Tuesday, November 14, 2017

जास्तीची मेजॉरिटी :(

गेल्याच आठवड्यातली गोष्ट. चांगल्या घरातल्या आठ – दहा वर्षाच्या मुलामुलींविषयी कुणीतरी भिंतीवर वाईटसाईट लिहिलं होतं. त्यांच्या वयाला तर अजिबातच न शोभणारं. कुणी लिहिलंय याचा शोध झाला. हे लिहिणारी सुद्धा त्यांच्याच वयाची मुलंमुली निघाली. त्यांच्यासारखी चांगल्या घरातलीच. सगळ्यांपुढे त्यांनी आपली चूक कबूल केली, आईवडलांनी भिंत रंगवून द्यायची तयारी दाखवली.

भिंत रंगवली, की तिच्यावर लिहिलेलं पुसलं जाईल. पण लिहिणार्‍यांच्या मनातून कधी आणि कसं पुसलं जाईल हे? सगळ्यांसमोर आपली चूक कबूल करताना इतका टोकाचा राग येण्याचं कारण पण सांगितलं लिहिणार्‍यांनी. ज्यांच्याविषयी लिहिलंय, ती मुलं त्यांना आपल्यात घेत नव्हती, खेरीज इतरांनाही सांगायची यांना आपल्यात घेऊ नका म्हणून. आईवडिलांकडे ही तक्रार केली. पण त्यांना वाटलं, मुलांचं भांडण, त्यांच्यातच मिटेल. त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि मग शेवटी हा असा स्फोट झाला गेल्या आठवड्यात.

या प्रसंगाने मला हादरवलंय.  माऊपेक्षा जेमतेम तीन – चार – फार तर पाच वर्षांनी मोठी मुलं आहेत ही. तिच्या ओळखीची, तिच्याशी छान बोलणारी, क्वचित खेळणारी, वागायला बोलायला चांगली. बहुतेकांच्या घरातल्यांना मी ओळखते. यांच्या जगात एवढं बुलिंग असतं! आणि आई-वडील-आजी-आजोबा-ताई-दादा अशा कुणाला त्याचा पत्ताही नसावा इतकी लांब जातात मुलं तीन-चार वर्षात? यातल्याच कुठल्यातरी गटात अजून तीन वर्षात माऊ पोहोचू शकते! तिच्या मित्र मैत्रिणींनी असं कुणाला तरी ठरवून वाळीत टाकलं, किंवा तिला वाळीत टाकलं म्हणून चिडून तिने असं काहीतरी केलं, तर माझी प्रतिक्रिया काय असेल? या प्रसंगासारखे सगळ्यांसमोर तिला फटके देईन मी? आपल्या मुलानी एवढं लाजिरवाणं काहीतरी लिहिल्यावर वाटणारा अपमान, अविश्वास, राग हा आपल्या मुलाने हे का केलं हे समजून घेण्याच्या इच्छेपेक्षा काही काळ तरी प्रबळ ठरेल? आपल्या मुलांनी बुलिंग केलं यापेक्षा त्यांच्याविषयी कुणीतरी वाईट लिहिलं याचा राग मोठा ठरेल?  आपल्या मुलाविषयी दुसर्‍या लहान मुलाला इतका राग आलाय, त्यालाही मदतीची गरज आहे, सगळीच मुलं आहेत त्यांना समजून घ्यायला हवंय, त्यांना परत एकत्रच रहायचंय याचं भान राहील? का “अपराधी” मुलांच्या आईवडिलांशी मला याविषयी काही बोलायचंही नाहीये असं म्हणेन मी?

मुळात इतक्या लवकर माऊने इतकं दूर जाण्याची कल्पनाच पचवणं फार जड आहे. तिला वाढायला वाव तर मिळायला हवाय, पण काहीही करायची मोकळीक इतक्या लहानपणी नकोय. कसं जपायचं? :(

Thursday, October 12, 2017

सोप्पा कंदिल

मागच्या वर्षी माऊसोबत केलेल्या आकाशकंदिलाच्या प्रयोगानंतर यंदा असंच सोप्पं माऊला जमेल असं काहीतरी करायचं मनात होतं. माऊ आणि सखी दोघींना एकत्र घेऊन कंदिल करायचे होते. वेळही जास्त नव्हता हाताशी. तेंव्हा मग एक पिवळा टिंटेड पेपर (कार्डशीटपेक्षा पातळ) आणि एक बटर पेपरसारखा (ट्रेसिंग पेपर पेक्षा कडक पण बऱ्यापैकी पारदर्शक कागद घेऊन आले. (याला काय म्हणतात ते विसरले!)

कागदाच्या आकाराचा अंदाज घेण्यासाठी आधी साध्या A4 कागदाचा प्रोटोटाईप बनवून घेतला. 




टिंटेड पेपरचा १८ इंच * १३ इंचाचा चौरस कापून घेतला. त्याला लांबीच्या बाजूने मधे घडी घातली. आणि पट्ट्या कापण्यासाठी साधारण एक एक सेंटीमीटरवर रेषा काढून घेतल्या. वरच्या – खालच्या दोन्ही टोकांना साधारण दीड इंच जागा (दुमडून) मधल्या सिलेंडरला जोडायला सोडली. 
माऊने मग या कागदावर फिंगर पेंटिंग केलं.

तोवर मी खालच्या झिरमिळ्यांसाठी १३ इंच * ११ इंचाचा टिंटेड पेपर कापून घेतला, त्याच्या १३ इंची बाजूला दीड इंच जागा सोडली आणि झिरमिळ्यांच्या पट्ट्या कापून घेतल्या.

मधल्या सिलेंडरसाठी ९ इंच * १३ इंचाचा बटर पेपर सदृश कागदाचा आयत कापून त्याचा ९ इंच उंचीचा सिलेंडर सेलोटेपने चिकटवला.

