Wednesday, September 7, 2016

आयता (आणि सुशिक्षित) बाप्पा

    पुण्यात दर वर्षी पर्यावरण पूरक बाप्पा बनवण्याच्या ढिगाने कार्यशाळा होतात, पण आजवर मला त्यातल्या एकाही ठिकाणी जायची बुद्धी झालेली नाही. माकडाच्या घरासारखं दर वर्षी घाईघाईने बाप्पा बनवतांना मी ठरवते, की पुढच्या वर्षी नक्की कार्यशाळेला जायचं, तंत्र शिकून घ्यायचं, आणि बाप्पाबरोबरच या विचाराचंही विसर्जन होतं. या वर्षी चक्क आमच्या सोसायटीमध्येच कार्यशाळा होती, पण मला यंदाही न जायला सबब होतीच. (अगदी खरं सांगायचं तर मला तितकं मनापासून जावंसंच वाटत नाहीये अशा कार्यशाळेत. मूर्ती बनवण्याचं तंत्र मला माहित नाही, कुणाला कधी बनवतांना पाहिलेलंही नाही. पण आपण जमेल तसा, बनवला – मोडला – परत बनवला असा चुकत माकत बनवलेला बाप्पाच जास्त आवडतोय. दर वेळी मी नव्या चुका करते आणि त्यातून आपण काहीतरी शिकतोय असा समज करून घेते. :) हा उगाचच अडमुठेपणा (आणि त्याहूनही शिकायचा कंटाळा) आहे, हे समजतंय. आपलं अडाणीपणा ग्लोरीफाय करणं चाललंय, हे कळतंय पण तरीही!), पण माऊची आजी जायला उत्सुक होती, वेळ, जागा पण तिच्या सोयीची होती. त्यामुळे तिचं नाव नोंदवलं, आणि या वर्षी आपण आजीने बनवलेला आयता बाप्पा बसवू या असं ठरवलं!

आजी कार्यशाळेला गेल्यामुळे बर्‍याच नव्या गोष्टी कळल्या: त्यांनी माती चाळून घेतली, जी मी नेहेमी घेत नाही. शिवाय, माती नेमकी किती घट्ट भिजवायची हे बघायला मिळालं. (पुरीच्या कणकेसारखी घट्ट!) अजून एक युक्ती म्हणजे हात, डोकं जोडतांना मधे टूथपिक किंवा छोटी काडी घातली म्हणजे ते जास्त पक्कं बसतं. नाही तर हात, डोकं करतांना मला नेहेमी टेन्शन असायचं तुटायला नको म्हणून. खेरीज, बाप्पाची बैठक करतांना पाय आणि धड कसं जोडायचं हा मला नेहेमी पडणारा प्रश्न. बाप्पाच्या गळ्यात रुळणारा मोठा हार, शेला, उपरणं असं करून मी पोट बर्‍यापैकी झाकून टाकते, म्हणजे तिथलं कन्फ्यूजन बघणार्‍याला कळत नाही. ;)  कार्यशाळेच्या पध्दतीत ते आधी नुसते पाय करून घेतात, मग त्यावर एक उभा दंडागोल ठेवतात. नंतर पोट मोठं करण्यासाठी (लंबोदर!) त्याला वरून अजून थर लावतात. हे जास्त सोपं आहे. मी बाप्पा बनवतांना टूथपिक वगळाता काहीही हत्यार वापरत नव्हते. साध्यासाध्या हत्यारांनी मूर्तीमधली सफाई कितीतरी वाढते. मूर्ती पूर्ण वाळेपर्यंत (साधारण ३ दिवस लागतात) रोज गार्डन स्प्रेयरने तिच्यावर पाणी मारायचं म्हणजे तडे जात नाहीत. (गार्डन स्प्रेयर नसेल तर रंगाच्या ब्रशने.)मूर्ती सावलीतच सुकवायची.




    रंगकामाच्या दिवशी मात्र आजी तिथे शिकायला गेली नव्हती. कारण मला विसर्जनानंतर मूर्ती विरघळल्यावर हीच माती पुढच्या वर्षी परत वापरायची होती, आणि तिथे ते नेहेमीचे रंग वापरणार होते. हे रंग पर्यावरणपूरक नाहीत. त्यांचा (विशेषतः सोनेरी रंगाचा) पाण्यावर तवंग येतो, माती परत वापरता येत नाही मग. आजीने मग पोस्टर कलर वापरून बाप्पा घरीच रंगवला.

    बोनस म्हणजे आजीचं पाहून माऊच्या कलाकार ताईला पण स्फूर्ती झाली. तिने पण आजीच्या मार्गदर्शनाखाली एक छोटा बाप्पा बनवला. त्यामुळे आमच्याकडे या वर्षी दोन दोन मस्त आयते आणि शिकलेले बाप्पा आले!


    बाप्पाच्या सजावटीसाठी फुलांची प्रभावळपण आजीने बनवली आहे. हिरव्या रंगासाठी करवंट्यांमध्ये गहू पेरले होते, पणत्यांमध्ये अळीवपण पेरले होते. नेमक्या किती दिवसात गहू येतील याची खात्री नव्हती, आणि अळीव किती दिवस चांगले दिसतील याची. पाच दिवसांमध्ये गव्हाचे अंकूर मस्त दिसायला लागले, ते सजावटीसाठी वापरले. अळीवाला पणत्यांमध्ये जागा थोडी कमी पडली. शिवाय पाच दिवसात ते जास्त मोठे झाले, वेडेवाकडे वाढले. त्यामुळे ते वापरले नाहीत. हे फायनल बाप्पा:




    बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी मला हे सगळं अजून नीट शिकून घेण्याची बुद्धी द्या!!!

***
काल ही पोस्ट टाकली, पण मन भरलं नव्हतं. या वर्षी बाप्पाला नीट, पोटभर भेटायला मिळालंच नव्हतं अजून. आणि फोटो पण सगळे घाईघाईत काढले होते.  त्यामुळे समाधान वाटत नव्हतं. काल दुपारी संधी मिळाली. बाप्पा आणि मी निवांत भेटलो, गप्पा मारल्या, थोडे फोटो पण काढले. मग जरा बरं वाटलं. कालचे फोटो इथे आहेत :

https://goo.gl/photos/NzUkewyMmLtH9itm7



2 comments:

rajiv said...

बाप्पा बघितले तर होते, पण त्यामागील व त्यामधील खाचाखोचा समजल्याने अजूनच गम्मत वाटली .

Gouri said...

काका, आपण बाप्पा बनवण्यात हीच सगळ्यात मोठी गंमत असते असं मला वाटतं ... कधी अचानक एखादी गोष्ट सुचते आणि आवडून जाते, काहीतरी जमतच नसतं, उत्साह - आत्मविश्वास - शंका - निराशा - नवंसुचणं - हेजमणारचनाहीयेकशालायाफंदातपडलोम्हणूनवैतागणं - झालेल्याचंसमाधान / नजमल्याचीचुटपूट अशा मूर्ती तयार होऊन बाप्पा बसवण्याच्या आधीच आपल्या त्याच्याशी आणि स्वतःशीही एवढ्या गप्पा झालेल्या असतात!