Saturday, November 8, 2008

परिकथेतला किल्ला बांधणारा वेडा राजा















एक होता राजा. त्याला पुस्तकांच्या राज्यात हरवून जायला आवडायचं. हुजऱ्यांच्या गर्दीमध्ये राहण्यापेक्षा एकान्त आवडायचा. निसर्ग आवडायचा. संगीत वेडावून टाकायचं. सुंदर सुंदर वास्तू बांधण्याची स्वप्नं पडायची. दरबाराची कटकारस्थानं विसरून तो काव्यानंदात बुडून जायचा.

असा राजा काय कामाचा? राजाने राज्य केलं पाहिजे. राज्य वाढवलं पाहिजे. शत्रूंबरोबर लढाया केल्या पाहिजेत. दरबारातल्या कारस्थानी लोकांवर नजर ठेवायला पाहिजे. जमलंच, तर प्रजेच्या भल्यासाठीसुद्धा काहीतरी करायला पाहिजे. एवढा कवीमनाचा, संवेदनाक्षम आणि अंतर्मुख माणूस काय राज्य करणार? मध्ययुगातल्या राजेपणाच्या सगळ्याच निकषांवर पार कुचकामी ठरणारा राजा निपजला हा. त्याला सत्तेपासून दूर करण्याचा सोपा मार्ग शोधला दरबारी मंडळींनी. राजा वेडा आहे म्हणून जाहीर केलं. दूर एकाकी अशा एका वाड्यामध्ये त्याची पाठवणी केली. आणि अगदी मोजक्या दिवसात, या वेड्या राजाने जवळच्या नदीमध्ये ’आत्महत्या केली’. राजाला वेडा घोषित करणाऱ्या मानसोपचारतज्ञाचं पण प्रेत त्याच नदीमध्ये ’योगायोगाने’ सापडलं.

पण त्या राजाने त्याच्या सुंदर वास्तू उभारण्याच्या वेडामुळे काहीतरी जगावेगळं निर्माण करून ठेवलं होतं. आजसुद्धा हे अर्धं पुरं झालेलं स्वप्न बघितलं, म्हणजे वाटतं, बाबा रे, तू राजा का झालास? तुला राज्यकारभारात काडीचाही रस नव्हता. आपल्या प्रजेकडे दुर्लक्षच केलं असणार तू. त्याऐवजी तुला जर एक कलाकार म्हणून जगायची संधी मिळाली असती तर? जितक्या औदार्याने तू तुला सापडलेल्या कलाकारांना राजाश्रय दिलास, तसा तुला कोणी राजाश्रय दिला असता तर?

लुडविग दुसरा हा बव्हेरियाचा राजा. बव्हेरिया म्हणजे तेंव्हाच्या युरोपातलं एक प्रबळ राज्य. लुडविग हा रिचर्ड वागनर या संगीतकाराचा चाहता. नुसता चाहताच नाही, तर त्याच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये त्याने वागनरला कधी पैशाची कमतरता पडू दिली नाही. वागनरच्या संगीताच्या सन्मानार्थ राजाने एक सुंदर किल्ला बांधला. या पूर्ण किल्ल्यामध्ये त्या राजाची राजचिन्हं, प्रतिकं कुठेच दिसत नाहीत. हा किल्ला लुडविगने बांधला याचा साधा उल्लेख सुद्धा कुठे नाही. किल्ल्यातली सगळी महत्त्वाची दालनं वागनरच्या प्रसिद्ध रचनांवर आधारित सजावटीने मढलेली आहेत. तिथे वागनरचं संगीत कायम ऐकायला मिळावं अशी लुडविगची इच्छा होती. किल्ल्याची बांधणी खरोखर परिकथेत शोभावी अशी. वॉल्ट डिस्नेने त्याचा परिकथेतला किल्ला या किल्ल्यापसून स्फूर्ती घेऊन बनवला! एवढ्या मोठ्या मनाचा (किंवा अव्यवहारी) राजा जगात दुसरा कोणी नसेल. तर अशा या ’अनफिट’ राजाचं हे संगीतमय स्वप्न म्हणजे नॉयश्वानश्टाईन (Neuschwanstein) चा किल्ला. म्युनिकपासून एका दिवसात बघून येण्यासारखी एक अनोखी जागा. चारही बाजूंनी जंगलाने, डोंगरांनी वेढलेला. बघितल्यावर फक्त एकच मनात आलं, अप्रतिम. बाकी राजा म्हणून, एक माणूस म्हणून लुडविग वेडा, शहाणा कसा का असेना, या एका किल्ल्यासाठीसुद्धा त्याला मानलं पाहिजे. (लुडविगने एकूण सहा किल्ले बांधले बव्हेरियामध्ये. आमच्या ’दहा मार्कांचा ज्ञानेश्वर’ श्टाईल प्रवासामुळे यंदा त्याचा एवढा एकच किल्ला बघितला आम्ही.)

किल्ला कसा दिसतो, ते मी सांगण्यापेक्षा फोटोमधूनच जास्त चांगलं समजेल. वर टाकलाय तो मोठा फोटो मुख्य प्रवेशद्वारामधून काढलेला. प्रवेशद्वाराच्या कमानीमुळे या फोटोला एक वेगळा गेट़अप येतोय असं मला वाटलं, म्हणून काढलेला. नाहीतर नॉयश्वानश्टाईनचे प्रसिद्ध फोटो वेगळ्या ऍंगलमधले असतात. (दोन नंबरचा फोटो आहे तसा.) अजून फोटो पिकासावर नक्की टाकते - सद्ध्या माझा लॅपटॉप मेलाय ... इथे तात्पुरता वापरण्यासाठी दिलाय ऑफिसने. त्याच्यावर पिकासा install नाही करत बसत आता - आठवडाभरात परत सगळं uninstall करून, मिळाला तसा परत करायचा आहे लॅपटॉप. त्यामुळे बाकी फोटो नंतर.)





4 comments:

रोहन... said...

फोटोस मस्त आहेत ... आपल्या इथला किमान १ किल्ला अश्या पद्धतीने जसाच्या तशा नीट ठेवला तर शप्पथ ... :(

Gouri said...

रोहन, आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या मानाने उत्तरेतले - राजस्थनातले किल्ले बरेच सुस्थितीमध्ये आहेत ... पण एवढी सुंदर व्यवस्था कधी होईल माहित नाही. या किल्ल्याच्या नुसत्या भिंती नीट मेन्टेन नाही केलेल्या - इथे उत्तम गाईडेड टूर्स आहेत. छोटी डॉक्युमेंट्री आहे. किल्ल्याच्या आतले फोटो काढायला परवानगी नाही, पण खिडक्यांमधून अतिशय सुंदर देखावा दिसतो त्याचे फोटो काढायला कॅमेरा आत नेऊ देतात. पर्यटकही या परवानगीचा गैरफायदा घेत नाहीत. आपल्या रायगडावर असं दृष्य कधी दिसेल?

रोहन... said...

खरय ... सह्याद्री मधला किमान एक किल्ला (रायगड़ / राजगड़) १७ व्या शतकात जसा होता तसा बनवायचा... रोल मॉडल म्हणून.. हे माझे स्वप्न आहे.

Gouri said...

रोहन,तुझं स्वप्न साकार झालेलं बघायला खूप आवडेल ... त्यासाठी शुभेच्छा ... आणि काही मदत करता येण्यासारखी असेल, तर ती ही करायला आवडेल.