Saturday, July 16, 2011

कुसुमाग्रज : स्वप्नमंजुषा

पुन्हा एकदा समिधा ...

स्वप्नमंजुषा

    आकाशात चंद्रोदय झाला.

    चंद्राचे निळसर किरण गवाक्षातून माझ्या शय्येवर आले.

    मी उठलो आणि दार उघडले.

    तू जादूगार दाराबाहेर उभा होतास!

    सहस्रावधी स्वप्नांनी भरलेली चंदेरी स्वप्नमंजुषा तू माझ्यापुढे केलीस.

    आणि मला सांगितलेस, यांतील एका स्वप्नाची निवड कर.

    मी पाहू लागलो. स्वप्नाची निवड करू लागलो.

    सागरासारखी निळी, उषःकालासारखी सोनेरी, शुक्रासारखी तेजस्वी आणि इंद्रधनुष्यासारखी सप्तरंगी अशी स्वप्ने होती ती!

    सारीच मृगजलासारखी मोहक होती!

    मी भांबावून गेलो आणि प्रत्येक स्वप्नाचे सौंदर्य पाहू लागलो.

    जादूगारा, तू तिष्ठत उभा होतास हे मी विसरलो. एका स्वप्नाची निवड मला करावयाची होती याचे मला विस्मरण झाले.

    स्वप्नामागून स्वप्ने मी पाहू लागलो, आणि त्यातच सारी रात्र संपून गेली.

    आकाशात अरुणोदय झाला आणि त्या ज्वालामय प्रकाशात, हे जादूगारा, तू आपल्या स्वप्नांसह अदृष्य झालास!

2 comments:

Anagha said...

wow !!!! किती सुंदर आहे गं !!!! कल्पनाच किती सुंदर आहे !

Gouri said...

अनघा, ‘समिधा’ खूप दिवसांनी पुन्हा एकदा वाचते आहे ... आणि कित्येक कविता नव्यानेच ‘सापडताहेत’!