आता माऊची “कलाकृती” वाळली होती, त्यावर अधीच आखून ठेवलं होतं तशा पट्ट्या (अर्ध्या घडीवर दुमडून)  कापल्या. वरचे आणि खालचे दीड – दीड इंच सिलेंडरला जोडण्यासाठी ठेवलेले भाग दुमडून पाऊण इंचाचे केले (म्हणजे फ्रेमला जरा जीव येईल) आणि सिलेंडरला स्टेपलरने स्टेपल केले. खालच्या बाजूने त्यावरून खालच्या झिरमिळ्या स्टेपल केल्या. दीड – दोन तासात कंदिल तय्यार!!!  




***
यंदाच्या कंदिलामध्ये माऊला करण्याजोगं मागच्या वेळेपेक्षा बरंच जास्त होतं. पण “प्रोटोटाईप” बनून कागदाचा आकार ठरेपर्यंत तिचा उत्साह मावळायला आला होता. :) तरी फिंगर पेंटिंग आणि थोडीफार कापाकापी केली तिने. या वेळची तिची आणि माझी ऍचिव्हमेंट म्हणजे कंदिल पूर्ण होईपर्यंत माऊ सोबत होती!

Tuesday, October 3, 2017

कजा कजा मरू... २ :)

गेल्या आठवड्यात माऊचा वाढदिवस झाला. मागच्या वाढदिवसाला सगळी विकतची सजावट होती, या वेळी आज्जी आणि मी काहीतरी छान करावं असं ठरवत होतो.

माऊकडे दादाने दिलेली खूप छान छान गोष्टींची पुस्तकं आहेत. आमचा दादा पुस्तकं इतकी जपून वापरतो, की हे वापरलेलं पुस्तक आहे यावर सांगूनही विश्वास बसणार नाही. अगदी पुस्तक खराब व्हायला नको म्हणून त्याला पुस्तकावर नाव सुद्धा घालायचं नसतं! (मी लहान असताना मला पण दादा मंडळींनी वापरलेली गोष्टीची पुस्तकं मिळायची. ही पुस्तकं वाचणं म्हणजे creativity, problem solving आणि वाचन असं सगळं एकत्र होतं. बहुतेक पुस्तकातली पानं गायब असायची. कव्हर आणि पुस्तकाची फारकत तर नेहेमीचीच. त्यामुळे आधी एका पुस्तकाचे भाग जमवायचे, मग ते वाचायचं, त्यात एखादं पान नसेल तर आपल्या कल्पनाशक्तीने भर घालायची असं सगळं चालायचं. सगळे दादा लोक माऊच्या दादासारखे असते तर!)  तर या पुस्तकांमध्ये एक पांडा, फुलपाखरं आणि माकडाच्या गोष्टीचं गोडुलं पुस्तक आहे. त्यातलं एक चित्र माऊला, आज्जीला आणि मला इतकं आवडलं, की या वेळी माऊच्या वाढदिवसाला या मंडळींनाच बोलवावं असं ठरलं:




मग आज्जीने मस्तपैकी पांडा आणि माकडाचं चित्र रंगवून दिलं. त्यावर पानांनीच लिहायचं ठरलं. वरून रंगीबेरंगी कागदांची फुलपाखरं ठेवली. (चित्र माऊंट बोर्डवर पोस्टर, ऍक्रिलिक आणि वॉटर कलरने काढलं, फुलपाखरं घरात सापडलेल्या कागदांची. पेपर टेपने हे सगळं भिंतीला चिकटवलं, फुलपाखरं पण पेपर टेपनेच लावली.) “रिटर्न गिफ्ट्स” साठी ताईने अजून काही फुलपाखरं बनवून ठेवली. आणि माऊच्या वाढदिवसाची तय्यारी झाली!



हे सगळं करायला इतकी मज्जा आली, की सखीच्या वाढदिवसाला पण आपण असं काहीतरी करू या असं आज्जी आणि मी ठरवून टाकलंय! :)

Wednesday, September 27, 2017

जर्मन रहिवास

काही लोकांना आपण “बॅटरी चार्ज करून घ्यायला” भेटतो. राजगुरू सर त्यापैकी एक. सर आता सत्तरीच्या वर आहेत. कॉलेजमध्ये ते आम्हाला शिकवायचे त्या काळात ते टेनीस खेळायचे. बत्तीस वर्षं खेळल्यावर आता टेनीस बंद झालेय, पण व्यायाम आणि तंदुरुस्तीविषयी जागरूकता अजूनही आहे. सरांच्या दोघी मुली लग्न होऊन परगावी / परदेशी राहणार्‍या, घरात ते दोघेच. पण त्यांचं घर आणि मन स्वतःच्या म्हातारपणातच अडकलेलं नाही.  “आमच्या वेळी असं होतं, आता सगळं कसं वाईट झालंय” किंवा ”हल्ली मान दुखते, चालायला त्रास होतो, ऐकू येत नाही” यापलिकडेही बर्‍याच गोष्टींविषयी त्यांच्याशी गप्पा होतात. (त्यांना म्हातार्‍यांपेक्षा तरुणांचा सहवास आवडतो, “आम्हाला तू टाळतोस!” अशी त्यांच्या म्हातार्‍या मित्रांची तक्रार असते.;) ) अजूनही ते घरी येणार्‍या विद्यार्थ्यांना शिकवतात. आम्ही कॉलेजमध्ये होतो तेंव्हा सरांनी सांगितलेलं आठवतंय, “ग्रेसफुली म्हातारं होणं ही सुद्धा कला असते.” हे ग्रेसफुली म्हातारं होणं कसं असतं ते सरांकडून शिकावं. खूप दिवसांपासून त्यांना भेटायला जायचं होतं. अखेर या महिन्यात तो योग जुळून आला, आणि सरांची भेट झाली.

