Friday, August 19, 2011

अण्णा

रोज
चढत्या भाजणीने बाहेर पडणार्‍या
भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या बातम्या वाचताना
मला हे जाणवत असतं.

मागच्याच वर्षी बनवलेल्या रस्त्यावरचे
खड्डे चुकवत
रोज ऑफिसला जाताना
मला हे जाणवत असतं.

मी भरलेल्या कराचे पैसे
खिरापतीसारखे वाटले जातात तेंव्हा
मला हे जाणवत असतं.

मोठमोठ्या नावांची वृत्तपत्र
एकेका नेत्याचे गुलाम असल्यासारखी
वागतांना दिसतात तेंव्हा
मला हे जाणवत असतं.

मी मत देऊनही
देश विकून खाणारे
गेंड्यालाही लाजवील अश्या कातडीचे
‘नेते’ निवडून येतात तेंव्हा
मला हे जाणवत असतं.

परदेशी सहकार्‍यांच्या
"तुमच्या देशात इतकी कर्तबगार माणसं असूनही
देशाची प्रगती मुंगीच्या पवलांनी का होते?"
या प्रश्नानी निरुत्तर होताना
मला हे जाणवत असतं.

हा देश चालवण्याची आमच्या तथाकथित नेत्यांची लायकी नाही.
We deserve a better government.

आणि हे ही जाणवत असतं
की एक सामान्य नागरिक म्हणून
माझ्या स्वतंत्र देशात
माझ्या एकटीच्या मताला
जवळजवळ शून्य किंमत आहे.
नेमकं सांगायचं तर
एकशे वीस कोटींपैकी एक.

अश्या हजारोंच्या, लाखोंच्या मतांना
अण्णा तुम्ही आवाज मिळवून दिलात!

14 comments:

Anagha said...

नेते म्हणजे आपणच गं...आपणच तयार केलेले...घडवलेले. आपल्याच पापांचे हे फळ.
आपल्यालाच वेळ नसतो, सगळी कामं पटापट करून हवी असतात...आपण ज्यावेळी कोणापुढे तरी नोटा नाचवतो तेव्हाच कोणीतरी त्या नोटा घेतं.
आपणंच जन्म घातलेलं हे विद्रूप बाळ आता आपल्याच उरी बसलंय...त्यामुळे शस्त्र देखील आपल्याच हातात आहे...दुसऱ्या कोणाच्याही नाही.

Vinay said...

कविता खूपच छान आहे. खरच, भ्रष्टाचाराला सगळ्यात जास्ती बळी पडतात ते गरीब आणि सामान्य लोक. आणि संभवामि युगे युगे सारखे अण्णा हजारे धावून आले असताना, त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. त्याशिवाय अशा काही धाडसी लोकांमुळेच आपल्या सारख्या मरगळलेल्यांना आवाज उठवायची ताकद मिळते.

Anagha said...

तुझ्या कवितेच्या परिणामकारकतेमुळे माझा उद्वेग बाहेर पडला...
ह्यात तुझी कविता खूप चांगली जमून गेली आहे...हे आहे...
:)

Raj said...

सहमत आहे. राजकारणी लोकांना सामान्य माणसांची आठवण दर पाच वर्षांनी एकदा होते. इथे जेएफके चित्रपटातील केव्हिन कोस्टनरचा संवाद आठवला, "An American naturalist wrote: "A patriot must always be ready to defend his country......against its government."

Gouri said...

अनघा, कालपासून तुझ्या पहिल्या प्रतिक्रियेवर विचार करते आहे... होपफुली, त्यावर एक नवीन पोस्ट लवकरच (?) टाकते.

Gouri said...

विनय, प्रतिक्रियेबद्दल आभार. अण्णांना पाठिंबा देणं गरजेचं आहे, पण प्रत्येक प्रश्नासाठी अण्णांनी(च) आणि उपोषण(च) करायची वेळ यायला नको, नाही का?

Gouri said...

अनघा, अग गेले काही दिवस डोक्यात होतं, ते तसंच उतरवून काढलं. कविता झालीय का ती? अपुनको कविता लिखना नही आता असा माझा समज आहे.

Gouri said...

राज, खरंय ... we need to be ready to defend the country against its government!
दर पाच वर्षांनी सुद्धा राजकारण्यांना सगळ्या सामान्यांचा विचार करायची गरज पडत नाही ... त्यांचं बहुमताचं गणित सुटलं म्हणजे झालं - ही खरी शोकांतिका आहे.

हेरंब said...

>> अश्या हजारोंच्या, लाखोंच्या मतांना
अण्णा तुम्ही आवाज मिळवून दिलात!

अगदी अगदी सहमत.. मस्त जमलीये कविता !!

Gouri said...

हेरंब, कसचं कसचं :)

भानस said...

गौरी, भावनांना शब्दात छान गुंफले आहेस. आवडली.

अण्णांना पाठिंबा द्यायलाच हवा... यात मतांतरे नसावीतच. मात्र ही वेळ आपणच आपल्यावर आणली आहे आणि हा उद्रेक क्षणिक ठरून ती पुन्हा पुन्हा येणार आहे अशीच काहीशी दुर्दैवाने आपली गत आहे... :(:(

Gouri said...

श्रीताई, अण्णांच्या आंदोलनाचा एकच पैलू मांडलाय इथे. मला अनघाची पोस्ट बघून वाटलं, तिने लिहिलंय तो याच्या पुढचा भाग - ही वेळ आपणच आपल्यावर आणली आहे हे स्वीकारणं, आणि आपली जबाबदारी ओळखणं.
हा सगळा उद्रेक काही दिवसांनी ओसरेलही, पण थोडा तरी बदल घडवून जाईल असं वाटतंय. (विशफुल थिंकिंग?)

vaishali said...

khup chhan ahe kavita ani me he kavita FB var pan post keli arthat tujhya navane :)

Gouri said...

वैशाली, धन्यवाद!