Friday, January 29, 2021

यादवी

विखाराची पेरणी, विखाराची मशागत.
विखाराच्या शेतीमधलं विखाराचं भरघोस पीक.
विखाराची दलाली, विखाराचा व्यापार.
 
कटू विखारी बीजापोटी फळे राक्षसी करंटी
हे निसर्गाला समजतं.
आदिमानवाला समजलं.
 
सुखवस्तु सभ्यतेचा बुरखा लेऊन
सगळंच बेचिराख करायला निघालेल्या
त्याच्या वंशजाला समजेल का?
 
का पेटवून देईल तो
सहिष्णुतेचा थेंबही शिल्लक न ठेवता
उरल्या सुरल्या माणुसकीचा वणवा?

Friday, January 15, 2021

सुखी जीव

     आज माऊला घेऊन आजीकडे जायचं होतं. जाण्यापूर्वी सोसायटीमधूनच एकीकडून काहीतरी घेऊन यायचं होतं. उशीर झालेला होता, माऊ सोबत यायचं म्हणेल आणि अजून वेळ लागेल म्हणून माऊची आंघोळ होईपर्यंत मी तिकडे पटकन जाऊन येईन असा विचार केला, आणि तिला न सांगताच सटकले. नेमका तिथे पाच-दहा मिनिटं वेळ लागला. तेवढ्यात मला शेजारच्या मैत्रिणीचा फोन – “अग, कुठे आहेस? आई हरवली म्हणून माऊ सगळीकडे शोधतेय!” 

    “आलेच!” म्हणून मी लगेच निघाले. घरी पोहोचले, तर दारात आजीचा फोन – “अग, कुठे आहेस? आई हरवली - तिचे कपडे काढलेले घरात तसेच पडलेत, घरातली चप्पल पण तशीच आहे, आई कुठेच सापडत नाही. असा माऊचा फोन आला मला!” आजीला शांत करून घरात पाऊल ठेवलं, तर माऊ गरजलीच – “कुठे होतीस? न सांगता जातात का असं? बोलू नकोस माझ्याशी जा!”     

    तर झालं असं होतं, की माऊ आंघोळ करून बाहेर आली, तर तिला आई कुठे दिसेना. कुठे लपली आहे का गंमत करायला म्हणून शोधलं तिने, पण काही उपयोग झाला नाही. मग तिने बाबूला विचारायचा प्रयत्न केला, तर त्याने (नेहेमीप्रमाणे) कॉलमध्ये असल्याने काही लक्ष दिलं नाही. माऊने लॅंडलाईनवरून माझा फोन लावला, तर फोन लागला नाही. आता मात्र तिचा धीर सुटला, आणि तिने इंटरकॉमवरून सुचेल त्या सगळ्या शेजार्‍या-पाजार्‍यांना फोन करून “आई हरवल्याची” बातमी सांगितली, आजीलाही फोन करून ही खबर दिली. प्रत्येक फोनगणिक बातमीतला मसाला वाढत गेला हे सांगणे न लगे. सगळ्यांचे काळजीने मला फोन यायला लागले.

    एवढं सगळं रामायण घडलं, तरी कंपनीला वाहून घेतलेल्या आतल्या खोलीतल्या जिवाला काहीही पत्ता नव्हता.

    लॉकडाऊन आणि लॉकडाऊनोत्तर काळात घरात काय काय चाललंय, त्यावर जर एखादं नाटक लिहिलं, तर त्यात असं एक पात्र ठेवावं लागेल, जे फक्त थोड्या थोड्या वेळाने आतल्या खोलीतून बाहेर डोकावून “अरे काय आरडाओरडा लावलाय ... गप्प बसा जरा, माझा कॉल आहे!” म्हणून ओरडतं. नाटकाच्या बाकी प्लॉटशी या पात्राला काहीही देणंघेणं नसतं.

    आज या सुखी जीवाचा फारच हेवा वाटल्याने जिथे तो फिरकण्याची तिळमात्र शक्यता नाही, तिथे किस्सा सांगून सूड घेण्यात आलेला आहे.