Sunday, January 25, 2015

जिवाचा गोवा

गेल्या पाच – सहा महिन्यांपासून जमेल तसं एका नावाजलेल्या सेवाभावी संस्थेमध्ये थोडं काम करत होते. त्या कामावर आधारित पेपर मांडायला एका सेमिनारला गोव्याला जायची संधी मिळाली या आठवड्यात. मी गावाला जाणार म्हणजे अर्थातच माऊला घेऊन. तिला घेऊन एकटीने एवढा उद्योग करावा का नाही अशा विचारात होते आधी. पण संस्थेतल्या सहकारी म्हणाल्या, जरूर घेऊन ये तिला. मग ठरवलं, जिवाचा गोवा करूनच यावा!

आजवर माऊला घेऊन केलेले प्रवास तिची गैरसोय होणार नाही असं बघून, शक्यतो तिच्या पेसने असे होते. यावेळी प्रथमच दुसर्‍याने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, धावपळीचा प्रवास होता, आणि माऊचा बाबा सोबत नसणार होता. त्यामुळे पेपर वाचायच्या तयारीपेक्षा मला माऊच्या तयारीची जास्त काळजी होती!

प्रत्यक्ष कॉन्फरन्स माझ्यापेक्षा माऊने जास्त एन्जॉय केली! पंधरा – वीस कॉलेजवयीन दादा-ताई कौतुक करायला + खेळायला, आणि जरा चेंज हवा असेल तर मग मावशी मंडळी ... दोन दिवस नुसता कल्ला केला माऊने! “दोन वर्षांच्या लेकीला घेऊन एवढा प्रवास म्हणजे धीराची आहेस तू!” पासून ते “कॉन्फरन्सला लहान मुलांना घेऊन यायला परवानगी असते का?” पर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या तिथे. (यातल्या बहुसंख्य मी कानाआड केल्यात.) 


आजपर्यंत माऊ आणि काम या गोष्टी एकमेकांपासून पूर्ण वेगळ्या ठेवायचा माझा प्रयत्न होता. त्याची काही गरज नाही असं जाणवलं मला. तिच्या सोबत असण्याने मला नक्कीच फायदा झाला - जनरली अनोळखी घोळक्यामध्ये मी फार तोंड उघडत नाही. इथे माऊची आई म्हटल्यावर तोंड बंद ठेवण्याची संधीच नव्हती. तरीही माझ्या दसपट तरी ’नेटवर्किंग’ माऊने केलं असेल कॉन्फरन्समध्ये. आणि तिलाही यातून नवं काही अनुभवण्याची संधी मिळेल असं वाटतंय. माऊचं रोजचं रूटीन पाळणं नक्कीच जमणार नव्हतं हे दोन दिवस, पण रूटीनचा बाऊ केला तर नव्या ठिकाणी, नवे अनुभव घ्यायला मिळणं आणि जुळवून घेता येणं कसं शिकणार? एखाद्या वेळी असं झोपायची वेळ आली तर फार वाईट वाटून घ्यायचं नाही असं ठरवलंय मी!


कारण त्यानंतर असा दंगा करायची संधी मिळते!


6 comments:

तृप्ती said...

Work-life balance म्हणतात ते हेच :)

Gouri said...

तृप्ती, अगदी! पण मला याचा साक्षात्कार गोव्याला गेल्यावर झाला. तोवर माझा वर्क आणि लाईफ दोन कप्प्यात कोंबण्याचा प्रयत्न चालला होता! :)

asidwadkar said...

Nice Blog...
submit this blog in our blog directory for more visitors..
www.blogdhamal.com

Gouri said...

अजिंक्य सिदवाडकर, ब्लॉगवर स्वागत! ब्लॉगधमाल डिरेक्टरी बघते.

Kavs said...

Kitti goad zopliye mani mau :)

Gouri said...

Kavs, ब्लॉगवर स्वागत!
खूप दंगा करून, खेळून झाल्यावर दमून झोपलीय ती ... एकदम शांत! :)