कुसुमाग्रज, समिधा संग्रह.
*****************************************
आकाशाचे ओझे
एका उंच पिंपळाच्या शिखरावर ती लहानशी चिमणी बसली होती. आपले दोन्ही पंख तिने पसरले होते.
सारे बळ एकवटून पिंपळाचा शेंडा तिने कवळून ठेवला होता. ती हालत नव्हती, चिवचिवत नव्हती.तिच्या चेहर्यावर काही विलक्षण गांभीर्य दिसत होते. तिच्या इवल्याशा डोळ्यांतून विलक्षण तेज ओसंडत होते.
क्षण गेले, घटका गेल्या, दिवस जाऊ लागला; पण ती होती तशीच राहिली.
तिच्या आप्तमित्रांना नवल वाटले. अनेक चिमण्या तिच्याजवळ चिवचिवत आल्या आणि विचारू लागल्या, ‘चिऊताई, हे असं काय करता हो? काय होतंय् तुम्हाला?’
ती बोलता बोलेना. एकाग्र दृष्टीने नुसती त्यांच्याकडे पाहात राहिली.
सर्व चिमण्या चिवचिव करीत तिच्याजवळ सरकू लागल्या. तिला काय होतंय हे पाहण्याचा प्रयत्न करू लागल्या.
त्याबरोबर ती एकदम आवेशाने ओरडली, ‘मागे सरा. मला धक्का लावू नका! नाहक सार्या पृथ्वीचा नाश होईल!’
चिमण्यांना काहीच कळेना. सार्याच गोंधळात पडल्या. शेवटी एक चतुर चिमणी पुढे येऊन म्हणाली, ‘चिऊताई, पंख उघडून तुम्ही गंभीरपणाने पिंपळावर का बसल्या आहात हे आम्हाला कळलंच पाहिजे. नाही तर आम्ही सर्वजणी मिळून तुम्हाला इथून उठायला लावू! या पिंपळावर तुमची एखादी आळई किंवा काडी हरवली आहे काय?’
‘आळई किंवा काडी?’ चिऊताई उद्वेगाने हसून म्हणाली, ‘क्षुद्रांच्या मनात क्षुद्र विचारच येणार! बायांनो, मी आकाशाचं ओझं माझ्या पंखांवर उचलून धरलेलं आहे!’
‘म्हणजे?’ सर्वजणी चिवचिवल्या!
‘त्याचं असं झालं’ चिऊताई सांगू लागल्या, ‘आज सकाळी या पिंपळावर बसून मी उडण्याच्या विचारात असता एक भयंकर आवाज आला आणि सारं आकाश खाली कोसळून पडलं! सर्वांत उंच अशा या झाडावर मी असल्यानं ते अर्थातच माझ्या पंखावर आलं. तेंव्हापासून ते प्रचंड ओझं मी उचलून धरलं आहे. मी उठले तर आकाश खाली पडेल आणि पृथ्वीचा चक्काचूर होईल, सार्या प्राणिमात्रांचा नाश होईल!’
चिमाण्यांनी तिची समजूत घालायचा खूप प्रयत्न केला. आकाश पडत नाही आणि पडलं तरी आपल्या पंखांमुळे अडत नाही असं सर्वांनी तिला सांगितले.
--पण तिची समजूत पटली नाही. चिमण्या निघून गेल्या आणि आकाशाचे ओझे पंखावर घेऊन ती चिमणी बसून राहिली!
11 comments:
अप्रतिम!!
आश्लेषा, शेवटी कुसुमाग्रजच ते!
गौरी, माझा दिवस सुंदर सुरु केलास तू ! :)
अनघा, आज ‘आकाशाचे ओझे’ वाचली, आणि एकटीच हसत बसले होते. आकाशाचं ओझं वाहणार्या कितीतरी चिमण्या डोळ्यापुढे आल्या ;)
:D अगदी अगदी ! मलाही वाटलं की मला तू 'चिमणी' म्हणतेयस की काय ! :D
कधीकधी मोठया प्रेरणा म्हणजे असा एक 'वेडेपणा'च असतो, नाही का?
अनघा, तुझं काही माहित नाही, मी मात्र चिमणी :)
सविता, मोठ्या प्रेरणा हा व्यवहारी जगाच्या भाषेत वेडेपणाच असतो. पण मला वाटतं, की आपल्या क्षमतेचं भान ठेवून अंधारातल्या पणतीसारखं काम करणं हे चिमणीने आकाशाचं ओझं तोलल्याचा भाव बाळगण्यापेक्षा चांगलं, नाही का?
शेवटी ते " कुसुमाग्रजच " गं...!
जसा खारीचा वाटा तसाच या चिमण्यांचाही...
हम्म. खरंय. चिमण्यांचाही वाटा असतोच. पण चिमणीने आभाळ तोलल्याचा भाव आणल्यावर गंमत वाटाते ना?
आहे खरी गंमत... :)
Post a Comment