Wednesday, August 29, 2012

ओरिसाची भटकंती: इकडचं तिकडचं आणि समारोप



ही माझी ओरिसाच्या भटकंतीवरची शेवटची पोस्ट. सगळं लिहून संपवण्याच्या घाईत बर्‍याच इंटरेस्टिंग गोष्टी सुटून गेल्यात. त्या आठवतील तश्या मांडल्यात इथे.

 नक्षलवादाविषयीच्या ‘रेड सन’ पुस्तकाविषयी ऐकलं होतं. या पुस्तकाचा अतिशय सुंदर
सविस्तर परिचय श्रावण मोडक यांनी इथे करून दिला आहे. पुस्तकाविषयी अजून काही सांगत नाही – परिचय आणि पुस्तक दोन्ही आवश्य वाचा इतकंच म्हणेन.

 कोरापूट आणि पोचमपल्लीजवळचा आन्ध्र हे दोन्ही भाग नक्षलांच्यारेड कॉरिडॉरमध्ये येतात.

नक्षल स्मृतीस्तंभ

संस्थान नारायणपूर, पुट्टुपक्कम भागातून जातांना पोलीस कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलांचे स्मृतीस्तंभ जागोजागी दिसतात.

  आन्ध्र प्रदेशने नक्षलांविरुद्ध ठोस कारवाई केल्यानंतर इथले नक्षल ओरिसा, छत्तिसगड, महाराष्ट्रात अधिक सक्रिय झाले. आता इथे सगळं शांत शांत आहे असं समजलं. पण आजही गावातल्या घराघरावर नक्षल ग्राफिटी दिसते.

घरांवरची ग्राफिटी
सहज पुण्यातून बाहेर पडल्यावर सिंहगडावर किंवा ताम्हिणीला जातांना घराघरावर नक्षल घोषणा  लिहिलेल्या दिसल्या तर कसं वाटेल? हा विचार डोक्यात आल्याखेरीज राह्त नाही.

हे सगळं हैद्राबादपासून केवळ एक दीड तासाच्या रस्त्यावर. हा भाग दुर्गम नाही, कोरापूटशी तुलना करता मागास तर नाहीच नाही. ताडाची आणि कपाशीची शेती आहे. पारंपारिक विणकामाचा व्यवसाय आहे. शाळा, कॉलेजं आहेत, दवाखाने आहेत. कित्येक जण कामाला हैद्राबादला जातात. दोन्ही भागातल्या प्रश्नांचं स्वरूप नक्कीच वेगवेगळं असणार. पण तिथेही नक्षल आहेत, इथेही आहेत. नेपाळपासून तामिळानाडूपर्यंत सगळीकडेच हे कसे पसरले? तेंव्हा आम्ही काय करत होतो? मानेसरच्या कामगारांच्या हिंसाचारामागेही त्यांचा हात असतो, आणि दांतेवाडामधल्या पोलिसांच्या हत्यांमध्येही. मोठया शहरांमध्ये त्यांचे स्लीपर सेल आहेतकाय हवंय नेमकं या नक्षलांना? त्यांच्या मते आदिवासींवर अन्याय होतोय. ते फसवले जाताहेत. अगदी खरं आहे हे. इतकी वर्षं त्यांची वंचना झाली आहेच. काय उपाय आहे यावर? नक्षलांच्या आजवरच्या कारवाया बघितल्या, तर हे लोक कुठल्या विचारसरणीसाठी किंवा विकासासाठी लढताहेत असं म्हणवत नाही. मग उरतो फक्त एकच उद्देश – तुम्ही आज जी सत्ता भोगता आहात, ती आम्हाला द्या. त्यासाठी अराजक माजवण्याचीही आमची तयारी आहे. जिथे जिथे सरकारविरोधी असंतोष आहे, तिथे नक्षल आहेत. आणि दुर्दैवाने आपल्याला अतिरेकी कारवायांचा धोका जितका जाणवतो, तितका नक्षलांचा जाणवत नाही. कारण मुंबईच्या ताजवर अतिरेकी हल्याचं लाईव्ह चित्रीकरण आपण बघू शकतो. छत्तीसगढच्या जंगलात नक्षलांच्या कारवाया आपल्या डोळ्यासमोर घडत नाहीत. ते ‘दूर कुठल्यातरी जंगलात’ घडत असतं. पुण्यामुंबईतही त्यांचे स्लीपर सेल आहेत याचा आपल्याला पत्ता नसतो.

    सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आपल्याकडच्या विचारवंतांच्या वर्तुळांमध्ये अजूनही नक्षलांविषयी रोमॅंटिक कल्पना आहेत. दिल्लीला जेएनयूमध्ये असतांना आयसा (AISA) सारख्या विद्यार्थी संघटनेच्या पत्रकांमध्ये यांचं कौतुक मी स्वतः वाचलंय. ती पत्रकं वाचून तर कधी जाऊन या क्रांतीकारकांना आपण सामील होतो असं वाटेल.

