Thursday, July 30, 2015

Need to belong


भटकंती कितीही आवडली, तरी आपलं गाव, आपली जागा म्हणण्यासारखं, जिथे मला कुणी उपरं म्हणू शकणार नाही असं जगाच्या एका कोपर्‍यात काहीतरी असावं ही माझी एक प्राथमिक गरज आहे. माझ्या मागच्या कित्येक पिढ्या चाकरीसाठी भटकत राहिल्यात. नवर्‍याचीही तीच गत. त्यामुळे मला “आमचं गाव, आमचं शेत, आमचं घर” याविषयी सांगणार्‍या लोकांचा जरा हेवाच वाटायचा. आपण राहतो तेच आपलं गाव. मूळ गावावर जे काय प्रेम करायचं असेल ते त्यावरच करा हे आता कुठे कळायला लागलंय. (वळत नाहीच अजूनही!) पण तरीही रोज बदलणार्‍या, नवे रुपडे घेऊन येणार्‍या महानगराला आपलं म्हणणं थोडं जडच जातं. कितीही ओळखीचं झालं तरी ते बिनचेहर्‍याचं राहतंच. त्यामुळे जिथे सगळं गाव एकमेकाला ओळखतं, आपल्या पानातलं अन्न आपल्या शेतातूनच आलेलं असतं त्या “हरवलेल्या नंदनवना”ची स्वप्नं मला अजूनही पडतात. पावसानंतरच्या दिवसात बाहेरून बघताना ही गावं कितीही रमणीय दिसली तरी पोट भरायची मारामार झाल्यावर इथल्या रहिवाश्यांना यापेक्षा शहरातली झोपडपट्टी बरी म्हणावं लागतं हे माहित असूनही हे वेडं स्वप्न काही विरत नाही. या वेडेपणाची लागण माऊलाही व्हावी अशी इच्छा आहे. मातीची ओळख होणं हा त्यातलाच एक भाग. त्यामुळे ती जेमतेम चालायला लागली तेंव्हापासूनच तिला शेतात कधी घेऊन जाता येईल याचे मनसुबे मी रचते आहे. 

या वर्षी अशी संधी मिळाल्यावर मी तिच्यावर (संधीवर बरं, माऊवर नाही !) झडप न घातली तरच नवल! माऊच्या मैत्रिणीच्या आईने कामाला येणार्‍या मावशी सुट्टी घेऊन भातलावणीला शेतात जाणार म्हटल्यावर त्यांच्या शेतावर जायचं आमंत्रण लावून घेतलं. तिथे जायला माऊ आणि मी अर्थातच एका पायावर तयार!

मधेच येणारी पावसाची सर, जरा दूरवर एकीकडे डोंगर आणि त्यातले धबधबे, वार्‍यावर डोलणारी पायर्‍या पायर्‍यांची भाताची खाचरं, शेजारून वाहणारा ओढा आणि पलिकडे धरणाचं पाणी! दोन्ही पिल्लांनी (आणि आयांनी) भातखाचरातल्या चिखलात, शेजारच्या ओढ्यात आणि सगळ्या प्रवासातच किती धमाल केली हे सांगायलाच नको! हे या छोट्याश्या भटकंतीचे काही फोटो:

आपण पाण्यात डुबुक डुबुक करू या?
भाताची रोपं उपटून झाली, बांधलेले गठ्ठे चिखलातून पळत इकडून तिकडे टाकून झाले. खेकडे बघून झाले.


शेताशेजारचा ओढा

 चहाच्या ओढ्यात खेळावंच लागलं मग!

धरणाच्या पाण्याकडे
 धरणाचं पाणी बघायला जातांना कावळ्याच्या छत्र्या दिसल्या, मासे धरणारा काका दिसला. त्याच्या पिशवीचं इन्स्पेक्शन झालं.


धरणाच्या पाण्यात गाळ आहे, मावशी जाऊ देत नाहीये!

पाणी!
 इथे एक तंबू हवा होता!

 वार्‍यावर डुलणारी भाताची रोपं, आणि झाडाला लागलेल्या कोवळ्या चिंचा!

पेरणीपूर्वी आजोबांनी नांगर धरलाय.
 भात लावणीसाठी शहराकडे पोटापाण्यासाठी गेलेल्या मुलंसुना येतात ... पण नांगर धरणं अजूनही अजोबांचंच काम! दुसर्‍या कुणालाच ते जमत नाही / शक्य नाही. आजोबांचे हातपाय चालेनासे झाल्यावर काय? घरोघरी हेच चित्र दिसतंय!

Tuesday, June 30, 2015

बुंदेले हरबोलों के मुह हमने सुनी कहानी थी ...



शाळेत सहावी – सातवीला कधीतरी ही कविता होती.

