Sunday, June 16, 2019

साहेबाच्या देशात


माऊबरोबर युकेची भटकंती झाली तीन – चार आठवडे. 

इंग्लंड म्हटल्यावर माझ्या मनात एक संमिश्र भावना असते. एके काळी जगावर साम्राज्य गाजवणारा, दुसर्‍या महायुद्धाला दिशा देणारा, युद्धात बेचिराख होऊन परत उभा राहिलेला – पण जुना दिमाख घालवलेला हा देश. आता तर ब्रेक्झिटच्या विनोदानंतर जगभरात आपलं हसं करून घेत असलेला. यांचं आपल्यावर राज्य होतं म्हणून आपलं इतकं वाईट झालंय, यांचंच आपल्यावर राज्य होतं म्हणून आपली परिस्थिती इतकी चांगली आहे. आजच्या जगभरातल्या लोकांच्या जगण्यावर या एवढ्याशा देशाने केलेल्या / न केलेल्या गोष्टींचा केवढा परिणाम आहे! त्यात लंडन, मॅन्चेस्टरसारख्या शहरांविषयी इतक्या पुस्तकांमधून वाचलंय. पाटी अजिबातच कोरी नव्हती. आपण नवा देश बघायला जातोय ही उत्सुकता सोबत नसेल, तर नवं काही कसं सापडणार? हा देश आपण पहिल्यांदा बघणार आहोत याची मला स्वतःलाच आठवण करून द्यायला लागत होती. विशेषतः लंडनमध्ये फिरताना. तसं माऊबरोबर नेहेमीच्या टेकडीवर जाताना सुद्धा नवं काहीतरी सापडतंच. पण एवढी ट्रीप कारणी लागण्याइतकं काही हाती लागणार नाही (खरं तर मीच शोधू – बघू शकणार नाही) अशी भीती होती मनात. त्यामुळे ट्रीप झाल्यावर “छान झाली!” यापलिकडे सांगण्यासारखं काही असेल असं मला वाटत नव्हतं. (अर्थात माऊसोबत भटकंती म्हणजे त्यात काही खास “माऊ-क्षण’ असणारच, ते सोडता.)   पण अजून काही वेगळ्या खास गंमतीही सापडल्या. इथे त्यातल्याच काही सांगेन म्हणते.

सेंट पॉल्स कॅथेड्रल म्हणजे लंडनमधलं सगळ्यात मोठं चर्च. लंडनच्या हॉप ऑन – हॉप ऑफ टूरमध्ये हे चर्च बघायला आम्ही खास वेळ ठेवला होता. चर्चच्या वरच्या गॅलरीमधून शहराचं दृष्य सुंदर दिसतं. ते बघायचं होतंच, बघितलंही, आवडलंही. तिकडे जाताजाता एका पुतळ्याच्या हातातल्या पुस्तकावर “मनु” असं देवनागरीमध्ये लिहिलेलं वाचलं, आणि चमकले. ग्रीक शैलीसारखे कपडे गुंडाळलेला आणि मनुस्मृति(?) हातात घेऊन उभा असलेला हा बाबा कोण असावा बरं? म्हणून बारकाईने बघितलं. तो पुतळा होता सर विल्यम जोन्सचा. आणि तो इथे बसवला होता ईस्ट इंडिया कंपनीने! 






आधुनिक युरोपमध्ये भारतीय भाषांच्या अभ्यासाची आणि इंडोलॉजीच्या सुरुवात ज्यांच्यापासून झाली, त्यात सर विल्यम जोन्स हे एक महत्त्वाचं नाव. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापार करायला आलेली. इथे आल्यावर त्यांच्या हातात हळुहळू राज्यसत्ताही आली. सत्ता हातात आल्यावर व्यापार सोपा होतो, जास्त नफ्याचा होतो. कंपनीला लॉर्ड कॉर्नवॉलीस, वॉरन हेस्टिंग्ज अशा‍ अधिकार्यांच्या कामाचं कौतुक वाटलं तर आपण समजू शकतो. पण या वर्षी व्यापारात अधिक नफा मिळवणं, सत्ता ताब्यात घेऊन पुढची काही वर्षं अजून जास्त नफ्याची राहतील असं बघणं याच्याही पलिकडे जाऊन भारतातली आपली सत्ता पक्की व्हावी म्हणून भारताला समजून घेणं आणि भारतीय भाषा, संस्कृती यांचा अभ्यास करणं हे एका व्यापारी कंपनीला महत्त्वाचं वाटतं, विल्यम जोन्स कंपनीला महत्त्वाचा वाटतो ही केवढी विलक्षण गोष्ट आहे! अठराव्या शतकातली गोष्ट आहे ही. आजच्या क्वार्टरली टार्गेट्सच्या जगातल्या मल्टीनॅशनल्समध्ये ही दूरदृष्टी असेल?

सेंट पॉल्सच्या तळघरामध्ये नेल्सनची समाधी आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाच्या आवारात सुभेदार तानाजीराव मालुसरेंची समाधी किंवा स्मारक असू शकतं का आपल्याकडे? विचार करते आहे मी. हाम्बुर्गमध्ये, बर्लीनमध्ये मला पावलापावलावर हॉलोकास्टची स्मारकं बघून ठेच लागली होती. इथे तितक्याच प्रमाणात दुसर्‍या महायुद्धाची स्मारकं आहेत. त्यात लढलेले इंग्लंडचे सैनिक, स्कॉटलंडचे सैनिक, आशियायी सैनिक, आफ्रिकेचे सैनिक, प्राणी – सगळ्यांची वेगवेगळी स्मारकं, निगुतीने राखलेली. बर्‍याच ठिकाणी त्यावर पुष्पचक्रही. आपल्या वीरांना, हुतात्म्यांना आपण उगाच एवढा भाव देत नाही कधीच.

3 comments:

aativas said...

सर विल्यम जोन्स यांच्या हातात मनुस्मृती - हे जरासं अनपेक्षित होतं. आणखी काही असे शोध लागले तर नक्की सांगा.

Gouri said...

सविता, तिथे सर विल्यम जोन्सचा पुतळा ईस्ट इंडिया कंपनीने उभारणं याचंच मला इतकं आश्चर्य वाटलं, की हातातल्या मनुस्मृतीचा मी फारसा विचारच केला नव्हता. :) विल्यम जोन्स बंगालमध्ये न्यायाधिश होते. हिंदू कायदा समजण्यासाठी मनुस्मृतीचं पहिलं इंग्रजी भाषांतर मला वाटतं त्यांनी केलंय. (भारतातील मुस्लीम वारसा कायद्यासाठीही त्यांनी असाच अभ्यास केला होता.)

Gouri said...

Thanks for the comment, Entertaining Game Channel!