Monday, May 11, 2009

पांढऱ्यावरचे काळे: १

प्राथमिक शाळेत असताना आमच्या वर्गात एक मुलगी होती - दीपाली बळेल नावाची. दुसरीमध्ये असताना मोत्यासारखं अक्षर होतं तिचं! इतकं सुंदर अक्षर की आमच्या बोंडे सरांनी मोठ्या शाळेच्या - म्हणजे चौथीपेक्षा सुद्धा मोठ्ठ्या मुलांना तिची वही दाखवून विचारलं होतं ... बघा तुम्ही तरी इतकं सुवाच्य लिहिता का म्हणून! चांगलं अक्षर असलं म्हणजे असं मोठ्या वर्गाच्या शिष्ट मुलांसमोर ‘इम्प’ पाडता येतं हा साक्षात्कार मला तेंव्हा झाला.

तिसरीमध्ये आम्हाला सुलेखन - म्हणजे टाक वापरून पुस्ती काढायची - होती. तिसरीतल्या पोरांच्या शाई सांडून ठेवण्याच्या अपार क्षमतेवर संपूर्ण विश्वास असणाया चौधरी सरांनी सरळ पोरांकडून ती पुस्ती निळ्या स्केचपेनानी भरून घेतली होती, त्यामुळे अक्षर सुधारण्याची एक सुंदर संधी हुकली. पण मग नंतर घरातल्या आमच्या प्रयोगांमध्ये अजितने मला घरी एक मस्त बोरू बनवून दिला, आणि वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखा माझा बोरू दिसेल त्या कागदावर चालायला लागला. घरी बाबा सोडून सगळ्यांची अक्षरं सुंदर होती (बाबा आपल्या व्यवसायाला जागून खास डॉक्टरी लीपीमध्ये लिहायचे - त्यांनी लिहिलेलं वाचणं सोडा - हे बाळबोध मराठीमध्ये आहे का इंग्रजीमध्ये हे सुद्धा खात्रीने सांगता येत नाही कुणाला!) पण अक्षर चांगलं असलं तरी एकजात सगळ्यांना लिहिण्याचा मनस्वी कंटाळा होता.(कुणा दुष्टाने लीपीचा शोध लावला त्याची शिक्षा म्हणून आम्हाला गृहपाठ म्हणून धडेच्या धडे उतरवून काढावे लागतात - इति आमचे ज्येष्ठ बंधू.) त्यामुळे हे असलं लिहिण्याचं नतद्रष्ट खूळ माझ्या डोक्यात कुठून शिरलं त्याचा घरच्यांना अंदाज येईना. सुधरेल हळुहळू शेंडेफळ म्हणून त्यांनी सोडून दिलं.

बोरूचा आणि एकंदरीतच लेखनप्रेमाचा परिणाम म्हणून चौथी-पाचवीपर्यंत माझं अक्षर थोडंफार वाचनीय झालं होतं. पण मग शुद्धलेखन नावाचा नवीन शत्रू प्रबळ झाला होता. अक्षर वाचता आलं की शुद्धलेखनाच्या चुका जास्त समजतात, हा बोरू - सरावाचा तोटा नव्यानेच लक्षात आला. पाचवीत एकदा एक तास ऑफ होता, त्यामुळे दुसऱ्या वर्गावरच्या यमुना महाजन टीचर आमच्या वर्गावर (पोरं वळायला) आल्या. त्यांनी सहज म्हणून माझी भूगोलाची वही बघितली. ‘भुगोला’च्या त्या वहीत मी पहिल्याच पानावर ‘दीशां’ची नावे अशी लिहिली होती - पुर्व, पश्चीम, उत्तर (अ ला उकार देऊन उ) आणि दक्षीण. हे वाचून त्या बेशुद्ध पडायच्याच बाकी होत्या. (तेंव्हा मी नुकतंच सावरकरांचा देवनागरी सुलभीकरणाविषयीचा लेख वाचला होता कुठेतरी, त्यामुळे माझ्या मते ‘अ’ ला उकार देऊन लिहिलेलं ’उत्तर’ बरोबरच आहे असा माझा दावा होता. टिळकांनी नाही का संत शब्द तीन प्रकारे लिहून दाखवला होता - पण आमच्या शाळेतले शिक्षक टिळकांच्या शिक्षकांसारखे मोकळ्या मनाचे नसल्यामुळे मी हे मत टीचरना सांगायचं धाडस केलं नाही.)

तशी तेंव्हा वर्गातल्या बहुसंख्य मुलामुलींची शुद्धलेखनाची परिस्थिती माझ्याइतपतच होती. आमच्या वर्गात प्रत्येक शब्द देवनागरीमध्ये कसा लिहायचा हे पाठ करणारे काही महाभाग होते, ते सोडता.

म्हणजे मी वाचायचे भरपूर, त्यामुळे शब्दसंपत्ती चांगली होती - पण प्रत्येक शब्द कसा लिहायचा हे लक्षात राहणं शक्य नव्हतं. त्यापेक्षा कानाला योग्य वाटणारं लिहायचं हे जास्त सोयीचं वाटत होतं, तिथे पंचाईत होती. परत ‘पाणी’ शुद्ध, तर मग ‘आणी’ अशुद्ध कसं असे प्रामाणिक प्रश्न खूपच होते. उच्चार करून बघितला, तर ‘आणी’, आणि, ‘अणी’, ‘अणि’ हे चारही उच्चार बरोबरच वाटायचे.

(क्रमशः)

6 comments:

Unknown said...

छानच लिहितेस...अक्षर सुंदर असण्याबाबत माझे बाबा आणि शुद्ध असण्याबाबत आई खुप जागरुक होती..............पण लिहिण्याचा मात्र खरच मनस्वी कंटाळा यायचा.......

तन्वी
www.sahajach.wordpress.com

Anonymous said...

माझी सुध्दा अक्षराच्या बाबतीत बोंबाबोंब आहे. आधी डायरी लिहायचो पण ती इतरांना सोडा, नंतर मला पण वाचता यायची नाही.

हे असलं ऑनलाईन ब्लॉगींग सुवीधा सापडली ज्यात आपले अक्षर लागत नाही आणि म्हणुन परत लिहायला सुरुवात केली.

छान लिहीले आहे, पुढील लेखनास शुभेच्छा.

Yawning Dog said...

mastach lihile aahe.
"अक्षर वाचता आलं की शुद्धलेखनाच्या चुका जास्त समजतात"
:D:D:D:D

Gouri said...

तन्वी, अंट्या, जांभई देणारा कुत्रा, :)
@ अंट्या ... याला डायरी ’एन्क्रिप्ट’ करणं म्हणतात :D

आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद.

अवधूत डोंगरे said...

'डोह'वाल्या श्रीनिवास विनायक कुलकर्णींची आठवण झाली.

Gouri said...

अब्द, श्रीनिबास विनायक कुलकर्णी आणि ‘डोह’ दोन्हीविषयी मला काहीच माहिती नव्हती ... तुमच्यामुळे त्यांची ओळख झाली. धन्यवाद!