मी तेंव्हा बहुतेक दिवसभर माझ्या घट्ट मैत्रिणीच्या घरीच पडीक असायचे. फक्त जेवायला खायला आणि झोपायला घरी! मैत्रिणीची आई मला तिची चौथी मुलगीच म्हणायची! तिची आई यूपीमधल्या छोट्याश्या गावातली. लहानपणीच लग्न झालेलं. प्रेमळ पण अतिशय परंपराप्रिय सासू, मेहनती, समजदार पण आईच्या कधीही शब्दाबाहेर न जाणारा नवरा – त्याचे वडील अकाली गेल्याने सगळ्या धाकट्या भावंडांची जबाबदारी स्वीकारून स्वतः नोकरी करत त्यांना शिकवणारा. दादा आणि वहिनीला आईवडलांसारखं मानणारे धाकटे दीर. अश्या घरातल्या त्या “आई”ला मी कधी तिच्या नात्यांच्या पलिकडे बघितलेलंच नव्हतं. लग्नाला पंचवीस – तीस वर्षं होऊनही सासूच्या धाकात राहणारी, घरातल्या कामाचा आणि रूढीपरंपरांचा बोजा न पेलवून नेहेमी आजारी आजारी राहणारी ही माझी “दुसरी आई” फार प्रेमळ होती.

एकदा नेहेमीप्रमाणे मैत्रिणीच्या घरी आमचा एकत्र ’अभ्यास’ चालला होता. दोघी मिळून ही कविता म्हणत होतो. मैत्रिणीची आई आमच्या कविता म्हणण्यात सामिल झाली! मराठी - इंग्रजी कविता, सुभाषितं माझ्या आईकडून मी भरपूर ऐकली होती, तिच्या शाळेतल्या, कॉलेजातल्या गमतीजमती ऐकल्या होत्या, तिच्या मैत्रिणींविषयी ऐकलं होतं. शाळेत काय चालतं हे तिला ऐकवलंही होतं. आपली आई ही आई असण्याव्यतिरिक्त घराबाहेर आणि घरातही बरीच काही आहे हे समजत होतं.  मैत्रिणीच्या आईला मात्र मी कधी हातात पुस्तक धरलेलं बघितलं नव्हतं. तिच्या घर-संसारापलिकडे तिला कधी काही अस्तित्व होतं, तीही कधीतरी अल्लड मुलगी होती, शाळेत जात होती, तिथे तिच्या मैत्रिणी असतील, आवडते – नावडते विषय असतील, आवडीच्या, तिला पाठ असलेल्या कविता असतील असं कधी मनातही आलं नव्हतं आमच्या! इतक्या दिवसांच्या सहवासात फक्त त्या एका कवितेपुरती दिसली ती मला. त्या कवितेविषयी, तिच्या शाळेविषयी कधी विचारायचं राहूनच गेलं तिला!

Tuesday, April 28, 2015

आईची शाळा



माऊच्या मैत्रिणीला ऍडमिशन द्यायला शाळा उत्सुक नाही. 
 कारण तिची आई नोकरी करते. 
आई नोकरी करते आणि घरात आजी – आजोबा नाहीत, म्हणजे मुलांकडे लक्ष कोण देणार? त्यांचा अभ्यास कोण करून घेणार? आईला मुलांकडे बघायला वेळ नसणारच!
नोकरीवरून आल्यावरचा सगळा वेळ आई फक्त मुलीसाठी देत असेल तरी ती नोकरी करणारी आई. तिला पूर्ण वेळ घरी असणार्‍या आईची सर कशी येणार?
नोकरीवर जातांना मुलीकडे बघायला तिने काही व्यवस्था केली असेल कदाचित, पण तरी ती नोकरी करणारी आईच! 
तिची मुलगी घरी राहणार्‍या आयांच्या मुलींपेक्षा कुठल्याच बाबतीत कमी पडत नसेल, पण तरी ती नोकरी करणारी आईच!
 करियर करण्यात रस असणं (पैसे कमावण्यासाठी नाईलाजाने नोकरी करणारी असेल तर गोष्ट वेगळी ... पण करियरची महत्त्वाकांक्षा का बाळगावी तिने!) हा आईचा गुन्हा असावा असं ठरवणारे लोक कमी नाहीत. त्यात “पुढची पिढी घडवणार्‍या” सो कॉल्ड चांगल्या शाळेचाही समावेश असावा!

याच न्यायाने शाळेने पहिला प्रेफरन्स आई-बाबा दोघंही कामधंदा काही करत नसतील तर त्यांच्या मुलांना द्यायला हवा. पालकांना मुलांकडे लक्ष देण्याची दुप्पट संधी!

सद्ध्या मी नोकरी करत नाहीये त्यामुळे शाळेसाठी ऑफिशिअली “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई आहे. मी काम शोधते आहे, त्यानंतर “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई राहणार नाही याची सुदैवाने शाळेला कल्पना नाही. मला नोकरीत ब्रेक हवा होता, तो मी घेतला. पुन्हा काम कसं मिळेल, पैसे कसे कमवायचे, डोक्याला खुराक कसा मिळणार अश्या प्रश्नांना खुंटीवर टांगून माऊला वेळ देणं हा माझा त्या वेळचा व्यक्तिगत चॉईस होता,  आणि माझ्या निवडीवर मी खूश होते. पण आपल्या कृतीचे काय काय अर्थ लोक काढू शकतात हे बघून मी थक्क झालेय! “बरं झालंस नोकरी सोडलीस ... पोरांना पाळाणाघरात सोडून कसलं करियर करतात आजकालच्या आया!” असं म्हणून माझं “उदाहरण” दिलेलं पाहिल्यावर, उद्या मी काम सुरू केल्यावर यांच्या प्रतिक्रिया काय असतील म्हणून गंमत वाटतेय. आणि काही विशेष प्रयत्न न करता योगायोगाने माऊच्या शाळेला आपण कसं उल्लू बनवणार याचीही! :)