***

सरांकडे “जर्मन रहिवास” असं पुस्तक दिसलं, सहज चाळायला घेतलं, आणि पहिल्या काही पानातच पुस्तकात गुंगून गेले. खानदेशातल्या भालोद या छोट्याशा गावातला तुकाराम गणू चौधरी हा तरूण आपल्या दोघा मित्रांसह १९२२ ते १९२५ अशी तीन वर्षं कापडनिर्मिती तंत्रज्ञान शिकायला जर्मनीमध्ये राहिला. या काळाविषयीचे आत्मकथन या पुस्तकात आहे. पुस्तकातल्या काही जर्मन भागाच्या भाषांतरामध्ये सरांचा सहभाग होता. सरांकडून घेऊन ते पुस्तक वाचून काढलं. 

***

दोन महायुद्धांच्या मधला काळ हा जर्मनीमधला मोठा धामधुमीचा. पहिल्या महायुद्धात झालेला पराभव, त्यातली फसवलं गेल्याची भावना, तरुणांची एक अख्खी पिढी युद्धभूमीवर गमावल्यामुळे घराघराला बसलेले त्याचे चटके, बेकारी, दुर्भिक्ष्य, महागाई, कवडीमोल झालेलं आणि अजून गर्तेतच चाललेलं चलन, राजकीय परिस्थितीमध्ये होत असणारे बदल आणि अस्थिरता, त्यातून आलेली गुन्हेगारी असा सगळा हा काळ. या काळातल्या जर्मनीमध्येच हिटलरच्या उगमाची बीजं सापडतात. त्यामुळे जर्मनीकडे अशा परिस्थितीमध्ये कुणी संधी म्हणून बघत असेल असा मी विचारही केला नव्हता कधी.

जर्मनीमध्ये तेंव्हा प्रचंड चलन फुगवटा (hyperinflation) होता. म्हणजे एका ब्रिटिश पौंडाचे जर्मन मार्क हजारांमध्ये मिळत. (आज मिळालेल्या पैशांना उद्या काही किंमत राहीलच याची शाश्वती नसे!  ब्रिटिश पौंडाचा भाव २००० मार्क वरून काही महिन्यात २०००० मार्कपर्यंतसुद्धा घसरला या काळात.) त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये राहून शिकणे स्वस्त पडे. याच विचाराने हे खानदेशातले शेतकरी घरातले तिघे तरूण कुठलं आर्थिक पाठबळ नसताना, घरात विशेष शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना, कुठली ओळखदेख नसतांना हिकमतीने माहिती काढून, कसेबसे उधार – कर्जाऊ पैसे जमवून जर्मनीला जमवून शिक्षण घेण्याचं ठरवतात. त्यासाठी स्वतःच्या हिंमतीवर पैसा उभा करतात. तिथल्या कोर्सेसविषयी माहिती मिळवतात, जर्मन भाषेची तोंडओळख करून घेतात, आणि बोटीवर चढतात! त्यांच्या नजरेतून जर्मनीकडे बघणे खूपच रोचक आहे.

मुंबईहून निघाले, जर्मनीमध्ये पोहोचले, दुसर्‍यां दिवशीपासून शिकायला सुरुवात, कोर्स संपवल्यावर मायदेशी परत असा साधा सरळ प्रवास त्यांचा नाही. आर्थिक चणचण आहे, भाषेचं ज्ञान तसं तोकडं आहे. तिथल्या कुठल्या कोर्सला ऍडमिशन मिळालेली नाही. व्हिसा पॅरीसला पोहोचल्यावर काढायचा. तिथल्या रीतेरिवाजांची, पद्धतींची माहिती तितकीशी नाही. घरची पार्श्वभूमी बघता वातावरणातली तफावत तर खूपच आहे. (तिघातला एक मित्र तर शाकाहार न सोडण्यावर ठाम राहिल्यामुळे जर्मनीच्या थंडीमध्ये तग धरून राहू शकला नाही, तिथेच त्याचा मृत्यू झाला.:( ) जर्मन मार्क कोलमडल्यामुळे परकीय चलन घेऊन येणार्‍यांसाठी तिथे अभूतपूर्व स्वस्ताई होती. आणि जर्मन लोक उपाशी मरत असतांना, अन्नासाठी, उबेसाठी पैसे नाहीत म्हणून कुटुंबंच्या कुटुंबं आत्महत्या करत असतांना तिथल्या लोकांच्या डोळ्यावर येईल अशा चैनीवर पैसे उधळणारे परदेशी (भारतीय सुद्धा!) होतेच. त्यामुळे वातावरणात परक्यांविषयीची एक तेढ होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या तरुणाची वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याची, नव्याशी जुळवून घेण्याची, माणसं जोडण्याची कला आचंबित करणारी आहे. जर्मनीमध्ये तो ज्या ज्या ठिकाणी राहिला, त्या त्या गावात त्याला घरचा मानणारे आप्तस्वकीय तयार झाले. त्याला आपला मुलगा मानणार्‍या आया -  मावशा मिळाल्या. आईच्या मायेने त्यांनी त्याच्या आजारपणात सेवा केली. परदेशात हातात पैसा नसतांना, तिथल्या रहिवाशांचीच आर्थिक ओढगस्ती असतांना महिनेच्या महिने काढणं त्याला जमलं ते या जोडलेल्या माणसांमुळे.

भारतीय संस्कृती, लग्न झालेलं असताना एकट्याने शिक्षणासाठी परदेशात दीर्घ काळासाठी येणे किंवा या तिघा मित्रांमधलं प्रेम या सगळ्याविषयी त्यांच्या जर्मन स्नेह्यांना कुतुहल आहे. तिथल्या समाजजीवनाविषयी, चालीरीतींविषयीच्या यांच्या टिप्पण्याही वाचण्यासारख्या आहेत.