    पोचमपल्ली नावाची दोन गावं आहेत. एक आन्ध्रातलं साड्यांचं पोचमपल्ली, दुसरं तमिळनाडूमधलं. आन्ध्र पोचमपल्लीलाभूदान पोचमपल्लीम्हणतात. विनोबांची भूदान चळवळ इथून सुरू झाली होती म्हणून. भूदान यशस्वी झालं असतं, तर इथे नक्षल इतके प्रभावी होऊ शकले असते का?

*************************************
    ओरिसाच्या भटकंतीच्या कहाणीचा समारोप करायचं मी इतके दिवस पुढे ढकलते आहे. कारण लिहितांना खूप गोष्टी सुटून गेल्यात, बर्‍याच गोष्टी अजून डोक्यात अर्ध्या कच्च्या आहेत, आणि आपल्याला जे वाटतंय, ते लिहिता येणार नाही अशी जवळपास खात्री आहे.

केचला मधली शाळा बघणं हे निमित्त होतं. मला कोरापूटला जायचं होतं, ते सरकारचं काम नेमकं कसं चालतं ते बघायला. यूपीएससीचं स्वप्न मीही कधीतरी बघितलं होतं. त्यामागे अशी समजूत होती, की प्रशासनात जाऊन तुम्ही खरंच देश समजून घेऊ शकता, काही बदल घडवून आणू शकता. काठावर बसून टीका करणं सोपं असतं. त्यात तुम्हाला करावं काहीच लागत नाही. प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे खरे. ते स्वप्न मागे राहिलं, आणि त्याबरोबरच तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात काही बदल घडवण्याची मोठी संधीही. आता त्याविषयी हळहळ करण्यात अर्थ नाही. पण ही भेट या हुकलेल्या संधीच्या शक्यता बघण्यासाठी होती.

कोरापूटच्या जगन्नाथाचा रथ

महाराष्ट्राच्या, पुण्याच्या जनजीवनातलं प्रशासनाचं स्थान आणि कोरापूटमधलं कलेक्टरांचं स्थान यांची तुलनाही करणं अवघड आहे. तिथली जनता अजूनही मायबाप सरकारवर पूर्ण अवलंबून आहे. अजूनही तिथला कलेक्टर जिल्ह्याचा राजा आहे. सगळे अधिकारही त्याचेच, आणि जबाबदारीही. अश्या पदावर जेंव्हा शिवाजी महाराजांच्या मुलकी प्रशासनाचा आदर्श ठेवणारा अधिकारी असतो, तेंव्हा त्याला काम करतांना बघणं हे फार मोठं सुख असतं. माझ्या जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकर्‍याचं अर्थशास्त्र मला समजून घ्यायचंय म्हणून तो रस्त्यात भेटलेल्या शेतकर्‍याशी गप्पा मारतो. कुठल्या गॅझेटमध्ये न लिहिलेल्या गोष्टी या गप्पांमधून उलगडतात. प्रत्येक फील्ड व्हिजिटमध्ये तो किमान एका शाळेला भेट देतो, तिथल्या मुलांशी गप्पा मारतो. यंदा तुमच्या शाळेचा निकाल १००% लागलाच पाहिजे हे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पुढे ठेवतो. कलेक्टर सर आपल्याशी वेळ काढून बोलले, याचा केवढा आनंद आणि अभिमान वाटत असेल त्या शाळेच्या मुलांना!

आणि दर्शनासाठी जमलेले भाविक

कोरापूट हा नक्षलग्रस्त जिल्हा. जिल्ह्याचे कित्येक ब्लॉक नक्षलांच्याच प्रभावाखाली आहेत. चार वर्षांपूर्वी थेट जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला झाला, इतके इथे नक्षल प्रबळ आहेत. आधीच दुर्गम आणि मागास भाग, त्यात नक्षलांचा उपद्रव. त्यामुळे इथे काम करायला सरकारी कर्मचारी तयार नसतात. कित्येक जण इथली बदली संपेपर्यंत कार्यभार स्वीकारतच नाहीत. आज जिल्ह्यातल्या तहसीलदार, बीडीओच्या(कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्षात फील्डवर) एकूण पदांपैकी जवळापास निम्मी पदं रीक्त आहेत. काही महिन्यांपूर्वी इथल्या आमदारांचं नक्षलांनी अपहरण केलं होतं. त्यावरची कलेक्टरांची प्रतिक्रिया म्हणजे “या भागाच्या विकासाच्या मागणीसाठी अपहरण केलं असा नक्षलांचा दावा आहे. माझीसुद्धा तीच मागणी आहे. आता इथल्या तहसीलदार आणि बीडीओच्या पोस्ट भराव्यात म्हणून मी सुद्धा आमदारांचं अपहरण करावं म्हणतो!”

