लॉंग विकेंडला घराबाहेर पडायचा काहीच प्लॅन ठरत नाहीये म्हणून हळहळ वाटत होती, पण या वर्षी ताम्हिणीच्या वाटेवरची कारवी फुलली आहे हे मायबोलीवर समजलं, आणि लगेच तिथे जाऊन बघण्याची संधी मिळाली. मुळशीचं पाणी बघण्याच्या नादात “क्विक बाईट्स” ची सांगितलेली खूण दिसलीच नाही, आणि अचानक अगदी रस्त्याच्या शेजारी कारवी येऊन भेटली!
|
कारवीच्या कळ्या |
|
कारवीची फुलं |
|
आणि ही झुडुपं |
|
रस्त्यालगतचा डोंगराचा उतार कारवीनेच भरला आहे! |
इथे पांढरी / गुलाबी कारवीसुद्धा फुलली आहे असं समजलं होतं ती काही दिसली नाही. कारवीसोबत सोनकी आणि दुसरी रानफुलं होतीच.
|
कुर्डू |
|
सोनकी |
|
(बहुतेक) निसुर्डी |
|
जांभळी चिरायत |
|
रानपावटा |
हा पण भेटला - बघा दिसतोय का तुम्हाला ...
|
दिसतोय का मी? |
माऊला कारवीपेक्षा जास्त इंटरेस्ट होता पलिकडे दिसणार्या धरणाच्या पाण्यात. म्हणजे फुलं वगैरे ठिक आहे, पण एवढं मोठ्ठं पाणी शेजारी दिसतंय आणि आपण तिथे जात नाही ही कल्पना काही तिला पटत नव्हती :) फुलांना भेटून झाल्यावर मग पाण्याला भेटायला गेलो.
काल अर्धवट पाऊस पडल्याने चांगल्यापैकी उकडत होतं, त्यात सकाळ म्हणण्यापेक्षा दुपारीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे पाण्यात शिरल्यावर खरंच जीव शांत झाला. सगळं हिंडून झाल्यावर, पाण्यात शिरल्यावर जिवाला अजून शांत करायला शाण्यासारखा मस्त पाऊस पण आला!
फुलांचे फोटो काढेपर्यंत मोबाईल नक्की माझ्याजवळ होता. तो पाण्यात शिरण्यापूर्वी नव्हता. उतरतांना गाडीत राहिला असेल म्हणून मी तशीच पुढे गेले होते. परत येतांना भिजल्यामुळे माऊचे आणि तिच्या मैत्रिणीचे कपडे बदलणे वगैरे सोपस्कार करून घाईनेच गाडीत बसलो आणि निघालो. पाच मिनिटांनी आठवलं, मोबाईल कुठे दिसत नाहीये! कुठल्याच फोनला रेंज नव्हती, त्यामुळे कॉल करून बघणं शक्य नव्हतं. तेवढ्यात माऊच्या मैत्रिणीची आजी म्हणाली, “आपण पाण्यात जाताना गाडी ठेवली होती, तिथे पडला होता एक मोबाईल!”
समोरचं काही दिसत नव्हतं एवढा पाऊस, रस्त्यात चहाचे पाट वहायला लागलेले. रस्ता तसा वर्दळीचा. परत फिरून गाडी लावली होती तिथे पोहोचलो, तर खरंच मोबाईल पडलेला मिळाला! पंधरा मिनिटं गाड्या, पायी चालणारे, गुरं यांच्या कुणाच्या पायदळी न जाता, कुणी न उचलता फोन तिथेच रस्त्यात पडलेला होता. आणि आतपर्यंत चिखल भरलेला असूनही चालू होता!!! त्याचं आणि माझंही नशीब फार चांगलं असावं. मोबाईल मिळाल्यावर आधी स्विच ऑफ केला, जमेल तसा चिखल काढला. घरी आल्यावर ड्रायरखाली वाळवला. जरा वेळ इअरफोन लावल्याचा सिंबॉल दाखवत होता, टचस्क्रीन झोपलेला होता. पण नंतर झाला सुरळीत चालू! या वेळी पहिल्यांदा नोकिया नसलेला फोन - सॅमसंग - घ्यायचं धाडस केलं होतं मी ... तर नोकियाचा ठोकळा सोडून दुसरा कुठला फोनही मी वापरण्याच्या लायकीचा आहे हे सिद्ध झालं या भटकंतीमधून!!! :)
No comments:
Post a Comment