***

पुस्तक वाचतांना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे, युद्धानंतरच्या इतक्या अस्थिर, खालावलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर्मनीमध्ये शिक्षणाचा, कापड गिरणीतल्या कामाचा दर्जा टिकून होता. युद्धानंतर हालाखीची परिस्थिती आली, मग थर्ड राईश आलं, दुसरं महायुद्ध झालं, जर्मनीची परिस्थिती अजून हालाखीची झाली, आणि मग हळुहळू मार्शल प्लॅनच्या सहाय्याने हा देश पुन्हा उभा राहिला. आज युरोपच्या एकीकरणानंतरच्या काळात तर युरोपाच्या कुठल्याही भागातून आलेले लोक हक्काने जर्मनीमध्ये काम करू शकतात. पण तरीही जर्मन दर्जा आणि युरोपियन दर्जा यात तफावत जाणवतेच. हे रक्तातच असतं का एकेका देशाच्या?

***

जर्मन रहिवास
तुकाराम गणू चौधरी
लोकवाङ्मय गृह प्रकाशन

Tuesday, September 19, 2017

माऊचा आणि आजीचा बाप्पा

यंदा माऊला सोबत घेऊन बाप्पा बनवायचा विचार होता. माऊची चिकाटी आणि माझा पेशन्स दोन्ही वाढवण्याची फार गरज असल्यामुळे हा (अती) महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार अशी भीती मला वाटत होती. पण एका दिवशी दुपारी बाप्पाचं नाव घेतलं आणि सुरुवात केली. माऊ, सखी, तिची आई आणि मी चौघीजणी बाप्पा बनवायला बसलो.

अर्धा पाऊण तास, माफक आरडाओरडा करून असे दोन बाप्पा तयार झाले:



मग लक्षात आलं, आपल्या बाप्पाचे कान मिकी माऊससारखे दिसताहेत. मग बाप्पाला मुकुट घालण्याऐवजी आम्ही चक्क सांता क्लॉजची टोपी घातली :)


सखीचा बाप्पा मात्र शहाण्यासारखा, बाप्पाचे कान आणि नागाचा मुकुट घालून तयार झाला.

बाप्पा तयार होईपर्यंत माऊचा उत्साह संपला. त्यामुळे उंदीरमामा आईने बनवला.

शाडूची माती परत वापरायची म्हणजे त्यात शक्यतो काही भेसळ होऊ द्यायला नको. त्यामुळे बाप्पा रंगवायचा नव्हता. पण सखी आणि तिच्या आईच्या बाप्पासोबत माऊने तिचाही बाप्पा गेरूने रंगवून टाकला.

माऊचा बाप्पा बनेपर्यंत तिकडे आजीनेही एक मस्त बाप्पा बनवून ठेवला होता. या वर्षी पुन्हा एकदा मी बाप्पा बनवलाच नाही त्यामुळे.


असे दोन दोन बाप्पा मग मोदक खायला घरी आले. :)





बाप्पाची सजावट फुला – पानांनी केल्यामुळे पानं – फुलं सुकतील तसा त्यात बदल करता येतो. त्यामुळे आमचा बाप्पा रोज वेगळा दिसतो!




***
माऊसोबत बाप्पा केल्यावर लक्षात आलेल्या गोष्टी म्हणजे - छोट्यांसाठी बाप्पा बनवतांना माती थोडी सैल भिजवलेली असली तर बरी. घट्ट मातीचा लाडू वळायला त्यांना अवघड जातो. हात – सोंड – डोकं जोडायला टुथपिकचे तुकडे वापरले. नाही तर ते घट्ट जोडणं मुलांना अवघड जातं. (माऊच्या बाप्पाचं डोकं तर वाळल्यावर चक्क गोल गोल फिरत होतं. त्यामुळे आमचा बाप्पा आपोआपच मान हलवणारा झाला!) साधारण अर्धा अर्धा किलो मातीचा बाप्पा दोघींनी बनवला. या आकाराचे लाडू वळायला त्यांना बरे पडले. छोटासा लाडू बनवून टुथपिकने त्याला मोदकाचा आकार द्यायला छोट्यांना मज्जा येते.

***
माऊला बाप्पाला दोन पूर्ण दात लावायचे होते. “अग, पण बाप्पाला एकच दात असतो!” मी म्हटलं. मग माऊचा विचार बदलला.
“माझ्या बाप्पाला दातच नको!”
“का ग?”
“तो गर्ल आहे. गर्ल ला असे बाहेर आलेले दात नसतात!”
“अग, बाप्पा आहे ना तो! गर्ल कसा असेल?”
“का? माझा बाप्पा आहे ना!”
या वर्षी तरी बाप्पाला त्याचा एक दात मिळालाय. पण आई विचार करते आहे. माऊचा बाप्पा आहे, मग तिला पाहिजे, तर त्याने गर्ल असायला काय हरकत आहे?
 

Friday, September 8, 2017

टेकडी कुणाची?

 परवा आमची टेकडी अगदी फोटोसकट पेपरात झळकली. चुकीच्या कारणासाठी – तिथे फिरायला गेलेल्या एका बाईंचा मोबाईल आणि साखळी चोरट्यांनी हिसकावून घेतली म्हणून. त्या तिथे नियमित फिरायला जाणार्‍यातल्या होत्या. वेळही सोमवारी संध्याकाळी सहा ते सातच्या मधली, म्हणजे शनिवार – रविवार पेक्षा कमी, पण थोडीफार वर्दळीचीच. चोरांचा माग लागला, चोरलेला मालही पोलिसांना परत मिळाला.