आदिवासी संग्रहालयाचं प्रवेशद्वार
ओरिसाच्या एका कोपर्‍यात इतकं मनापासून काम करत असतांना एकीकडे देशात लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या येत असतात. मानवी अधिकारांच्या नावाखाली नक्षलांची पाठराखण करत सरकारी कर्मचार्‍यांना धारेवर धरणारी एक मोठी लॉबी तुमच्या विरोधात असते. कुणाच्यातरी भ्रष्टाचाराच्या आड आल्यामुळे कोर्टाचे खेटे घालायची वेळ येते. तुमच्या कामाची विशेष दखलही घ्यायला कुणाला वेळ नसतो. कोरापूटच्या पोस्टिंगमध्ये कलेक्टरांबरोबरच घरातल्या सगळ्यांनाही सक्तीची सुरक्षा व्यवस्था असते. अंधार पडल्यावर बाहेर फिरायचं नाही, गाडीशिवाय घराबाहेर पडायचं नाही. एकट्याने फिरायचं नाही. कारण अजून एक नक्षल अपहरण परवडणार नाही. पण जिल्ह्याच्या ठिकाणी नक्षलांचा सामना करणार्‍या या अधिकार्‍याला या प्रश्नाची जी समज आलेली आहे, ती वरून येणार्‍या सरकारी धोरणांमध्ये प्रतिबिंबित होत नाही. या सगळ्या परिस्थेतीत तुला फ्रस्टेशन नाही येत का? गळकी बादली भरण्यासाठी आपण थेंबथेंब टाकतोय याचं वैफल्य नाही वाटत? पुण्याहून निघायच्या वेळेपासून मनात असलेले प्रश्न. “परिस्थिती खरंच भयंकर आहे. आणि आपण प्रश्न जास्त अवघड करून ठेवतोय. हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. पण आश्चर्य म्हणजे माझा कामाचा उत्साह कायम आहे.” हे त्यावर कलेक्टरांकडून मिळालेलं उत्तर.

जर मी झालेच असते आयएएस, तर याहून वेगळं काय करणार होते? आपलं धूसर स्वप्न कुणीतरी जगतंय याचा आभाळाएवढा मोठा आनंद परत येतांना मनात असतो आणि या होपलेसली ऑप्टिमिस्टिक माणसाला असंच काम करत रहायला बळ मिळू दे अशी प्रार्थना.

8 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

माझा कामाचा उत्साह कायम आहे.

हे सर्वात जास्त आवडलंय.

Anagha said...

हताश आणि आशावाद. तुझी ही पोस्ट वाचताना दोन्ही वाटलं. आयएएस...हे असं काही असतं हे माझ्या काळी मला माहित देखील नव्हतं.
आज आता त्या शिवाय काही करता येईल का असा प्रश्र्न मनात सतत येतो.

Gouri said...

पंकज, हे सगळं इथे लिहायचं होतं ते त्यासाठीच. फार मोठा दिलासा आहे हा.

Gouri said...

अनघा, अगं तेच झालं माझंही. पुरेशी माहिती न घेता तयारी केली आणि ती वाया गेली. त्याशिवाय काय करता येईल हेच सद्ध्या शोधते आहे :)

Abhishek said...

शेवटचा दिस गोड व्हावा... हे ऐकून मनाला जो नितळ आनंद भेटतो, तसाच ही पोस्ट वाचून झालाय!
चित्र तर अगदी सुंदर आहेत, जस काही तुम्ही येणार म्हणून आम्ही गाव सजवलय अशी फ्रेश!
बाकी आपल्याच म्हणवणाऱ्या देशाची आपल्याला किती जाण नाहीये ह्याच वाईट वाटत, पण त्यामुळे तुमच्या ओरिसा पोस्ट मी हावऱ्या सारख्या वाचल्यात. आणि त्यातून मिळणारी माहिती खचितच कुठे मिळाली असती. तुझेही आभार तर मानणारच आहे, पण कलेक्टर साहेबांना विशेष शुभेच्छा. fingers crossed :)

Gouri said...

अभिषेक, इथली आदिवासी चित्रकला आपल्याकडच्या वारली चित्रकलेसारखीच वाटते ना अगदी ... मला तर पहिल्यांदा वाटलं, इथे वारली चित्रं कुणी काढली असतील बरं?

ओरिसाचा हा भाग म्हणजे बाहेरच्या जगाच्या दृष्टीकोनातून अस्तित्वातच नसल्यासारखा आहे. म्हणून जे बघायला मिळालं, ते इथे लिहायची घाई होती मला. आपल्या शुभेच्छा कलेक्टर साहेबांच्या कामाला यश देवोत!

Anonymous said...

>>इथली आदिवासी चित्रकला आपल्याकडच्या वारली चित्रकलेसारखीच वाटते ना अगदी ...

हेच लिहीणार होते मी!!
गौरे खरं सांगू या सगळ्या पोस्ट पुन्हा एकदा एका दमात वाचते आणि मग बोलते गं.... खुप सुचतंही आणि काहीच नाही असं काहिसं झालय...

Gouri said...

तन्वे, मला हे सलग आणि भरभर लिहायला नाही जमलेलं. त्यामुळे वाचणार्‍यांची लिंक लागणं जरा अवघड आहे. तुझी मान सांभाळून निवांत वाच, मग बोलूच!