गेली काही वर्षं जमेल तसं बाप्पा घरी बनवणं चाललंय. या वर्षीची प्रगती म्हणजे मागच्या वर्षी विसर्जन केल्यावर माती ठेवून दिली होती, तीच वापरली. विसर्जनानंतर मूर्ती विरघळल्यावर एक मातीचा केक तयार झाला होता. तो कुटून, चाळून घेतल्यावर नवी कोरी माती तयार! कुटायला फारसे कष्ट पडले नाहीत. आणि माती भिजायला जास्त वेळ द्यायची तयारी असेल तर माती चाळायची अजिबातच गरज नाही असं नंतर लक्षात आलं. नवीन माती विकत आणण्यापेक्षा ते जास्त सोयीचं आहे मला. तसंही मातीचा पुनर्वापर केला नाही तर बाप्पा इको – फ्रेंडली कसा होणार?
बाप्पा रंगवणं अजून काही मनासारखं जमत नाहीये. पहिल्या काही प्रयत्नात पोस्टर कलर वापरून बघितले. पण मातीच्या मूर्तीवर मला ते फार भडक वाटतात. आणि चंदेरी –सोनेरी रंग वापरले तर त्यांचा तवंग येतो विसर्जनाच्या पाण्यावर. मग मागच्या वर्षी फक्त पांढरा आणि केशरी पोस्टर कलर वापरून बघितले. तेही तितकंसं आवडलं नव्हतं. मी केलेल्या मातीच्या मूर्तीचा पोत बाजारातल्या मूर्तीइतका सुबक नसतो. (बाप्पा, तितकी सुबक मूर्ती करायचा पेशन्स कधी येणार माझ्यात?) पांढरा रंग लावल्यावर मूर्तीचा खडबडीतपणा अजून उठून दिसतो आणि ते नीट गिलवा न करता चुना फासल्यासारखं वाटतं. मग या वर्षी गेरूचा प्रयोग करून बघायचं ठरवलं. बेस म्हणून पांढरा रंग दिला, आणि मग त्यावर गेरू. (काही ठिकाणी गेरूमध्ये खालचा पांढरा मिसळून मार्बल टेक्श्चर आलंय ते आपोआपच.) आधी फक्त दाताला वेगळा रंग द्यायचा विचार होता, पण “डोळे काढच” म्हणून आग्रह झाल्यामुळे शेवटी डोळेपण केले. पांढर्या रंगापेक्षा चांगलं वाटलं हे. एकदा न रंगवता तशीच मूर्ती ठेवायची इच्छा आहे. रंगकामात अजून काही पर्याय सुचतोय का तुम्हाला?
पण बाप्पाला इतका गडद रंग दिल्यावर सजावट कशी उठून दिसणार? मग लक्षात आलं, बाप्पाचा हा रंग मला अगदी सोयीचा आहे – मी सजावट करणार ती खर्या पानाफुलांचीच, आणि ती गेरूच्या रंगावर पुरेशी उठावदार दिसणार!
या वेळी एक गंमत लक्षात आली – माती मळून झाल्यावर पहिल्यांदा मला काही सुचतच नव्हतं. मूर्ती करायला घेतांना आधी कितीतरी वेळ नुसते लाडू वळणंच चाललं होतं. कुठल्या क्रमाने करायची मूर्ती, काय प्रपोर्शन ठेवायचं हे काहीही आठवत नव्हतं. त्यामुळे फर्स्ट ड्राफ्ट आणि बिटा व्हर्जन झाल्याच. आणि बाप्पा बनवल्यावर मी उंदीरमामाला चक्क विसरून गेले होते! तो नंतर बनवला. (उंदीर मामा बघून माऊने सांगितलं, आई आता मी मनीमाऊ बनवणार! :D)
या वेळी चक्क बाप्पा चतुर्थीच्या आधी तीन – चार दिवस तयार होता. त्यामुळे ते तीन चार दिवस “आई बाप्पा आलाय का? अजून का झोपलाय तो?” या माऊच्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याचं काम होतं. :)
तर अशी सगळी गंमत करून मग काल बाप्पा आलाय. आता त्याच्या माऊबरोबर गप्पा सुरू झाल्यात. आणि ते बघितल्यावर आपण वेळेवर मूर्ती पूर्ण करू शकलो याचं किती समाधान वाटतंय काय सांगू!
आज झोपतांना माऊला म्हटलं, “चल बाप्पाला गुड नाईट करू या. तू बाप्पाला सांग ’मी सारखे कारभार करणार नाही’ म्हणून, मी सांगते, ’माऊला सारखं रागवणार नाही’ म्हणून.”
“नको. आपण बाप्पाला म्हणू या, ’थॅंक यू बाप्पा!’”
4 comments:
सुंदर
गणपती बाप्पा मोरया
रिसायकल्ड माती वापरायच्या अभिनव कल्पनेबद्दल अभिनंदन गौरी. मस्त झालाय गणपतीबाप्पा. तुमचे संवाद वाचून मला आमच्याकडची एक गम्मत आठवली. आरुष देवाला नमस्कार करताना takewando मध्ये वाकतात तसं वाकतो. logically बरोबरच आहे म्हणा :)
पुढच्या वेळी मनी पण कर आणि डेकोरेशन मध्ये ठेव :)
अमोल केळकर, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आणि ब्लॉगवर स्वागत!
अपर्णा, अग मागे पण एकदा मी विसर्जनाची माती ठेवून दिली होती पुन्हा वापरायला, पण कुणाला तरी हवी होती म्हणून देऊन टाकली. तेंव्हापासून अशी माती वापरून बघायची होती. आणि आरुषचं एकदम बरोबर आहे हा ... तायक्वांदोमध्ये नमस्कारच असतो ना तो - तसाच बाप्पालाही! :)
पुढच्या वेळी बाप्पाच्या भोवती मनी - भुभू - गाय - वाघोबा अश्या किती प्राण्यांची गर्दी होणार आहे माहित नाही!
Post a Comment