चोरांपैकी एक मोठा, बाकी सगळे कायद्याच्या मते अज्ञान. हा मोठा चोर टेकडीजवळच्या झोपडपट्टीत राहणाराच.  योगायोगाने माझ्या कामाच्या बाईच्या ओळखीतला. (त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला माझ्या बाईला भेटलाही होता वस्तीत.) साधारण २३ वर्षं वय. आई धुणीभांडी करते, बाप रोजंदारीवर मिळेल ते काम करतो. हा घरातला मोठा मुलगा. अजून लहान बहीण आणि भाऊ आहेत, ते शिकताहेत. हा काहीही कामधाम करत नाही. यापूर्वीही त्याने असले उद्योग केलेत, हे माहित वस्तीत सगळ्यांना माहित आहे. चोर्‍यामार्‍या करायच्या, पोलीस आलेच तर वस्तीमागच्या टेकडीवरच्या रानातून पसार व्हायचं. टेकडीवर बसून दारू ढोसायची असले याचे उद्योग. याच्याकडे एखादा सुरासुद्धा असायचा कधीमधी. त्यामुळे कुणी त्याच्या वाटेला जायचं नाही. आपल्या पोरांना असली संगत नको म्हणून त्याला लोक फारसे आपल्या भागात येऊ द्यायचे नाहीत. माझ्या बाईंचा नवरा तर संध्याकाळी सहानंतर त्यांच्या मुलग्यांना सुद्धा घराबाहेर पडू देत नाही!
चोरीची तक्रार नोंदवल्याबरोबर लगेच पोलीस वस्तीत आले. पोलिसांना चुकवायला हा दुसरीकडे पळून गेला. तिथेही पोलीस मागावर आलेत म्हटल्यावर उंच इमारतीवरून ड्रेनेजच्या पाईपला धरून उतरण्याच्या प्रयत्नात हा खाली पडला. ससूनला ऍडमिट केलंय, पाठीला जबरदस्त मार लागलाय, बहुतेक दोन्ही पाय लुळे राहणार आता आयुष्यभर. पोलीस – न्यायालय काय शिक्षा देतील तेंव्हा देतील, पण पोराला वाटेल तसा बहकू दिल्याची शिक्षा आईबापांना भोगावी लागणार त्याला आयुष्यभर पोसून. 

बाकी सगळं जैसे थे होईल हळुहळू. म्हणजे याचे साथीदार - मित्र कदाचित थोडे दिवस जरा दबून राहतील पोलिसांना. वस्तीतल्या मुलींना जपणारे, त्यांची लवकरात लवकर लग्नं लावून "जबाबदारीतून मोकळे होणारे" आईबाप पुन्हा या पोरांच्या गुंडगिरीकडे काणाडोळा करणार. अर्धवट शिकलेल्या पोरांना बापासारखी मजूरी करायला लाज वाटणार, दुसरं मनासारखं काम क्वचितच सापडणार. नाहीतर ते पुन्हा इकडेच वळणार.
या झोपडपट्टीच्या जवळ मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. तिथे गाड्या धुणं, सिक्युरिटी अशी थोडीफार कामं या वस्तीतली मुलं करतात. बरीच मुलं रिक्षाही चालवतात. इव्हेंट मॅनेजमेंट, भंगारचा धंदा अशी कामंही करतात. पण आईबापाच्या पैशावर गुंडगिरी करणारी मुलंही इथे भरपूर आहेत. वस्तीवर लक्ष ठेवायला पोलिसांनी एक चौकीच केलीय आता जवळ. पण या मुलांशी बोलू शकेल, त्यांना कामाला लावू शकेल असं कुणी मला तरी माहित नाही.

उगाच सुखाचा जीव धोक्यात कशाला घालायचा म्हणून टेकडीवर जाणार्‍या सोसायटीवाल्यांची संख्या रोडावणार, सोसायटीतल्या सोसायटीमध्ये फिरणार्‍यांची वाढणार. यात सगळ्यांचाच तोटा आहे. कायदा पाळणारे जितके कमी लोक टेकडीवर येतील, तेवढी टेकडी जास्त धोक्याची होते. जास्तीत जास्त लोकांनी तिथे येत राहिलं पाहिजे. तिथे जाग रहायला हवी किमान सकाळ – संध्याकाळी तरी. फक्त फिरायला येणार्‍यांनी अवेळी, एकट्यानी गच्च झाडीमध्ये शिरणं, महागडे मोबाईल – दागिने मिरवणं यातून चोराला निमंत्रण दिल्यासारखं होतं याचं भान राखायला हवं. (सोमवारी चोरी झाली त्यांनी यापैकी काही करून मुद्दाम चोरी ओढवून घेतली असं म्हणायचं नाही मला, पण खबरदारी घेणं महत्त्वाचं.) वेगवेगळ्या वर्गातली माणसं जिथे एकत्र येतात अशा सुरक्षित सार्वजनिक जागा आपल्या शहरांमध्ये आधीच कमी आहेत. त्या जास्तीत जास्त राखायला हव्यात.  सोसायट्यांमध्ये क्लोज सर्किट टिव्ही बसवून आणि महागातल्या सिक्युरिटी एजन्सी नेमून शहर सुरक्षित बनत नाही, फक्त मोजके सुरक्षित घेटो तयार होतात. आणि शहाणे लोक या घेटोच्या आत जितके जास्त राहतील, तेवढं बाहेरचं शहर जास्त असुरक्षित होतं असं मला वाटतं.





Wednesday, August 23, 2017

कुसुमकली सा मेरा मानस

माऊला मी स्वतः दुकानात जाऊन आजवर एकही चॉकलेट विकत आणलेलं नाही. पण तिला चॉकलेट देणार्‍यांची अजिबात कमतरता नाही. पण ही सगळी चॉकलेटं आम्ही हातात आल्याआल्या फस्त करत नाही. दिवसाला जास्तीत जास्त एक, आणि काही नियमांची पूर्तता केल्यावरच, असे चॉकलेटचे उभयपक्षी मान्य असे कायदे आहेत. :) आजवर घरात माऊला द्यायला चॉकलेट नाही असं कधीच झालेलं नाही. चॉकलेट खायचं म्हणजे तिच्या सखीला दिल्याशिवाय माऊला ते गोड लागत नाही. अगदी बाहेर कुठे दुकानात सुट्टे नाहीत म्हणून दुकानदार काकानी गोळी दिली तरी माऊ “अजून एक दे – माझ्या मैत्रिणीसाठी!” म्हणून हक्काने दुसरी गोळी मिळवते.

