बापट सरांनी वर्गात एक गोष्ट सांगितलेली आठवतेय आज. गरवारे कंपनीमध्ये कॉस्ट कटिंगचा विचार चालू असतो, तेव्हा दोराच्या तंतूची गेज कमी करण्याची एक सूचना येते. या दोराच्या पक्केपणावर विसंबून असणारे अनेक लोक आहेत; हा त्यांचा विश्वासघात होईल याची बाकी बोर्ड मेंबरना जाणीव करून देत एक मेंबर त्याला विरोध करतो. त्या माणसाच्या नियतीमुळे कित्येक सैनिकांचे, अवघड जागी उतरून कामं करणार्यांचे प्राण वाचले असतील. जोवर अशी माणसं मोक्याच्या पदांवर आहेत, तोवर त्या समाजाच्या वस्त्राचा पोत भक्कम राहतो.
पाचशेच्या वर घरं आहेत आमच्या सोसायटीमध्ये. एवढा सगळा ओला कचरा कुजवून त्याचं कम्पोस्ट बनवणारा प्लांट आहे. घराघरातला कचरा उचलून तो या प्लांटला नेणं, त्याचं खत बनवणं हे काम बिनबोभाट वर्षानुवर्षं चालू आहे. हे काम करणारे काम नीट करत नाहीत, वाटेल त्या वेळेला कचरा उचलतात, उचलताना सांडतात, खत करण्याऐवजी बराचसा कचरा मनपाच्या गाडीत चढवतात, ओला सुका एकत्र गोळा करतात, खतात प्लॅस्टिकचे तुकडे, तेल असं काहीही निघतं – एक ना दोन हजारो तक्रारी असतात सोसायटीच्या यांच्याविषयी.
गळकं छप्पर, ओल असणारी जमीन, धड हवा यायला जागा नाही का प्रकाश नाही अशा त्या जागेत कम्पोस्टच्या प्लांटच्या आत पाच मिनिटं उभं राहणं सुद्धा सोसायटीच्या कोणा रहिवाश्याला झेपणार नाही. करोनाच्या काळातसुद्धा एक दिवसही खाडा न करता आठवड्याचे सात दिवस हे काम चालू असतं. यातल्या एका मावशीला करोना झाला. दोन आठवडे ती काम करू शकणार नाही. दोन आठवडे प्लांट बंद. कचरा बाहेर कुणाला द्यायचा म्हटला, तरी तो नीट वेगळा केलेला लागतो. सुक्या कचर्यातच सॅनिटरी कचरा, ओल्या कचर्यात दुधाच्या पिशव्या असा सगळा प्रकार चालत नाही. शहाण्या शिकलेल्या मोठ्या सोसायटीतल्या लोकांना आपला कचरा कसा टाकावा हे माहित नसतं, ते वेगळं करणं या मावशीखेरीज कुणाला येत नाही. ती कामावर नसली तर कम्पोस्टिंगचा क्रशर चालणार नाही. ती नसली तर कचरा वेगळा होणार नाही, मनपाची गाडी सुका कचरासुद्धा उचलणार नाही. म्हणजे गेली कित्येक वर्षं एकही खाडा न करता एकही सुट्टी न घेता ती काम करते आहे. अशी कुणी मावशी आपण केलेला कचरा निस्तरत असते याचा सोसायटीत राहणार्यांना इतकी वर्षं पत्ताही नाही.
5 comments:
Nice post.
So true, most of us are not even aware of these people.
Nice post. So true.
अस्मिता, हो ना ... आपलं जगणं सुकर करणारे असे किती लोक असतात आणि आपल्याला त्यांची कल्पनाही नसते!
Beautiful people!
I had bookmarked your blog many months ago. Finally took some time to read through.
Very refreshing!
देवेंद्र, ब्लॉगवर स्वागत! प्रतिक्रिया बघून छान वाटलं!
Post a Comment