Monday, December 26, 2011

कं पोस्ट


१. वास आलेला चालणार नाही.

२. घरात चित्रविचित्र किडे नकोत.

३. चिलटं, माश्या अज्जिबात नकोत.

४. घरात गांडूळं चालाणार नाहीत.

५. दुसर्‍या टेरेसवर कचरा नकोय.

६. उगाच फुकटचे खर्च सॅंक्शन होणार नाहीत.

    एवढ्या अटी आणि शर्ती घेऊन सोसायटीचा ओला कचरा प्रकल्प असताना या विषयातल्या आडाणी व्यक्तीने घरात वेगळा प्रयोग सुरू करणे याला निव्वळ खाज म्हणतात.

    तर माझ्या मोठ्ठ्या सुटीत सुदैवाने एका कंपोस्टिंगवरच्या कार्यशाळेला जायला मिळालं. तिथे बघितलेल्या तयार सिस्टीम्स एक तर माझ्या बजेटमध्ये नव्हत्या, किंवा मर्यादित जागा, तिथे वेळ, ऊन, पाऊस यापासून संरक्षण नसणं, कबुतरांचा उपद्रव आणि जोडीला नवरोबाकडून आलेल्या वरच्या अटी यात बसण्याएवढ्या आखुडशिंगी बहुदुधी आहेत असा विश्वास मला वाटला नाही. त्यामुळे कंपोस्ट स्टार्टिंग मिक्श्चर, मायक्रोबॅक्टेरिअल लिक्वीड, दोन-चार माहितीपत्रकं आणि आपल्याला काय करता येईल याच्या आयडिया एवढंच कार्यशाळेतून घेतलं.

    फेब्रुवारीमध्ये आमचा घरचा कंपोस्ट प्रकल्प सुरू झाला, दिवाळीपासून मी बागेत हेच कंपोस्ट वापरते आहे - घाबरू नका. कंपोस्टिंगच्या नावाखाली कचर्‍याचे फोटो आणि बारकावे दाखवून तुम्हाला बोअर करत नाही. यात अश्या ‘खाज असलेल्या’ लोकांनाच रस असेल असा माझा अंदाज आहे. कंपोस्ट कसं करायचं (किंवा काय काय करायचं नाही) याचे तपशील कुणाला हवे असतील तरच माहिती टाकते. यातलं फार काही समजलंय असं मला वाटत नाही. फक्त हा प्रयोग ‘मॉडरेटली सक्सेसफुल’ झाल्याचा माझा निष्कर्ष आहे. पण यातून धडा घेऊन पुन्हा कंपोस्टिंग नक्की करणार.

******************************

    एवढं काय नडलं होतं घरी कंपोस्टिंग करण्याचं?

    दोन - अडीच वर्षांपूर्वी माझी छोटीशी बाग सुरू केली तेंव्हापासून काहे गोष्टी खटकत होत्या. बागेसाठी आपण माती विकत आणतो. माती काही कारखान्यात तयार होत नाही. जमीन लागवडीखाली आल्यावर तिथे सकस मातीचा थर तयार व्हायला वर्षं लागतात. पैशाची चणचण असली, म्हणजे शेतकरी शेतातली माती विकतात. ही माती आपण आयती विकत घेतो, चार सहा महिने - वर्षभर वापरतो, तिच्यात वेगळीवेगळी खतं मिसळतो, आणि तिचा कस कमी झाला म्हणून टाकून देतो ... पुन्हा नवी माती मातीमोलाने विकत घेतो. म्हाणजे बागकामाच्या हौसेच्या नावाखाली थोडीथोडी माती आपण निकस करत राहतो.

    आपल्या बागेत एक छोटीशी कमीत कमी परावलंबी इकोसिस्टीम बनवता येईल का? बागेतलाच कचरा वापरून खत बनवलं, आणि जुन्या मातीमध्ये ते मिसळून तिचा कस कायम राखला तर? बाहेरची खतं वापरलीच नाहीत तर? (कीटकनाशकं वापरायचा प्रश्नच नव्हता, कारण रोगर किंवा दुसर्‍या केमिकल कीटकनाशकाचा मलाच त्रास होतो. त्यामुळे बागेत फवारायचं म्हणजे डेटॉलचं पाणी, फार फार तर साबणाचं पाणी. याव्यतिरिक्त काही मी वापरणं शक्य नाही.) हा कंपोस्टिंगचा पायलट म्हणजे त्या मोठठ्या किड्याचा एक छोटासा भाग.

9 comments:

Anagha said...

भारी आहे हे ! आणि माझ्या अजिबात कधी लक्षात आलं नव्हतं की आपण हळूहळू मातीची सुद्धा वाटच लावतोय ! म्हणजे शेवटी 'त्याची माती झाली' ह्याचा अर्थ इथे काही अधिकच ! :)
आणि माझ्या चिमुकल्या बागेत माझ्या माळ्याने ते नारळाचं काय ते करून घातलंय ! ठीक आहे का ते ? त्याबद्दल मॅडम आपलं काय मत आहे ? :)
आणि नाव अगदी भारी हं ! :) :)

Gouri said...

अनघा, माती होणं फार मोलाचं आहे ग :)

तुझ्या माळ्याने कोको पिट घातलंय का? आयती माती वापरण्यापेक्षा ते चांगलं, नाही का?

आणि पोस्टीचं नाव हेरंबकडून उचललंय ... ‘इन्स्पायर्ड बाय हेरंब’ म्हणून तळटीप लिहिली पाहिजे मी :D

हेरंब said...

'कंपोस्ट' अपना अपना ;)

Gouri said...

हेरंब, :D :D

भानस said...

ब्लूमिंग्टनला घर असताना मीपण हा उद्योग केला होता. पण तिथे एक बरं होतं गं, मोठं बॅकयार्ड होतं आणि एका कोपर्‍यात हा ड्रम ठेवलेला. त्यामुळे पॉईंट नं १ ते ५ चा प्रश्नच आला नाही. ६ चीही वेळ फारशी आली नाही. मजा येते असे खटाटोप करायला.

Gouri said...

मजा येतेच ग, आणि घरचंच कंपोस्ट वापरताना बरं वाटतं ना :)

Anonymous said...

मी फक्त बायोकल्चर युक्त माती सुरुवातीला ओल्या कचर्‍यात थोडी सुकी पानं घालून मिसळलीय. सध्या तरी चिलटं वगैरेंचा त्रास नाही, पण आमच्याकडे हवा वर्षभर चांगलीच दमट असल्यामुळे कचरा मुरायचा स्पीड काय असेल याबद्दल कुतूहल आहे. पण बागकामासाठी विकतची माती वापरून शेवटी ती वाया घालतो हे अगदी खरं. मला खाली जाऊन टाकायचा कचराच कमी होतोय हे पाहून अतोनात आनंद मिळतोय! बाग असती तर काय मजा आली असती - सध्या बाल्कनीतल्या कुंड्यांवर समाधान मानून घेतेय. तुमच्या रंगांच्या डब्यांचा एक फोटो बघायला आवडेल! मी माझी कंपोस्ट-प्रगती ब्लॉगवर नोंदवीनच.

Gouri said...

प्राची, कंपोस्ट प्रकल्पावर अजून एक पोस्ट टाकते. आणि माझी छोटीशी बाग म्हणजेसुद्धा बाल्कनीतल्या कुंड्याच आहेत.

Gouri said...

प्राची, एक लिहायचं विसरले ... मला ब्लॉगवर तू म्हटलेलं पळेल - तुम्ही नको :)