Monday, August 31, 2020

मॅकरोनी शेंगोळे

 नवरोबा घरी नाही म्हटल्यावर सव्वा - दीड माणसांचा स्वयंपाक करायचा जाम कंटाळा आलाय. काल सकाळी केलेल्यावरच दिवस भागवला. आज काहीतरी करणं भाग आहे पण वरण – भात – पोळी भाजीचा विचार पण करवत नाहीये. ज्वारीचं पीठ शिळं होतंय, त्याच्या नुडल्स कराव्या का? पण त्या वाफवून एवढ्या इडलीच्या ताटल्या कोण घासत बसणार? त्यापेक्षा पास्ता सारखं डायरेक्ट उकळत्या पाण्यातच शिजवलं तर? आज फार डेंजर प्रयोग होण्याची दाट शक्यता आहे. हे बिघडलं तर माऊला दोन पोळ्या करून भेंडीच्या शिळ्या भाजीसोबत देईन, पण तरीही करून बघणारच म्हणून मी इरेला पेटले आहे. 

कांदा, टोमॅटो, मटारचे थोडे दाणे, एक कणीस, लसूण, पिझ्झाबरोबर आलेलं एक एक ओरेगानो आणि चिली फ्लेक्सचं पाकीट, थोडं अमूल बटर एवढं साहित्य आहे असं पाहिलं, आणि पाणी उकळायला ठेवलं. त्यात नूडल्स घालायला ’अंजली’चा सोर्‍या काढला. कुठली चकती लावावी याचा विचार करतांना ही सापडली. 



सोर्‍याच्या बॉक्सवर हिचा उल्लेखच नाहीये. याचा आयुष्यात कधी काही उपयोग करत असेल का कुणी? एकदा जुगार खेळायला लागलं की नशा चढत जाते म्हणतात. तसं एकदा अतरंगी प्रयोग करायचं ठरवलं, की त्यात अजून काय काय सुचायला लागतं. तर ही चकती वापरून बघायचीच ठरवली. मॅकरोनीपेक्षा जाड होईल, पण काय व्हायचं ते होऊ देत म्हणून हट्टाने हीच चकती लावली.

उकळत्या पाण्यात मग हे "एल्बो मॅकरोनी शेंगोळे" सोडले. एक एक सोडेपर्यंत बराच वेळ वेळ गेला. त्यामुळे पास्ता शिजेतोवर दुसर्‍या गॅसवर सॉस करायचा बेत असफल झाला. रेड सॉस सदृश काहीतरी तयार केलं, तोवर इकडे पास्त्ता जरा जास्तच शिजला होता. भाकरी केल्यावर उरलेलं पीठसुद्धा टाकून द्यायला मला जिवावर येतं. या पास्त्याचं पाणी इतकं दाट होतं, की ते ओतून देण्याचा मी विचारही करू शकले नाही. पास्ता चाळणीवर काढला, खालचं पाणी पास्ता सॉसमध्ये घालून हे पास्ता सूप आहे असं जाहीर केलं. हे सूप उकळेपर्यंत पास्ता गार पाण्याने धुवून घेऊन त्यावर तेल घातलं. थोडं बटर घालून पास्ता शिजवलेल्या भांड्यातच(हे महत्त्वाचं.) परत गॅसवर चढवला, त्यात सूप ओतून दोन मिनिटं रटरटू दिलं. मीठ – साखर ॲडजेस्ट केली. मॅकरोनी शेंगोळे तयार झाले. 


माऊला, तिच्या सखीला, सखीच्या आईलापण हा पदार्थ आवडल्यामुळे याला जीवघेण्या प्रयोगाऐवजी मॅकरोनी शेंगोळे फ्यूजन रेसिपीचा दर्जा देण्यात आलेला आहे. घरचा पास्ता, वरणाफळं न आवडणारा सदस्य नसला की एखाद्या पावसाळी दिवशी वन डिश मील म्हणून हे पुन्हा करणार. 

2 comments:

dadayendhe said...

Sueprb Article.
https://mazisamruddhi.blogspot.com

PATIL said...

खुप छान माहिती आहे. आमच्या ब्लॉग ला पन नक्की भेट द्या.

JIo Marathi