Friday, December 3, 2010

Out of mind notification

आपुन का भेजा खेकडे के माफिक वाकडा चलता है. तर सध्या जीव चाकोरी सोडून दगडाधोंड्यात जाऊन पडण्यासाठी तडफडतोय. आजचा शेवटचा दिवस पाट्या टाकायचा. ‘out of office' सुद्धा लावून झालं तिकडे. म्हणून म्हटलं इकडे पण एक ‘out of mind' लावून टाकावं. आता दोन महिने ऑफिस, काम, लॅपटॉप, नेट या सगळ्याशी घेणं नास्ति आणि देणं नास्ति. बघू खेकड्याच्या आत काही सापडतंय का ते.


*********************************************

सॉफ्टवेअरच्या कोर्सचे शेवटचे दिवस. ‘कॅम्पस’ जोरात चाललेले. प्रत्येक कॅम्पसच्या निकालाबरोबर एक एक ग्रूप ढवळून निघत होता. वर्गातली सगळी समीकरणं बघता बघता बदलत होती. आजवर एकमेकांवर खुन्नस खाऊन असणारे एका कंपनीमध्ये जॉब मिळाल्यावर अचानक जानी दोस्त बनत होते. पहिले नोकरी मिळवलेले वर्गातल्या टॉपरसमोर माज दाखवून घेत होते. अजून जॉब न मिळालेले प्रत्येक निकालाबरोबर जास्त जास्त खोलात. सांधा बदलून वर्गातल्या अश्वस्त मैत्रीमधून नोकरीच्या अनोळखी विश्वात पाऊल टाकण्याचे दिवस. मी अजून धडपडतच होते. नोकरी केलीच पाहिजे का, आणि मुंबईला नोकरी करायची का या दोन शंकांमुळे धड मनापासून प्रयत्न करत नव्हते, आणि एकीकडे आजुबाजूच्या बाकीच्यांना नोकरी मिळेल तसतशी अस्वस्थ. एव्हाना मी लकी आहे - माझ्याबरोबर इंटरव्ह्यूला जाणार्‍याचं की हमखास सिलेक्शन होतं अशी माझी ख्याती झाली होती.

एका इंटरव्ह्यूला मी एकटी गेले होते, त्यामुळे माझी सोबत मलाच लकी ठरली असावी - तर सिलेक्शन झालं. एकीकडे जीव भांड्यात पडला, दुसरीकडे तडाजोडीची नोकरी, तीही मुंबईत म्हणून नाराजी. कोर्स संपला. पंधरा दिवसांनी नोकरी सुरू होणार, तोवर पुण्याला आले. पुण्यात प्रयत्न करून बघावा असा विचार होता. त्यासाठी कुठे जायचं, कोण मदत करू शकेल याची माहिती शून्य. पंधरा दिवस धडपड करून काहीच हाताला लागलं नाही, आणि निरुपायाने मुंबईला जॉईन करण्यासाठी मी सामानाची बांधाबांध सुरू केली. आयुष्यात नियोजनापेक्षा योगायोगानेच इतक्या गोष्टी होत असतात ... याही वेळी त्याचा अनुभव आला. निघायच्या काही तास आधी पुण्यातल्या कंपनीची सिलेक्शनची मेल आली. दुसरंच काहीतरी करायचा मानस असताना मी अशी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात येऊन पोहोचले.

नाइलाजाने सुरू केलेल्या नोकरीत हळुहळू प्रगती होत गेली. जवाळचे मित्रमैत्रिणी मिळाले, कामाचं चीज झालं, जास्त जबाबदारीचं काम मिळत गेलं. काहीही प्रयत्न न करता मोठ्या, पूर्वीपेक्षा जास्त प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली. अजून वेगळा अनुभव, नव्या संधी मिळाल्या. या सगळ्याच्या जोडीला कामाच्या वाढत्या ताणाची जाणीव, कामाच्या वेळावर नियंत्रण नसणं, कधी विनाकारण संधी डावलली जाणं हेही. आज नोकरीने मला काय दिलं याचा विचार करताना जाणवतं ते म्हणजे मी कितीही नाकारलं, तरी हातात काहीच नव्हतं तेंव्हा शून्यातून सुरुवात करून या क्षेत्राने मला ओळख दिली, आर्थिक बाजू संभाळून धरली. वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी दिली. प्रोफेशनलिझम दिला, आत्मविश्वास दिला.

त्याच वेळी आपल्याला काय हवंय हे शोधण्याची आचही काहीशी कमी झालीय, वर्षानुवर्षाच्या सवयीतून आहे हे असंच चालू ठेवणं सोयीचं आहे असा एक इनर्शिया आलाय. सुरक्षिततेची सवय लागलीय. आपल्या आयुष्यातली इतकी वर्षं ज्याची मनापासून पॅशन नाही अश्या कामाला दिलीत, पुढचीही सगळी वर्षं द्यायची का हा प्रश्न आता छळतोय. इतके दिवस रूटीनच्या वेगामध्ये मागे टाकलेले सगळे प्रश्न फेर धरताहेत.