असंच कुणीतरी दिलेलं एक किटकॅट. हे माऊने पहिल्यांदाच खाल्लं, आणि तिला ते फारच आवडलं. पण पंचाईत अशी झाली, की त्यात नेमके ३ तुकडे होते. एक माऊचा, एक सखीचा. तिसर्‍याचं काय? तिला म्हटलं, तू एकटी असशील तेंव्हा खा ते. पण नाही पटलं तितकंसं. (दोघी एकमेकींशिवाय असण्याची कल्पनाच मुळात आम्हाला आवडत नाही. अगदी गावाला जायचं म्हटलं तरी निघतांना जीव कासावीस होतो!) मग म्हटलं, आजच्या दिवस दोघी वेगवेगळं चॉकलेट खा. हे तर अजिबातच नाही पटलं. शेवटी त्या किटकॅटच्या तुकड्याचे दोन तुकडे, आणि अजून एक एक छोटं चॉकलेट अशी समसमान विभागणी झाली.

कितीही जवळची मैत्रीण असली, तरी तिच्यासाठी आवडत्या चॉकलेटच्या शेवटच्या तुकड्यातला निम्मा स्वतःहून शेअर करणं माऊच्या वयाची असताना मला नसतं जमलं बहुतेक! म्हणजे मी पण दिला असता तुकडा, पण नाईलाजाने, मैत्रिणीला वाईट वाटेल म्हणून / आईला आपण किती अप्पलपोटे आहोत असं वाटेल म्हणून. आणि मैत्रीण समोर नसतांना तर नाहीच. माऊ मैत्रिणीसमोर जेवढ्या हिरीरीने तिची बाजू घेते, तेवढीच ती नसतानाही. आणि आपल्याला जास्त खायला मिळण्यापेक्षा सगळ्यांना वाटून खाण्यात तिला जास्त आनंद वाटतोय. माझं तोंड चॉकलेट न खाताच गोड झालंय. देवा, माझं पिल्लू असंच वेडं राहू देत! आमेन!

Monday, August 7, 2017

सदिच्छा!

माऊला टेकडीवर जायला खूप आवडतं, पण सकाळी कधी मी तिला टेकडीवर नेत नाही. सुट्टीच्या दिवशी सकाळी टेकडी म्हणजे माझा एकटीचा वेळ असतो. आपल्या गतीने, इकडची तिकडची झाडं बघत टेकडी चढायची, वर फिरायचं आणि घरी परत यायचं म्हणजे माझ्यासाठी एकदम ध्यान केल्यासारखं असतं. सकाळी मोकळ्या हवेत पाय जितके चालतील तितका डोक्यातल्या कचर्‍याचा निचरा होतो! असं मस्त फिरून परत आल्यावर जे काही वाटतं, त्याला तोड नाही असं माझं मत आहे! अर्थात ही चैन रोज करायला मिळत नाही, फक्त सुट्टीच्या दिवशीच ही संधी मिळते. त्यामुळे हा वेळ कुणाबरोबरही शेयर करायला मी अर्थातच नाखूश असते. अगदी माऊसोबत सुद्धा. माऊला घेऊन मी संध्याकाळी परत एकदा टेकडीवर जाईन, पण सकाळी तिला बरोबर घेणार नाही!

