Wednesday, December 25, 2013

Throwaway prototype


Nobody has ever thrown away a throw away prototype

हे ब्रह्मसत्य सॉफ्टवेअरमध्ये काम केलेलं कुणीही सांगेल.Throwaway protptype” ही एक सॉफ्टवेअर इंजिनियरिंगमधली एक कवीकल्पना आहे. आजवर कुणी प्रोटोटाईप बनवायचे कष्ट घेतल्यावर तो टाकून देऊन पुन्हा शून्यातून काम केलेलं नाही.
यंदा कंदील बनवतांना या कंदिलाला नेमके किती गोल लागतात आणि ते कसे जोडायचे हे मला अजिबात आठवत नव्हतं. म्हणून मग त्याचा छोटा प्रोटोटाईप बनवला. आयुष्यात पहिल्यांदा थ्रो-अवे प्रोटोटाईप आपण बनवतोय म्हणून मी एकदम खूश वगैरे होते. कंदील तयार झाल्यावर हा प्रोटोटाईप जवळजवळ थ्रो-अवे केलाच होता – तेवढ्यात कीर्तीची प्रतिक्रिया आली – कंदील कसा बनवलाय ते लिही म्हणून. मला लगेच प्रोटोटाईप आठवला – याचा फोटो टाकला तर लगेच समजेल कंदील कसा बनवलाय ते, म्हणून मग मग पुन्हा उत्खनन करून तो वर  काढला, जरा ठीकठाक करून फोटो बिटो काढले त्याचे. (हे पोस्टेपर्यंत पूर्णिमाचीही प्रतिक्रिया येऊन जुनी झालीये, आता तिला पुढच्या ख्रिसमसला बनवावा लागेल असा कंदिल :( )

तर, कंदिलाची सोपी कृती अशी:

लागलेला वेळ:
मला अडीच तीन तास लागले.

साहित्य:
जाड कागद १ (मी ६० सेमी * ९० सेमीचा कार्डशीट पेपर वापरला.), पातळ कागद (हा चक्क जुना बटारपेपर वापरलाय ;), कात्री, फेवीकॉल, दोरा. डिझाईनला उठाव द्यायला हवं असेल तर मार्कर, स्केचपेन वगैरे.

कृती:
पहिल्यांदा जाड कागदाचे ७.५ सेंटीमीटर त्रिज्येचे एकूण २० गोल कापून घेतले. (१९ मध्येही काम चालू शकतं.) (याचा कंदील साधारण फुटबॉलएवढा होतो.)

त्यांच्या अश्या त्रिकोणी घड्या घातल्या. (या घड्या जितक्या नेटक्या होतील, तितक्या कमी फटी पडतील कंदील तेवढा चांगला दिसेल. माझ्याकडे मुळात कंपासच नसल्याने आणि “मनीमाऊ उठण्यापूर्वी” ही महत्त्वाची अट असल्याने मी चालू काम केलंय.)


त्रिकोणावर सोप्पं डिझाईन कापून त्यावर पातळ कागद चिकटवून घेतले. इथे तुमच्या कल्पनाशक्तीला वावच वाव आहे. खूप कलात्मक वगैरे करायचं असेल, तर घडी होणार्‍या भागावरही डिझाईन करता येईल.


आता हे त्रिकोण जोडायचेत. म्हणजे वर्तुळाचे घडी घातलेले भाग एकमेकांना जोडायचेत. एका तुकड्याला तिन्ही घड्यांवर जोडण्याने सुरुवात केली. (प्रत्येक घडी वाळेपर्यंत थांबणं शहाणपणाचं, जे मी केलेलं नाही.) प्रत्येक जॉईंटला पंचकोन तयार करायचाय. निम्मे भाग जोडल्यावर असं दिसतं:



(हाच तो माझा टाकाऊ प्रोटोटाईप. :D )

असेच उरलेले नऊ (किंवा दहा) तुकडेही वरच्या बाजूला जोडले. शेवटचा (सगळ्यात वर येणारा, विसावा त्रिकोण) जोडला नाही तरी चालतं, किंवा डिझाईन ऐवजी बल्ब आत सोडता येईल असं भोक पाडून तो त्रिकोण चिकटवला, तर कंदीलाला अधिक बळाकटी येते.

आता कंदील टांगायला दोरा ओवायचा, आणि कंदिल तयार! 


12 comments:

Anagha said...

mast!! :)

Raj said...

अमेझिंग. हस्तकलेत प्राविण्य असलेल्या लोकांबद्दल प्रचंड आदर आहे.

आम्ही साधा कागदही सरळ रेषेत कापू शकत नाही. :)

Gouri said...

अनघा, छान आहे ना डिझाईन? हा माझा लाडका प्रकार आहे कंदिलाचा. :)

Gouri said...

राज, नीट बघ बरं ... कागद कुठेही सरळ कापलेला नाही यात! ;)

Suhas Diwakar Zele said...

सहीच ... :) :)

आमच्या हाती नुसता कीबोर्ड बडवणे हीच कला ;-)

Gouri said...

सुहास, कीबोर्ड बडवून "मन उधाण वार्‍याचे" होत असेल तर ग्रेटच ना! :)

गौरी said...

गौरीताई छानच जमलाय कंदील आणि तू कृती दिलीस ते मस्तच. पुढच्या वेळी नक्की करेन प्रयत्न घरी. भेट द्यायला तर काय सुरेख आहे.ह्या निमित्ताने नवीन वर्षाच्या शुभेच्छा :) अश्याच मस्त पोस्ट्स लिही.

Gouri said...

गौरी, नक्की करून बघ ग ... झटपट होतो, आणि छान दिसतो!

purnima said...

Gauri kruti ani finished product donhi atyant sunder. Pan sorry kharech tu welet taklas mich pahayla ushir kela. Practice attach karun pahin kela ki me pan photo post karin toparyant tujhya posts wachayala khoop avdel.

Gouri said...

पुर्णिमा, ही बेसिक कृती. तुला वेळ असेल तर वेगवेगळ्या रंगाचे कागद, वेगवेगळी डिझाईन असे खूप प्रकार शक्य आहेत यात! नक्की कर आणि फोटो टाक!

kirti said...

गौरी, अनेक धन्यवाद कन्दीलच्या कृती साठी.

ंमी जरा उशीराच पाहिली तुझी ही पोस्ट.

पुढ्च्या वर्षी नक्की तुला कळवते जमला कि नाहि ते.

पण तुज़े आभार कि लक्षात ठेवून हे सगळे पोस्ट्ले.

Gouri said...

कीर्ती, नक्की करून बघ! :) तो साध्या कागदावरचा नमुना टाकून द्यायचा राहिला होता म्हणून लिहिता आलं अगं हे!