट होतं. (त्यामुळेच टिपिकल NGO विषयी मनात साशंकता होती.) त्यामुळे या कामाला पैसे कुठून येतात हा प्रश्न माझ्यासाठी पहिल्या भेटीत विचारण्याइतका महत्त्वाचा होता. सुदैवाने हे काम सुरू करणार्‍यांनाही तो तितकाच महत्वाचा वाटला, संतुलित नागरीकरण हे त्यांचं स्वप्न असल्यामुळे त्यांनी संस्थेची उभारणी करताना एक टीम पैसे कमावण्याचे प्रोजेक्ट घेणारी आणि एक टीम मिळवलेले हे पैसे वापरून काम करणारी अशी रचना केली होती. त्यामुळे बाहेरच्या funding चा प्रश्न नव्हता.

आता सगळंच छान छान, गोड गोड चाललंय का म्हणजे? This is more or less a startup. आयटीमधल्या नावाजलेल्या MNC इतका professionalism इथे पहिल्या दिवसापासून कसा येणार? तितके resources कसे मिळणार? अशा काही मर्यादा राहणारच, आणि त्याच वेळी स्टार्टपचं स्वातंत्र्यही असणार. पण इतक्या काळात कॉर्पोरेट क्षेत्रात नसल्याचं खरोखर दुःख मला झालं ते मागच्या आठवड्यात. बाबांना अचानक बरं नव्हतं, दवाखान्यात भरती करायची वेळ आली. आयटीमध्ये होते तोवर त्यांचा health insurance घेता येत होता मला corporate scheme मध्ये. आता तो घेणं शक्य नाही. म्हणजे personal मिळेलही, पण त्यात किती गोष्टींचा coverage नाही आणि premium किती आहे हे बघितलं तर त्यापेक्षा न घेणं परवडेल.

आतापर्यंतची इतकी वर्षं वाया घालवली का म्हणजे मी?

मला नाही वाटत असं. आयटीमध्ये जायचं ठरवलं तेंव्हा हातात तेंव्हा उपयोगी पडेल असं काहीच नव्हतं, आणि काय करावंसं वाटतंय हे फारच धूसर होतं. काहीही पार्श्वभूमी नसतांना या क्षेत्राने मला प्रवेश दिला. (मी कितीही नाकारली तरी) एक ओळख दिली, आत्मविश्वास दिला, काम करायची रीत शिकवली. थोडंफार जग बघायची संधी दिली, जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांबरोबर काम करायला मिळालं. उत्तम आणि हलकट दोन्ही प्रकारातले सहकारी दिले. Professionalism आणि commitment काय असतात हे शिकवलं. आणि पैसाही दिला. People management, time management शिकवलं, crisis management, handling difficult situations चे धडे दिले, आणि analytical thinking चांगलं पक्कं करून घेतलं. माझ्या नव्या कामाच्या ठिकाणी मी ही सगळी शिदोरी घेऊन जाते तेंव्हा माझं contribution नवशिक्या, अननुभवी व्यक्तीपेक्षा नक्कीच जास्त असेल, आणि माझ्या नव्या क्षेत्रातल्या लोकांपेक्षा वेगळंही.

ही सगळी गंमत “freelance researcher” अशा दोन शब्दात LinkedInवर कशी टाकणार? अजून थोडे दिवस तिथे “IT Specialist”च रहावं हे बरं!

2 comments:

Hemant H. Patil said...

आयुष्यभर एकच प्रकारच काम करत राहण्यात प्रत्येकाला कितीवेळ स्वारस्य राहील हे सांगता येत नाही, पण वेगवेगळी आणि समाजोपयोगी काम करण्यात पण आनंद खूप आहे. आपला निर्णय खूप dashing आहे. आपल्या कडून बरेच जण प्रेरणा घेतील.

Gouri said...

हेमंत, ब्लॉगवर स्वागत! आणि सॉरी ... तीन दिवस नेट नव्हतं त्यामुळे तुमची प्रतिक्रिया तशीच अप्रकाशित राहिली.
काही वेळा आता आपल्याला हे सोडलंच पाहिजे / केलंच पाहिजे असं आतून समजतं. ते करण्याला पर्यायच नसतो आपल्यासाठी. हा निर्णाय असाच. :) आणि मला सारखं नवं काहीतरी करायला हवं असतं. आयुष्यभर एकच काम करणं माझ्यासाठी फारच अवघड आहे!