तरीही कुणीतरी वाटेत भेटतं, चार शब्द बोलतं. तितपत तंद्री मोडणं मी चालवून घेते. मागच्या वेळी मात्र गंमत झाली. टेकडीवर नियमित येणारे अगदी रोज, सकाळ – संध्याकाळ येणारेसुद्धा लोक आहेत. त्यातले थोडेफार लोक (माझं आजूबाजूच्या लोकांकडे कधी लक्ष नसतं, तरीही) मला ओळखतात. त्यातले एक आजोबा. खरं तर तरूण आजोबा म्हणायला हवे असे. कारण निवृत्त झालेत, पण उत्साह तरुणासरखा आहे त्यांचा. भलतेच गप्पिष्ट. बरेच वेळा दिसतात, दिसले की दोन शब्द नक्कीच बोलतात. दोन चार वेळा अगदी मला थांबवून सुद्धा गप्पा मारल्यात त्यांनी. खूप कळकळीने बोलतात, त्यांच्या विषयात त्यांना बरंच काही माहित असतं, काही चांगलं व्हावं अशी मनापासून इच्छा असते. तर आज हे आजोबा अगदी चढायला सुरुवात करतानाच भेटले. चालतांना मी फारसं बोलत नाहीच, पण चढताना तर नाहीच नाही. तोंड किंवा पाय एकच काहीतरी चालू शकतं माझं एका वेळी. आजोबांचं स्वगत चालू होतं, मी आपली अगदीच शिष्टपणा वाटू नये इतक्या वेळा एकाक्षरी प्रतिसाद देत होते. टेकडी चढून झाली, पहिल्या बाप्पाचं देऊळ आलं. (टेकडी चढल्याचढल्या हा दिसतो, म्हणून पहिला बाप्पा. माऊने केलेलं बारसं.) अजून पुढे जाऊन खडीसाखरेचा बाप्पा आला (इथे संध्याकाळी प्रसादाला नेहेमी खडीसाखर असते!), पुढे बांबूच्या बेटापाशी पोहोचलो, तिथून तीन वेगवेगळ्या दिशांना रस्ते फुटतात. यांनी पण नेमका माझाच रस्ता निवडला! वाटेतलं मोहाचं झाड आलं आणि गेलं, शेवटी नंदीबैलाच्या बाप्पाला जाऊन पोहोचलो आम्ही. (या बाप्पाच्या समोरच्या जमिनीवर कोळ्यासारख्या दिसणार्‍या नंदीबैल किड्यांची भरपूर घरं असतात. मातीमध्ये छोटा खड्डा करून तिथे हा मातीखाली लपून बसतो. एखादी मुंगी आली, की तिच्या पायानी खड्याच्या कडेची माती आत पडते, आणि झटकन उडी मारून नंदीबैल सावज धरतो. इथे गेलं, की नंदीबैलाच्या खड्ड्यांमध्ये बारीक काडी घालून त्याला बाहेर काढायचं हा माऊचा आणि सखीचा लाडका खेळ आहे. ) तरी आजोबांचं स्वगत काही संपलं नाही!!! वाटेत नभाळी फुलली होती, फालसा(?)ला फळं धरायला लागली होती, रंगीत सुरवंट दिसले, हिरवं पोपटी गवत उन्हात चमकत होतं, अगदी जवळून मोराचे आवाज आले – मी एक दोन वेळा या सगळ्याकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा क्षीण प्रयत्न केला. (पण ते निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यामुळे इतक्या क्षुद्र distractions मुळे चित्त विचलित होऊ न देता ते तासभर बोलत राहू शकतात.) त्यांचं म्हणणं असं, की टेकडीवर आल्यावर दहा – पंधरा मिनिटं लोकांनी एका ठिकाणी गप्पा मारल्या तर किती मज्जा येईल! वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी एकत्र गप्पा मारून डोक्याला किती खुराक मिळेल! उदाहरणार्थ, “भोसडीच्या!” ही तुम्हा आम्हाला शिवी म्हणून माहित आहे. पण हा म्हणे संस्कृतमधल्या “भोs सदिच्छा!” या अभिवादनाचा अपभ्रंश आहे. हे त्यांना टेकडीवर येणार्‍या एका भाषातज्ञांकडून समजलंय. आजोबा आता टेकडीवर त्यांच्या मित्रांना भेटतांना नेहेमी “भोS सदिच्छा!” म्हणतात!

नंदीबैलाच्या बाप्पाच्या इथे आजोबांना अजून काही स्नेही भेटतात. ते गप्पा मारत थांबतात, मी आल्या वाटेने परत निघते. जातांना ज्या सगळ्यांना धड भेटता न आल्याची चुटपूट लागून राहिली होती, त्या सगळ्या सग्या सोयर्‍यांना मी परतीच्या वाटेवर निवांत भेटते. तरीही, आजचा चालण्यातला निम्मा वेळ आजोबांनी खाऊन टाकल्याचा सूड मग ब्लॉगवर त्यांचा किस्सा लिहून तरी निघणारच ना! ;)





Friday, August 4, 2017

माऊचा मित्र :)

काल अचानक माऊचा एक मित्र तिच्याशी खेळायला घरी आला होता. हा माऊचा अगदी लाडका मित्र आहे. तो छोटा असताना माऊने त्याला अगदी कौतुकाने मांडीवर वगैरे घेतलंय. आता तो मांडीवर घ्यायच्या आकाराचा राहिलेला नाही, माऊपेक्षा मोठ्ठा झालाय, पण म्हणून काय झालं, माऊ ताई आहे ना त्याची! कधीही सोसायटीत खाली खेळताना, टेकडीवर, पार्किंगमध्ये – कुठेही तो दिसला की माऊ त्याला भेटायला धावत सुटते. त्याच्या बरोबर त्याचा दादा असतोच. दादाशी गप्पा मारत मित्राशी खेळणं चालतं. हल्ली कधीकधी माऊला जाणवायला लागलंय आपला दोस्त मोठा झाल्याचं. त्यामुळे मग मधेच तिला भीती वाटते त्याच्याशी खेळायची. पण त्याला भेटायचं तर असतंच.

तर हा मित्र काल रात्री एकटाच घरी येऊन थडकला. सोबत दादा नव्हता. रात्री उशीरा माऊ अगदी झोपायला आली होती, तेंव्हा दार वाजलं. बाबाने बघितलं, तर दारात हा उभा! माऊने लग्गेच ओळखलं त्याला. याचं घर सोसायटीच्या अगदी दुसर्‍या टोकाला, नेमका फ्लॅट नंबर मलाही माहित नाही. याला माऊचं घर कसं सापडलं असेल? लिफ्टमधून एकटा आला, का एवढे जिने चढून आला? काही हा असेना, आता एवढा भेटायला आलाय म्हटल्यावर त्याला दारात कसा ताटकळत ठेवणार? दार उघडल्याबरोबर तो आपलंच घर असल्यासारखा आत शिरला. जरा भांबावला होता, पण त्याच्याशी बोलल्यावर एकदम निवांत झाला. घरभर फिरला. माऊ रंगीत खडू घेऊन काहीतरी चित्र काढत बसली होती, त्यातला एक लगेच मटकावला त्याने. मग बाकी घराचं इन्स्पेक्शन सुरू झालं. एकीकडे माझं चाललं होतं, “एका ठिकाणी बस. दादा कुठंय तुझा? तू एकटाच कसा आलास? तुमची चुकामूक झालीये का? पाणी वगैरे हवंय का तुला? बाहेर गॅलरीमधून आपण दादाला हाक मारू या का?” पण त्याला ऐकायला वेळ कुठंय! माऊचा बाबा त्याच्या दादाला शोधायला निघाला. वॉचमन काकांना पण त्याने फोन केला हा एकटाच इकडे आलाय म्हणून. इकडे याने मग माऊच्या खेळण्यांकडे मोर्चा वळवला. माऊच्या खेळण्यांमधला मोठ्ठा गुलाबी बॉल त्याला भलताच आवडला. पण तो खेळायला घेतल्याबरोबर त्याला दात लागून फुस्स करून एकदम हवाच गेली त्याची. मग दुसरा कडक बॉल घेऊन त्याच्याशी मस्त खेळत बसला तो. त्याच्या पाठोपाठ माऊ घरभर लाह्यांसारखी तडतड उडत होती. त्याचा दादा आला, त्याला हाक मारली,” बघीरा!” पण हे महाराज आपले बॉलशी खेळण्यातच मग्न. आपला दादा हरवला होता, आपण नवीन ठिकाणी आलोय, आपल्याला घराचा रस्ता माहित नाहीये, कशाची पर्वा नाही त्याला. मित्र मैत्रिणी भेटले, की आम्ही खूश! अल्सेशियन असला, तरी माऊच्याच जातीचा आहे म्हटलं तो!