तर मी वाट बघत होते ती ‘मोठी सुट्टी’ अखेरीस सुरू होणार. आज कामाचा शेवटचा दिवस. पुढचे दोन महिने सध्याच्या रुळलेल्या चाकोरीपासून जास्तीत जास्त दूर जाऊन स्वतःच्या जवळ जायचा प्रयत्न आहे.

18 comments:

Anagha said...

:) गौरी, हा गोंधळ माझाही होतो. जरी हे जाहिरातक्षेत्र रोजचे नवनवे अनुभव देत असलं तरी हे काही नुस्त 'creation' नव्हे. जसे पैसे तसे काम असं हे सगळं गणित. परंतु, घर चालवणे आणि मनाला आनंद होईल असे काम करणे, ही सांगड आयुष्यात कधी तरी घालता यावी ही मनोमन इच्छा! मी अगदी तुझ्या बाजूला बसून तुझ्या जोडीने पुन्हा विचारात पडले. :)

Gouri said...

अनघा, अगं नुसता गोंधळ उडालाय डोक्यात ... माझं काम तसं पॉझिटिव्हली वाईट नाहीये खरं म्हणजे ... वेगवेगळ्या प्रकारच्या कामाची संधी आहे, नोकरीत मिळू शकतं तेवढं स्वातंत्र्य आहे, आर्थिक बाजू ठीक आहे. पण आपल्याला आयुष्यात हेच करायचंय असं आतून वाटात नाहीये. बघू काही उपाय सापडतो का ते.

Anagha said...

सापडेल गं, तुझं तुलाच लवकरच सापडेल बघ! :)

Gouri said...

धन्यू अनघा :)

Raj said...

माझे वैयक्तिक मत असे की फॉलो युअर पॅशन. अर्थात हे बोलायला सोपे असते, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या अडचणी असतात. सुट्टी चांगली जावो आणि योग्य दिशा मिळो ही शुभेच्छा. :)

Anonymous said...

गौरी आपण सगळेच बहूतेक या वर्तूळाच्या भोवती फिरत असतो कुठेतरी....
अशीच तर आली होती गं माझी यावेळेसची पोस्ट... स्वत:च स्वत:ला विचारले, सांगितले समजावले ई.ई.... :)
सुट्टीला जाऊन ये आधि, एखादा लहानमोठा ब्रेक बरेच प्रश्न सोडवतो अश्यावेळेसही आणि एरवीही....

Gouri said...

राज, सगळ्यात जे करावंसं वाटातंय त्याची व्यवहाराशी सांगड घालणं हीच मोठ्ठी अडचण आहे!
शुभेच्छांसाठी धन्यवाद!

Gouri said...

तन्वी, अगं मलाही असंच वाटलं ... तुझ्या पोस्टवरच्या प्रतिक्रियेत म्हटलंय ना, असंच काही लिहायचं मनात होतं म्हणून ... ते यामुळेच.

Raj said...

इथे मॉमचे एक वाक्य आठवले, कदाचित क्लिशे वाटू शकेल, पण मला आवडते. :)

“It's a funny thing about life; if you refuse to accept anything but the best, you very often get it.” ~ William Somerset Maugham.

Gouri said...

राज, खरंय मॉमने म्हटलेलं.
And very relevant for my current situation.

~G said...

enjoy your sabbatical.
:)

Gouri said...

thanks G!

भानस said...

गौरे, अगं हे सगळे गोंधळ आयुष्यालाच पुजलेले आहेत. तेव्हां ते कमी होतील किंवा संपतील वगैरे भानगडीत न पडता त्यांना गृहित धरूनच चालायचे. आता हाताशी असलेले दोन महिने अगदी स्वत:चे करून टाक. जमेल तितकी मजा आणि भरभरुन आनंद घे. कदाचित बरेच समज व गैरसमजही दूर होऊन जातील. :)

Gouri said...

भाग्यश्री,अग हे दोन महिने खास अगदी माझे आहेत ... नवरासुद्धा इथे नाहीये सद्ध्या, आणि ते अगदी माझ्या पथ्यावर पडलंय. बघू डोक्याचं काय करता येतं ते आता.

हेरंब said...

दोन महिने सुट्टी? आई ग.. !! मला म्हणतानाही धाप लागली... !! आनंदाने ग :)

कोणी नमस्कार केला की माझी आजी म्हणायची "मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत".. त्याच धर्तीवर तुला या दोन महिन्यांत जे काही (अचिव्ह) करायचं असेल ते सगळं पूर्ण होवो या शुभेच्छा !!

Gouri said...

हेरंब, आभार्स ... सध्या शुभेच्छांची फार गरज आहे :) किती आणि काय काय जमेल एवढ्या दिवसात म्हणून मधूनच शंका येतीये.

Meenakshi Hardikar said...

http://www.facebook.com/?ref=logo#!/notes/suresh-pethe/marathi-blogarsa-apalya-pahilya-melavyacya-smrti-jagavuya-ka-re-/157495897629745 ikade tuza photo pahila :)

Gouri said...

मीनाक्षी, अगं तुझी प्रतिक्रिया मिळाली तेंव्हा मला नेटला फार कमी ऍक्सेस होता ... आज इतक्या उशीरा उत्तर देते आहे तुला.