******
नंतर त्याच्या दादाने सांगितलं - हे दोघं नेहेमीसारखे रात्री फिरायला बाहेर पडले. बघीरा नेहेमीसारखा धावत, पण आज दादाच्या पायाला लागलं होतं, त्यामुळे तो मागे पडला. तोवर हा एकटाच पुढे आला. बघिराला एवढे जिने चढायला आवडत नाहीत. म्हणजे बहुतेक समोर लिफ्ट उघडी असावी तिच्यामध्ये शिरला, आणि लिफ्ट बंद होऊन वर आली. एकटा लिफ्टमधून येतांना घाबरला असणार नक्कीच. पण नीट बाहेर पडला. आणि मग त्याने पायाने बरोबर माऊच्याच घराचा दरवाजा कसा वाजवला त्यालाच माहित!

Tuesday, July 11, 2017

घनघन माला नभी दाटल्या...

उन्हाळा संपला, शाळा सुरू झाली, पाऊस आला, पहिल्या पावसात भिजून झालं. मग मावशींच्या शेतात चिखलात खेळायला भात लावणीचं निमित्त काढून जायची वेळ झाली. :) या वेळी नेमकी लावणी कामाच्या दिवशी होती, शाळेला सुट्टी नव्हती. पण तरीही, शाळी सुटल्यावर जाऊ या असं ठरलं. त्या भटकंतीचे हे फोटो.

पुण्यात अधून मधून एखादी सर येत होती फक्त पावसाची. त्यामुळे तिकडे तरी पाऊस असेल का अशी जरा शंका वाटत होती. पण अर्ध्या वाटेतच मस्त धो धो पावसाने स्वागत केलं. मावशींचं गाव फार देखणं आहे.  पाऊस, हिरवे डोंगर, त्यातले धबधबे, भाताची खचरं, आणि पलिकडे दिसणारं धरणाचं पाणी!


शेतात आम्ही पोहोचल्याबरोबर स्वागताला काळू हजर झाला.


अशी लावणी चालली होती:)




शेतात जरा वेळ शांत उभं राहिलं, की खेकडे, मासे पायाला गुदगुल्या करत होते. मासे केवढे मोठे असावेत? बांधावरून पडणार्‍या पाण्यात मासे धरण्यासाठी जाळी लावली आहे, त्यात चांगले तळहातापेक्षा मोठे मासे अडकले होते! जाळीतले मासे काढल्यावर त्यातले बारके मासे परत पाण्यात टाकायचा कार्यक्रम झाला. थोडेफार काळूला खायला पण मिळाले. :)


एवढा वेळ चिखल – पाण्यात डुंबल्यावर सखी कुडकुडायला लागली. मावशींच्या डब्यात खेकड्याचं कालवण होतं, ते माऊ आणि सखी दोघींनी कुडूमकुडूम करत खाल्ल्यावर मग थंडी पार कुठल्या कुठे पळाली! दोघी इतक्या प्रेमाने खेकडा खात होत्या, की या पहिल्यांदा खाताहेत यावर कुणाचा विश्वास बसू नये!




यावेळेला आठवणीने भारंगीची पानं खुडून आणली. त्यामुळे भारंगीच्या भाजीचा डबल बोनस मिळाला पुण्याला आल्यावर! भारंगीचा फोटो मात्र काढायचा विसरले. हा भारंगीचा जुनाच फोटो- अजून फुलली नाही भारंगी. अजून पानं कोवळी, भाजी करण्याजोगी होती. नंतर जून झाल्यावर भाजी करता येत नाही.)


आंभोळीचं झाड बघितलं शेताजवळ.


आणि ही चिचर्डी:

करवंदाच्या काट्याला फाटे ;)

रानहळद / गौरीचे हात:

Tuesday, May 30, 2017

घाटघरचे फोटो



मागच्या पोस्टमध्ये म्हटलं तसं, ही पोस्ट घाटघरच्या कॅम्पिंग आणि भटकंतीमधल्या फोटोंची.

रतनगड

शेवाळ्याच्या बियांचे कोष

रानवांगी / काटेरिंगणी

उन्हाळ्यात सुद्धा सकाळी मस्त दंव पडलं होतं

कळसूबाईच्या वाटेवर

कळसूबाईला जातांना वाट चुकल्यावर हे झाड भेटलं. दुरून नुसतं पांढरं दिसत होतं ... पानांपेक्षा फुलं जास्त. फुलांना वास पण होता मस्त. अजून नाव सापडलं नाही याचं;




चांदा - याच्या पानांच्या द्रोणात करवंदं खाल्ली आम्ही






सुकलेल्या आळंबीची नक्षी

निर्वासित ... त्याच्या जागेवर आम्ही तंबू लावल्यामुळे आमच्या तंबूमध्ये बिचारा आऊटरला झोपला होता रात्रभर!
हा पण निर्वासित.